सोन्याच्या राशी देणारी अशीच एखादी व्याघ्रमूर्ती तुम्हालाही सापडली तर??? वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 08:00 AM2021-12-07T08:00:00+5:302021-12-07T08:00:13+5:30

कुठे थांबावं हे ज्याला कळतं, तो कधीच अपयशी होत नाही. उलट तोच सर्वात जास्त समाधानी आणि आनंदी असतो. हे विधान पटवून घ्यायचे असेल तर पुढील गोष्ट नक्की वाचा. 

What if you find a similar idol of a tiger giving gold? Read this story! | सोन्याच्या राशी देणारी अशीच एखादी व्याघ्रमूर्ती तुम्हालाही सापडली तर??? वाचा ही गोष्ट!

सोन्याच्या राशी देणारी अशीच एखादी व्याघ्रमूर्ती तुम्हालाही सापडली तर??? वाचा ही गोष्ट!

Next

एक गरीब माणूस लाकुडतोडीचा व्यवसाय करून तुटपुंज्या मिळकतीवर गुजराण करत होता. त्याचे घर त्याच्यावर अवलंबून होते. त्याने कधी देवाकडे आपल्या परिस्थितीबद्दल तक्रार केली नाही. तो प्रामाणिकपणे आपले नित्यकर्म करत होता.
 
लाकुडतोडीसाठी त्याला कधी जंगलात तर कधी डोंगरावर जावे लागे. असेच एकदा तो न्याहारी घेऊन आपल्या कामासाठी डोंगरावर गेला. दुपारी काम थांबवून तो एका झाडाच्या छायेत जेवायला बसणार, तोच त्याचे लक्ष एका दगडाकडे गेले. त्या दगडात वाघाचे शिल्प असल्याचे त्याला आढळले. असा चमत्कारिक योग जुळून आल्याने त्याने आपल्याजवळ असलेल्या अन्नाचा एक घास त्या व्याघ्रमूर्तीच्या तोंडी ठेवला. न्याहारी संपवली आणि उलेलेले काम पूर्ण करून तो घरी गेला.

आता त्या डोंगरावर त्याचे येणेजाणे रोजचेच झाले आणि आपण जेवणाआधी व्याघ्रमूर्तीला घास भरवणेही सरावाचे झाले. एक दिवस त्या मूर्तीतून आवाज आला. 'मित्रा, तुझे खूप आभार. तू मला रोज जेवू घातलेस. मी साधीसुधी मूर्ती नाही. माझ्या पोटात सोने दडले आहे. मी तुझ्या निष्काम सेवेवर प्रसन्न झालो आहे, म्हणून मी तुला ते देऊ इच्छितो.'

लाकुडतोड्या भावुक होऊन म्हणाला, 'मित्रा म्हणतोस आणि व्यवहार करतोस? अरे मलाही या जंगलात, एकांतात दुसरा कोणी सोबती नाही म्हणून तुला मित्र मानले आणि जेवू घातले. माझ्याजवळ जे आहे त्यात मी समाधानी आहे.'

व्याघ्रमूर्तीने सांगितले, `तू स्वत:साठी नाही, तर तुझ्या कुटुंबासाठी काहीतरी घेऊन जावेस अशी माझी इच्छा आहे. म्हणून उद्या सूर्योदयापूर्वी तू ये, माझ्या तोंडात हात घाल आणि हवे तेवढे सोने घेऊन जा. मात्र सूर्योदय झाला की माझे तोंड मिटते. त्यामुळे तू अडवूâन राहण्याआधी मी सांगतो तसे कर.'

लाकुडतोड्या घरी आला. बायकोला हकीकत सांगितली. ती विचारात पडली. प्रयोग करून बघा म्हणाली. दुसऱ्या दिवशी लाकुडतोड्या वेळेत पोहोचला. त्याने एकावेळेस जेवढे सोने हाताला लागले तेवढे घेतले आणि हात बाहेर काढला आणि व्याघ्रमूर्तीला नमस्कार केला आणि तो घरी गेला. 

रातोरात लाकुडतोड्या श्रीमंत झालेला पाहून त्याच्या गावातला श्रीमंत व्यापारी लाकुडतोड्याला गुपित विचारू लागला. त्याने बिचाऱ्याने सगळे काही सांगून टाकले. लोभी व्यापारी विचार करू लागला, `मलाही सोने मिळाले तर मी आणखी श्रीमंत होईन.' 

या लोभापायी त्याने गरीब लाकुडतोड्याचे सोंग घेतले आणि व्याघ्रमूर्तीशी मैत्री केली. व्याघ्रमूर्तीने त्यालाही एक संधी दिली. व्यापारी सूर्योदयाआधी पोहोचला आणि त्याने वाघाच्या तोंडात हात घातला आणि तो एकामागे एक सोने काढत राहिला. तसे करताना सूर्योदयाची वेळ आली हे त्याच्या लक्षातही आले नाही. अटीप्रमाणे सूर्योदयाच्या वेळी व्याघ्रमूर्तीचे तोंड बंद झाले आणि व्यापाऱ्याचा हात कायमचा त्यात अडकला.

पायाशी सोन्याच्या राशी पडूनही व्यापाऱ्याला ते सोने उपभोगता आले नाही. म्हणूनच संत तुकाराम महाराजदेखील सांगतात, 'जोडानिया धन उत्तम व्यवहारे!'

Web Title: What if you find a similar idol of a tiger giving gold? Read this story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.