जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यात नेमका फरक काय? माउलींच्या समाधीचे वैशिष्ट्य काय? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 02:42 PM2022-11-22T14:42:42+5:302022-11-22T14:43:00+5:30

ज्ञानोबा माउलींनी संजीवन समाधी घेतली ती आजची तिथी कार्तिक वद्य त्रयोदशी. त्यानिमित्ताने या संकल्पनेबद्दल जाणून घेऊ. 

What is the exact difference between live Samadhi and Sanjeevan Samadhi? What is the characteristic of Mauli's mausoleum? Find out! | जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यात नेमका फरक काय? माउलींच्या समाधीचे वैशिष्ट्य काय? जाणून घ्या!

जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यात नेमका फरक काय? माउलींच्या समाधीचे वैशिष्ट्य काय? जाणून घ्या!

googlenewsNext

संजीवन समाधी हे माऊलींचे चैतन्यस्थान. एवढी वर्षे लोटूनही त्या स्थानाचे महात्म्य तसूभरही कमी झालेले नाही. मात्र संजीवन समाधीबद्दल अनेकांच्या मनात गोंधळ दिसून येतो. सोशल मीडियावर माधुरी दामले यांच्या नावे व्हायरल झालेला लेख या प्रश्नाची उकल करून सांगतो. सविस्तर जाणून घेऊ. 

नाथ संप्रदायातील खऱ्या साधकांच्या ध्येयाची किंवा तपश्चर्येची शेवटची इच्छा म्हणजे समाधी अवस्था. पण जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक सदरील लेखात आहे. सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे अद्वितीय अवतार आहेत. त्यांच्या सा-याच गोष्टी अत्यंत अलौकिक आहेत. जसा त्यांचा जन्म अलौकिक तशीच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेवाद्वितीय आहे. आजवर जगात केवळ भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच ही विशिष्ट अशी "संजीवन समाधी" घेतलेली आहे.

सामान्यत: लोक जिवंत समाधी व संजीवन समाधी यात गल्लत करतात. त्यामुळे कोणा महात्म्यांनी जिवंत समाधी घेतलेली असेल तर त्याला लोक संजीवन समाधीच म्हणतात. वस्तुत: संजीवन समाधी ही जिवंत समाधी पेक्षा खूपच वेगळी आहे. जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचाही कालांतराने नैसर्गिक मृत्यू होऊनच देहपात होत असतो. परंतु या संजीवन समाधीमध्ये मृत्यूच होत नाही, देहत्याग घडतच नसतो. या संजीवन समाधीची प्रक्रिया अत्यंत जटिल व विलक्षण आहे. नाथसंप्रदायातील अनेक महात्म्यांना ही प्रक्रिया सद्गुरुकृपेने ज्ञात असली तरी, श्रीभगवंतांच्याच आज्ञेने श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच त्या प्रक्रियेचा अवलंब करून तशी संजीवन समाधी घेतलेली आहे. सर्व महात्म्यांनी मिळून तो केवळ श्री माउलींसाठीच एकमताने राखीव ठेवलेला विशेष अधिकार आहे, असे म्हणा हवे तर.

संजीवन समाधीच्या प्रक्रियेचा सूचक संकेत श्रीसंत नामदेव महाराजांनी माउलींच्या समाधिवर्णनाच्या आपल्या अभंगांत केलेला आहे. श्री नामदेवरायांच्या गाथ्यात "श्रीज्ञानदेव समाधिमहिमा" नावाचे आणखी एक स्वतंत्र प्रकरण आहे. यात प्रत्यक्ष भगवान श्रीपंढरीनाथच, संतांच्या प्रेमळ विनंतीवरून श्री माउलींचे व त्यांच्या समाधीचे माहात्म्य कथन करीत आहेत. या प्रकरणातही काही विशेष संदर्भ मिळतात. त्यात श्री सोपानदेवांच्या समाधीचा उल्लेख करताना श्रीपांडुरंग म्हणतात की, "त्यावेळी हा ज्ञानदेवही दिव्यदेहाने आमच्यासारखाच सासवडला येईल तुझ्या समाधीसाठी." माउलींच्या संजीवन समाधीत त्यांचा देहत्याग घडलेला नाही, हेच देवही येथे सूचित करीत आहेत.

सद्गुरु श्री माउलींच्या संजीवन समाधीबद्दलची विशेष . .....

सद्गुरू श्री माउलींनी श्रीभगवंतांना समाधीची परवानगी मागितल्यावर, देवांनीच त्यांना आळंदीच्या त्यांच्या स्थानाची माहिती दिली. म्हणजे माउलींना ते माहीत नव्हते असे नाही, पद्धत म्हणून त्यांनी देवांना त्याबद्दल विचारले. आळंदीच्या सिध्देश्वर मंदिराच्या समोरील नंदीखाली असणारे समाधिविवर हेच माउलींचे अनादिस्थान आहे. तेथेच त्यांनी या पूर्वी एकशेआठ वेळा समाधी घेतलेली असून ही त्यांची एकशेनववी वेळ होती समाधी घेण्याची, असे नामदेवराय सांगतात. तेथूनच ते पुन्हा पुन्हा दरवेळी अवतार घेऊन येत असतात. देवांच्या सांगण्यानुसार नंदी हलवल्यावर खालचे विवर मोकळे झाले. नामदेवरायांच्या चारही पुत्रांनी ते स्वच्छ करून त्यातील चौथ-यावर मृगाजिन वगैरे घालून समाधीची सर्व सिद्धता केली.

आदल्या दिवशी, कार्तिक कृष्ण द्वादशीला प्रत्यक्ष श्रीभगवंतांनी स्वहस्ते दिव्य अन्न तयार करून माउलींना स्वत: भोजन वाढले . त्या अमृतमय अन्नामुळे माउलींच्या आत शरीरभर अमृतच तयार झाले.

कार्तिक कृष्ण त्रयोदशीला सकाळच्या वेळी माउलींची पूजा झाल्यावर, एकीकडून श्री निवृत्तिनाथ व एकीकडून श्रीभगवंतांनी हाताला धरून माउलींना त्या समाधिविवराच्या आत नेले. तेथील आसनावर बसून माउलींनी डोळे मिटून तीन वेळा नमस्कार केला, भीममुद्रा लावली आणि ते 'संजीवन समाधी'त गेले. त्यानंतर श्रीपांडुरंग व श्री निवृत्तिनाथ बाहेर आले.

संजीवन समाधी साधण्यासाठी तत्त्वांचा तत्त्वांमध्ये नाथ संप्रदायोक्त पद्धतीने लय केला जातो. सद्गुरु श्री माउलींनी समाधीविवरात बसल्यानंतर याच पद्धतीने तत्त्वांचा लय करायला सुरुवात केल्यावर, ती प्रक्रिया उपस्थित सर्व संतांना डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता आली. पृथ्वीतत्त्वाचा जलतत्त्वात, जलाचा अग्नीत, अग्नीचा वायूत व वायूचा आकाशतत्त्वात लय झाला. आकाशाचा लय कशातच होत नसल्याने ते भगवती शक्तीच्या आकाशाशी, चिदाकाशाशी तदाकार होऊन राहते. ही प्रक्रिया माउलींच्या देहावर घडताना उपस्थित संतांना प्रत्यक्ष पाहता आली. पृथ्वी व जलतत्त्वाचा लय झाल्यावर माउलींच्या स्थूल शरीराचा भाग अदृश्य झाला आणि त्याजागी तेजोमय मूर्ती दिसू लागली. तेजतत्त्वही लय पावल्यावर समोरची ती तेजाकृती देखील दिसेनाशी झाली व केवळ नादरूपाने प्रचिती शिल्लक राहिली. ते वायूतत्त्वही आकाशात लय पावल्यावर तो नादही मावळून गेला व माउलींची संजीवन समाधीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सर्वांना समजले. "संजीवन समाधीचा अर्थ असा नाही की, माउलींनी देहत्याग केला. याच्या उलट प्रक्रियेने त्यांना केव्हाही हवे तेव्हा पुन्हा देहावर येता येते. मग ते जसे समाधीच्या पूर्वी होते तसेच पुन्हा आपल्याला दिसू लागतील." संजीवन सामाधीच्या रूपाने ते विश्वाकार होऊन राहिलेले आहेत.

जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यात हाच फार मोठा फरक आहे. 'जातस्यहि ध्रुवो मृत्यु:' या नियमानुसार जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचा पांचभौतिक देह कालांतराने विघटन पावतो, कारण तो असा तत्त्वांचा लय करून अदृश्य केलेला नसतो. ही माहिती नसल्यामुळेच सामान्यपणे लोक जिवंत समाधीला संजीवन समाधी म्हणतात. परंतु आजवर केवळ आणि केवळ भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनीच अशी संजीवन समाधी घेतलेली आहे. म्हणूनच सद्गुरु श्री माउलींची ही संजीवन समाधी एकमेवाद्वितीय म्हटली जाते ! इथे कोणाही महात्म्यांची मी श्री माउलींशी तुलना करत नाहीये. जिवंत समाधी घेतलेले सर्व महात्मे श्री माउलींसारखेच थोर आणि पूजनीयच आहेत. फक्त जो वास्तविक भेद आहे दोन्हीतला तेवढाच मी येथे मांडत आहे. कृपया कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

श्रीसंत महात्मे यासाठीच श्रीक्षेत्र आळंदीला व सद्गुरु श्री माउलींच्या समाधीला "नित्यतीर्थ" म्हणतात. हे कधीच नष्ट न होणारे असे कालजयी तीर्थ आहे, म्हणूनच ते नित्यतीर्थ होय. श्री माउलींचे समाधीविवर हे सूक्ष्म स्तरावरील आहे. तेथे पांचभौतिकताच नाही कसलीही. त्यामुळे तेथे प्रवेश करण्यासाठी आपला हा पांचभौतिक देह उपयोगाचा नसतो. तेथे केवळ दिव्य देहानेच प्रवेश होऊ शकतो. या समाधीविवराला कालाचा स्पर्शच नाहीये. तिथे काळ कार्यच करीत नसल्याने, त्यावेळी आत वाहिलेली फुले आजही जशीच्या तशी टवटवीत आहेत. त्यावेळी ठेवलेला पंचखाद्याचा नैवेद्यही साडेसातशे वर्षे उलटली तरी जसाच्या तसाच आहे.

सद्गुरु श्री माउलींच्या कृपेने या समाधिविवराच्या आत जाण्याचे सद्भाग्य आजवर केवळ बोटावर मोजण्या ईतक्या सत्पुरुषांनाच लाभलेले आहे. पण आश्चर्य म्हणजे या सर्व महात्म्यांनी आतील देखाव्याचे केलेले वर्णन शब्दश: एकच आहे. माउलींच्या समाधिसोहळ्यास श्रीसंत जनाबाई उपस्थित नव्हत्या. म्हणून त्या जेव्हा त्यानंतर पहिल्यांदा आळंदीला आल्या, त्यावेळी माउलींनी त्यांना संजीवन समाधीचा तो संपूर्ण सोहळा दिव्यदृष्टीने पुन्हा दाखवला होता. श्री माउलींचे त्यांच्यावर पुत्रवत् प्रेम होते, म्हणूनच जनाबाईंसाठी त्यांनी ही विलक्षण लीला केली.

श्रीसंत एकनाथ महाराजांचा प्रसंग आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच. माउलींच्या गळ्याला टोचणारी अजानवृक्षाची मुळी कापण्यासाठी ते या समाधीविवरात गेले होते. त्यानंतर साधारणपणे दोनशे वर्षांपूर्वी, श्री चिदंबर महास्वामींच्या शिष्या श्रीसंत विठाबाई महाराजांना श्री माउलींच्या कृपेने हे सद्भाग्य लाभले.
गंमत म्हणजे श्रीसंत विठाबाईंचे अभंग मला काही वर्षांपूर्वी वाचायला मिळाले होते. सद्गुरु श्री ज्ञानदेवांच्या समाधिस्थ स्वरूपाविषयी आपल्या "श्रीज्ञानदेव विजय" ग्रंथातील ओळ-

ज्ञानेशांची समाधिस्थिती ।
पुनश्च येणे देहावरती ।
याची घेतली प्रचिती ।
त्रिशतकोत्तर नाथांनी ॥१५.६३॥

पूर्वजांनी जया पाहिले ।
तया नाथांनीही देखिले ।
आजही तैसेचि संचले ।
समाधिस्थ ज्ञानेश्वर ॥१५.६५॥

भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हे नित्यअवतार असल्याने, आजही त्याच रूपाने समाधिस्थ राहून ते आपल्या भक्तांवर कृपाप्रसाद करीत आहेत. "कलियुगात देव एक ज्ञानेश्वर महाराजच आहेत."

सद्गुरु श्री माउली हे जसे एकमेवाद्वितीय ( Unique ) अवतार आहेत, तशीच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेवाद्वितीयच आहे. त्यांच्यासारखे केवळ तेच ! अलौकिक, अद्भुत, अनिर्वचनीय आणि अपरंपार कनवाळू !! त्यांचे पावन नाम घेण्याची, त्यांच्या दिव्य चरित्राचे अनुसंधान राखण्याची आणि त्यांचेच स्वरूप असणारे त्यांचे वाङ्मय वाचण्याची, त्याचे मनन-चिंतन करण्याची संधी व सद्बुद्धी दोन्ही आपल्याला लाभत आहे, हेच माउलींची आपल्यावर अद्भुत कृपा असल्याचे प्रतीक आहे, यात शंकाच नाही ! या देवदुर्लभ भाग्यासाठी परमकनवाळू करुणाब्रह्म भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीचरणीं, सर्वांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी दंडवत प्रणाम करून त्याच अनुपम-सुखदायक श्रीचरणीं, त्यांच्या महन्मंगल जयंतीपर्वाच्या पूर्वसंध्येला तुलसीदल रूपाने विसावून धन्य होतो !

Web Title: What is the exact difference between live Samadhi and Sanjeevan Samadhi? What is the characteristic of Mauli's mausoleum? Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.