नशिबात आहे ते मिळणारच आणि जे नाही ते मिळून परत जाणारच; वाचा ही गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 01:22 PM2023-12-07T13:22:30+5:302023-12-07T13:22:45+5:30
दैव देतं आणि कर्म नेतं ही म्हण आपण अनेकदा वापरतो, त्याचीच प्रचिती देणारी ही गोष्ट वाचा...
एक शेठजी आपल्या सुंदर सुकुमार मुलीसाठी त्यांच्या तोडीचे श्रीमंत स्थळ शोधतात आणि त्यांच्या मुलाशी आपल्या मुलीचा विवाह लावून देतात. मात्र काही दिवसातच शेठजींचा जावई वाईट लोकांच्या संगतीत येतो आणि नशा व जुगारात पैसे उडवू लागतो. मुलीचे विवाह सौख्य हरवते. ती हतबल होते. जावई स्वतःच्याच हाताने आपल्या कुटुंबाला दारिद्रयाच्या गर्तेत ढकलतो.
मुलीच्या आईला खूप वाईट वाटतं. एवढं चांगलं स्थळ शोधूनही मुलीच्या वाट्याला असं दुर्दैव का यावं? ती शेठजींना सांगते, तिची परिस्थिती सुधारावी म्हणून आपण तिला काही आर्थिक हातभार लावूया का? यावर शेठजी म्हणतात, प्रत्येकाची वेळ यावी लागते, ती आली की आपोआप मार्ग निघत जातात. तोवर इच्छा असूनही आपण काहीच करू शकत नाही.
तरी एकदा, जावई घरी आलेला असताना शेठजींना सांगून मुलीच्या आईने त्याला आर्थिक मदत करावयास भाग पाडले. थेट मदत केली तर जावयाचा अपमान होईल, तो मुलीवर राग काढेल. या काळजीने शेठजींनी आपल्या नोकरांना सांगून मोतीचूर लाडवांमध्ये सोन्याच्या मोहरा घालून मिठाईचा खोका जावयाला भेट दिला. तो घेऊन घरी जात असताना जावयाने विचार केला, मिठाई खाण्यापेक्षा ती विकली तर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न तरी सुटेल. या विचाराने तो हलवायाकडे जातो आणि ती ताजी मिठाई विकून मिळालेले पैसे विकून घरी जातो.
बाहेरची कामे आवरून शेठजी घरी परतत असताना विचार करतात, आज मुलीला लाडू खाताना आनंद होईल. या आनंदात आपणही घरी मिठाई घेऊन जाऊया. असे म्हणत शेठजी त्याच हलवायाच्या दुकानात जातात, लाडू विकत घेतात. हलवाई तोच मिठाईचा खोका पुढे करतो आणि मोबदला घेतो. शेठजी मिठाईचा खोका घेऊन घरी येतात, तर पहिल्याच घासला लाडवांबरोबर सुवर्ण मोहरा दाताखाली आलेली पाहून आश्चर्यचकित होतात. त्यांची पत्नीही गोंधळून जाते.
यावर शेठजी म्हणतात, 'बघितलंस? आपल्या मुलीला मदत करावी अशी आपली इच्छा होती. पण तसे असूनही ती पूर्ण होऊ शकली नाही. कारण मुलीच्या नशिबात अजून प्रारब्धाचा फेरा संपलेला नव्हता. म्हणून मदत पाठवूनही ती तिच्यापर्यंत पोहोचली नाही. एवढंच काय तर एवढी चांगली संधी हलवायाच्या हाती येऊनही हुकली! याचाच अर्थ 'वक्त से पेहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नही मिल सकता!'
नशिबावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. आपली वेळ आली की भाग्य उघडते आणि वेळ नसली की भाग्य साथ सोडते. मात्र यावर पूर्णपणे विसंबून न राहता ज्यो प्रयत्न करतो, कष्ट घेतो, संयम बाळगतो तो स्वतःचे भाग्य स्वतःच बदलतो आणि अशाच प्रयत्नवादी माणसाला देवही मदत करतो. यासाठी २ गोष्टी तुमच्याजवळ हव्या, 'सकारात्मकता आणि दृढ निश्चय! या दोन गोष्टी तुमच्याजवळ आहे का तपासून बघा.