सूर्यास्तानंतर झाडाला हात न लावण्यामागे काय शास्त्र आहे आणि कोणत्या समजुती आहेत? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 12:04 PM2022-11-05T12:04:58+5:302022-11-05T12:05:16+5:30
रात्री झाडावर भुतं बसतात, या गोष्टीला जरी शास्त्राधार नसला तरी सूर्यास्तानंतर झाडांना हात का लावू नये याला शास्त्राधार नक्कीच आहे!
सूर्यास्तानंतर मानव वगळता सृष्टीतले सर्व सजीव झोपी जातात. ती त्यांची विश्रांतीची वेळ असते. त्या वेळेत त्यांना त्रास देऊ नये हा आपल्या संस्कृतीने आपल्यावर घातलेला संस्कार आहे. कारण आपली संस्कृती सूक्ष्म जीवांपासून बलाढ्य जीवांपर्यंत सर्वांचा आदर करावा, सहानुभूती ठेवावी, प्रेम द्यावे ही शिकवण देते. त्याची अंमलबजावणी व्हावी, म्हणून या संस्कारांची नाळ धर्माशी जोडून दिली आहे. जेणेकरून पाप लागेल या भीतीपोटी का होईना, दुसऱ्या जीवांना त्रास देण्यासाठी आपण धजणार नाही.हे आहे मुख्य कारण. त्या बरोबरीने या संकल्पनेशी जोडलेल्या इतर गोष्टींबद्दलही जाणून घेऊ.
झाडे आणि वनस्पती हे माणसासारखेच जिवंत प्राणी आहेत, म्हणून ते देखील सजीव घटकांत समाविष्ट केले जातात. एवढेच नाही तर फुलं,फळं, पानांचा, वनस्पतींचा संदर्भ देव धर्म पुजेशी जोडल्यामुळे त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जसे की, तुळशी, जास्वंद, कमळ, बेल, दुर्वा, आम्रपल्लव, वड, पिंपळ इ. नावं वाचली तरी त्याच्याशी संबंधित देव आणि पूजाविधी आपल्या लक्षात येतील. म्हणून देवाला प्रिय असलेल्या गोष्टींचा आपण मान ठेवला पाहिजे.
सूर्यास्तानंतर पक्षी घरट्यात झोपी जातात. त्यामुळे सायंकाळी झाडांना हात लावू नये असे आपल्याला घरातले ज्येष्ठ सांगतात. त्यामुळे झाडांनाच नाही तर त्यावर निजलेल्या जीवांनाही त्रास होतो. याशिवाय निशाचर अर्थात रात्रीच्या वेळी कार्यरत होणारी पशु पक्ष्यांची टोळी पाहता त्यांच्या जैवविविधतेला आपल्यामुळे हानी पोहोचू नये म्हणूनही सायंकाळी झाडांना हात लावू नये असे म्हणतात.
ज्याप्रमाणे सायंकाळी किंवा रात्रीच्या अंधारात आपल्यामुळे प्राणी पक्ष्यांना हानी पोहोचू शकते तशीच त्यांच्यामुळे आपल्या जीवालाही भीती निर्माण होऊ शकते. कारण ते जीव आपल्याला त्रास देण्याच्या हेतूने नाही, तर स्वसंरक्षणासाठी आपल्यावर हल्ला करू शकतात. म्हणूनही सुरक्षित अंतर राखणे केव्हाही चांगलेच!
आता जाणून घेऊ वैज्ञानिक कारण :
दिवसभर प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या वनस्पती सायंकाळी अर्थात सूर्यास्तानंतर कार्बन डाय ओक्साइड उत्सर्जित करतात. तो वायू आपल्या शरीरासाठी घातक असतात, म्हणूनही सायंकाळी तुळशी वगळता इतर झाडांच्या संपर्कात सायंकाळी जाऊ नये, याला हाच शास्त्राधार आहे! याच दृष्टीने आणखी एक लोकसमजूत जोडली, की रात्री झाडांवर भुतं राहतात. त्यामुळे का होईना लोकांनी झाडांपासून दूर राहावे, हे शास्त्राला आणि धर्माला अभिप्रेत आहे.