खरेच पनवती लागते का? पनौती म्हणजे काय? अशुभ अन् वाईट असते का? पाहा, काही मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 02:17 PM2023-11-25T14:17:01+5:302023-11-25T14:19:08+5:30

Panauti As Per Astrology: गेल्या काही दिवसांपासून पनवती या शब्दाची देशभरात चर्चा आहे. मात्र, पनवती म्हणजे नेमके काय? ते जाणून घ्या...

what is the exact meaning of panauti and when panauti start according to astrology know about panvati mhanje kay in marathi | खरेच पनवती लागते का? पनौती म्हणजे काय? अशुभ अन् वाईट असते का? पाहा, काही मान्यता

खरेच पनवती लागते का? पनौती म्हणजे काय? अशुभ अन् वाईट असते का? पाहा, काही मान्यता

Panauti As Per Astrology: सन २०२३ मध्ये झालेल्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाने मात करत सहाव्यांदा विश्वचषक उंचावला अन् विश्वविक्रम केला. मात्र, यानंतर राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका प्रचारसभेत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता टीका करत, पनवती या शब्दांचा वापर केला. यानंतर पनवती या शब्दांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, खरेच पनवती लागते का, पनवती म्हणजे काय, ती अशुभ असते का, याची उत्तरे आणि काही मान्यता ज्योतिषशास्त्रात आढळून येतात, असे सांगितले जाते. 

पनवती हा शब्द सामान्यपणे सर्रास वापरला जातो. एकादी मनाविरोधी कृती, घटना किंवा अपेक्षापूर्ती झाली नाही की, पनवती लागली, असा शब्दप्रयोग केला जाते. अनेकदा माणसांसाठीही पनवती शब्द वापरल्याची अनेक उदाहरणे आपल्याला आजूबाजूला दिसतील. आली पनवती, काय पनवती आहे, असे शब्दप्रयोग करत आपण एखाद्याला दुषणे देतो. बहुतांश वेळा हा शब्दप्रयोग हा अतिशय खेळकरपणे, मस्करीमध्ये वापरला जातो. मात्र, राजकीय वर्तुळात या शब्दाने कहर माजवल्याचे पाहायला मिळत आहे. या शब्दावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक हल्ले चढवताना दिसत आहेत. 

पनवती म्हणजे नेमके काय?

वास्तविक पनवती हा शब्द ज्योतिषशास्त्राशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. शनी साडेसाती याबाबत अनेकांनी अनेक गोष्टी ऐकल्या असतील. काही मान्यतांनुसार, शनीची साडेसाती पनौती म्हणून ओळखली जाते. शनी साडेसाती सुरू झाली की, माणसाचे अशुभ सुरू होते, अशी सर्वसामान्य समजूत आहे. आणखी एक म्हणजे पनवतीला लहान आणि मोठेदेखील मानले जाते. साडेसातीचा काळ अधिक आव्हानात्मक मानला जातो. यालाच सोप्या भाषेत पनवती असे म्हटले जाते. तर शनीचा ढिय्या काळ जो व्यक्तीच्या जन्म राशीतून चौथ्या आणि आठव्या स्थानी शनीदेवाच्या आगमनामुळे होतो, त्याला छोटी पनवती म्हणतात, कारण ती फक्त काही वर्षच असते. 

साडेसाती अन् पनवती

साडेसातीचा विचार हा जन्मकुंडलीतील चंद्र व गोचरी शनी यांच्याशी निगडित आहे. चंद्रापासून ४५ अंश मागे शनीचे अंशात्मक भ्रमण सुरु होते, तेव्हा साडेसाती सुरु होते. चंद्रापासून ४५ अंशा पुढे शनी जाईल, तेव्हा साडेसाती संपते. जन्मकुंडलीतील चंद्राच्या बाराव्या राशीत शनीने प्रवेश केला की, साडेसाती सुरु होते, ही पहिली अडीच वर्षे होतात. चंद्र राशीवरुन शनिचे भ्रमण सुरु झाले की, दुसरे अडीच वर्षे व चंद्राच्या दुसऱ्या राशीत शनीने प्रवेश केला की, तिसरी अडीच वर्षे सुरु झाली, असा हा सर्व मिळून साडेसात वर्षाचा काळ म्हणून यास साडेसाती म्हणतात. आताच्या घडीला शनी कुंभ राशीत आहे. यामुळे मकर, कुंभ आणि मीन राशींची साडेसाती सुरू आहे. मकर राशीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. कुंभ राशीचा दुसरा टप्पा सुरू आहे, तर मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे.

पनवती अशुभ अन् वाईट असते का?

साडेसाती म्हणजेच शनिदेवाची पनवती अशुभ नसते. शनीदेवाने भगवान शंकराची आराधना केली. शनीभक्तीने प्रसन्न होऊन शंकराने शनीदेवाला नवग्रहांचे न्यायाधीशपद दिले. जेव्हा शनीची दशा, महादशा, अंतर्दशा आणि गोचर होते, तेव्हा शनीदेव व्यक्तीला कर्मानुसार फळे देतात. शनी वाईट काहीच करत नाही. उलट, आपण आपल्या पूर्वायुष्यात केलेल्या कर्माची फळे देतो. तुम्ही चांगली कर्मे केलीत तर चांगली फळे मिळतील. मात्र, चुकीचे काही झाले असेल, तर शनी शिक्षाही देतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे साडेसाती किंवा पनवती अशुभ किंवा वाईट मानणे योग्य नाही, असे सांगितले जाते. 

भद्रा अन् पनवती यांचा संबंध

शनीदेवांसोबत शनीची बहीण भद्रा हीदेखील पनवती स्वरुप असल्याचे मानले जाते. शनीदेवाची बहीण भद्रा जिथे जाईल, तिथे प्रतिकूल कृती करत असे. यामुळे ब्रह्मदेवांनी भद्राला तिन्ही लोकांमध्ये स्थान दिले. तिचा काळही निश्चित केला. यासोबतच भद्राच्या मुहूर्तावर जेव्हाही कोणतेही शुभ कार्य केले जाते, तेव्हा त्या कार्यात बाधा येते आणि त्या कार्याचे शुभ परिणाम नष्ट होतात असे सांगितले होते. त्यामुळे शनीची बहीण भद्रा हिला पनवती असे म्हटले जाते. 

- सदर मान्यता आणि ज्योतिषीय दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. 
 

Web Title: what is the exact meaning of panauti and when panauti start according to astrology know about panvati mhanje kay in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.