परीसाने लोखंडाचे सोने होते, असा दगड तुम्हालाही मिळाला तर? वाचा 'ही' गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 03:40 PM2024-05-30T15:40:53+5:302024-05-30T15:41:12+5:30
परिसस्पर्श हा शब्द आपण ऐकला असेल तरी, नेमकं त्यामुळे काय बदल घडतो ते पाहू.
कल्पवृक्ष, कामधेनू, चिंतामणी याप्रमाणे परीस नामक दगडाबद्दल लोकांच्या मनात प्रचंड कुतुहल असते. साधारण दगडाप्रमाणे दिसणारा हा दगड लोखंडी वस्तूवर घासला असता, लोखंडाचे सोने होते, असे म्हटले जाते. त्यालाच परिसस्पर्श म्हणतात. आजच्या महागाईच्या काळात एक परीस आपल्याही मिळाला, तर किती बरे होईल? हा विचार जसा तुमच्या मनात डोकावला, तसाच एका मूर्तिकाराच्या मनात डोकावला. त्याने परिसाचा शोधही घेतला परंतु त्याला परीस मिळाला की नाही, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण गोष्ट वाचावी लागेल.
एक मूर्तीकार होता. मेहनती होता. परंतु, त्याने घडवलेल्या मूर्तीला बाजारभाव चांगला मिळत नसल्याने तो सदैव दु:खी असे. एक दिवस बाजारात असाच कपाळाला हात लावून नशीबाला दोष देत बसलेला असताना एक साधू त्याच्याजवळ आले आणि म्हणाले, `दु:खी होऊ नकोस. तुझी व्यथा माझ्या लक्षात आली आहे. तू नर्मदा मैयाच्या सान्निध्यात जा. ती सर्व इच्छांची पूर्ती करणारी माता आहे. तिच्या पोटात तुला परीस नावाचा दगड सापडेल. तो मिळाला, तर तुझ्या आयुष्याचे सोने होईल.'
एवढे बोलून साधू बाबा निघून गेले. मूर्तीकाराची आशा पल्लवित झाली. तो खडतर प्रवास करून नर्मदेच्या तिरावर गेला. नर्मदा मैयाला भक्तीभावाने नमस्कार केला आणि तिच्या उदरातला एक परीस नामक गोटा हवा आहे, अशी विनंती केली. नर्मदा मैयाने तथास्तू म्हटले आणि नर्मदेतले समस्त गोटे मूर्तीकारासमोर ठेवत, यातला परीस कोणता याची पारख करून घे आणि घेऊन जा, असे सांगितले.
नर्मदा मैया अंतर्धान पावली. मूर्तीकारासमोर नर्मदेचे असंख्य लहान मोठे गोटे होते. परंतु, यातला नेमका परीस कोणता, हे कसे ओळखावे, हे त्याला कळेना. त्याच्याजवळ लोखंडी छिन्नी होती. त्याने नर्मदेतला प्रत्येक गोटा छिन्नीवर घालून पहायचा, असे ठरवले. जिद्दीने तो एकेक गोटा तपासून पाहत होता.परंतु, काही काळातच त्याचा उत्साह मावळला. जेमतेम शंभर गोट्यांची तपासणी केल्यावर तो कपाळाला हात लावून बसला. तिथे पुन्हा एक साधू भेटले आणि म्हणाले, 'तुझी व्यथा मी जाणतो. हार मानू नकोस. एवढे प्रयत्न केलेस, थोडे आणखी कर, तू तुझ्या ध्येयापासून दूर नाहीस. विश्वास ठेव.'
साधूंचा शब्द प्रमाण मानून मूर्तीकार पुन्हा कामाला लागला. नर्मदेतले तुळतुळीत गोटे लोखंडी छिन्नीचा कायापालट करण्यात असमर्थ ठरत होते. मूर्तीकाराने आणखी शे दोनशे दगड पालथे घातले. छिन्नीची झीज होईल, पण दगडाची नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. तो रागारागाने छिन्नी तिथेच टाकून परत जायला निघाला. तेव्हा आणखी एक साधू महाराज भेटले आणि म्हणाले, `वत्सा, हे काय, तू तुझे काम अर्धवट टाकून जातोय? पहिल्या साधूंनी तुला सांगितले, नर्मदेत तुला परीस सापडेल, त्याच्यामुळे तुझ्या आयुष्याचे सोने होईल. दुसरे साधू म्हणाले, थांबू नकोस, तू ध्येयाच्या जवळ आहेस आणि आता मी सांगतोय, की काम अर्धवट टाकून जाऊ नकोस. याचा अर्थ असा, की नर्मदेतला कोणताही दगड तुझ्यासारख्या प्रतिभावान मूर्तीकाराच्या हाती लागला, तर त्याचे सोने करण्याची क्षमता दगडात नाही, तर तुझ्यात आहे. या दगडातून घडवलेले शिल्प जगभरात गौरवले जाईल. फक्त तू त्या दगडात मूर्ती शोधायला हवी! मात्र, परीस शोधण्याच्या नादात तुझ्या हातून शेकडो दगड गेले, तरी त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी तू असमर्थ ठरलास. कारण, तू तुझे ध्येय विसरलास. दगडात परीस शोधण्यापेक्षा तू परीस बन आणि असंख्य दगडांचे, लोखंडाचे, लाकडाचे, मातीचे सोने कर. जी क्षमता तुझ्यात आहे, ती इतरांमध्ये शोधण्यात वेळ वाया घालवू नकोस.'
साधू महाराजांना वंदन करून मूर्तीकार म्हणाला, `महाराज, तुमच्या कृपेने मला परिसस्पर्श या शब्दाचा नेमका अर्थ उमगला. माझ्या आत दडलेला परीस गवसला. मी प्रचंड मेहनत करीन आणि माझ्या व इतरांच्या आयुष्याचे सोने करण्याचा निश्चितच प्रयत्न करीन.'
त्याचे हे बोल ऐकून साधू महाराज आणि नर्मदा मैया म्हणाले, 'तथास्तू...!'