धर्म म्हणजे काय? शास्त्र म्हणजे काय? हिंदू धर्माचा प्रमाण ग्रंथ कोणता? सविस्तर वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 12:47 PM2021-09-22T12:47:33+5:302021-09-22T12:49:52+5:30
आजच्या घडीला 'शास्त्र असतं ते' असे म्हणत जी टिंगल टवाळी केली जाते, ती योग्य नाही. केवळ कोणीतरी सांगितले म्हणून एखाद्या गोष्टीचे अंधानुकरण करणेही योग्य नाही. ते तसे का केले जाते, याची उकल आपल्या धर्मग्रंथात दिलेली आहे.
धर्माशिवाय कोणतेही राष्ट्र उभे राहू शकत नाही. प्रत्येक राष्ट्राचा स्वतंत्र धर्म आहे. भारत देशात अनेक धर्माचे लोक एकत्र नांदतात. सर्वधर्मसमभावाचे धोरण आपल्या देशाने स्वीकारले आहे. असे असूनही अनेकदा धार्मिक तेढ निर्माण होऊन वाद विकोपाला जातात. याचे कारण हेच आहे, की धर्म या शब्दाची व्याख्याच आपण समजून घेतलेली नाही. पं. धुंडिराजशास्त्री दाते यांनी धर्मशास्त्रीय निर्णय या पुस्तकार धर्म आणि शास्त्र ही संकल्पना छान समजावून सांगितली आहे. तसेच आपल्याकडे विपुल साहित्याची उपलब्धता असल्यामुळे हिंदूंनी प्रमाण ग्रंथ कोणता मानावा, याचीही उकल त्यांनी केली आहे. कशी ते पाहू-
धर्म शास्त्र यामध्ये दोन शब्द आहेत. धर्म आणि शास्त्र! धर्माच्या अनेक व्याख्या आहेत. वस्तुत: इतक्या व्याख्यांची जरूरी नाही. एक व्याख्या उत्कृष्ट आहे. तेवढी पाहिली म्हणजे झाले.
१. आपल्या आचरणातून समाजव्यवस्था उत्तम राहिली पाहिजे.
२. प्रत्येक प्राणिमात्राची ऐहिक उन्नति म्हणजे विकास झाला पाहिजे.
३. सांसारिक उन्नतीबरोबर आध्यात्मिक उन्नतीही झाली पाहिजे.
अशी व्यवस्था ज्यात आहे, त्याला धर्म म्हणतात. 'जगत: स्थितिकारणं प्राणिना साक्षात अभ्यदय नि:श्रेयस हेतुर्य: स: धर्म:' आद्य श्री शंकराचार्यांनी ही धर्माची व्याख्या केली आहे. या तीनही गोष्टी प्रत्येक कर्मातून साध्य झाल्या पाहिजेत अशी सर्व कर्मांची रचना केली, ती श्रुति, स्मृति, पुराणे व सूत्रे यांच्या आधाराने केली. म्हणून प्रत्येक कर्माने या तीनही गोष्टी साध्य होतात, याला धर्म म्हणतात.
शास्त्राची व्याख्यादेखील पूर्वसूरींनी स्पष्ट केली आहे. माणसाचे हित व अहित ज्यात सांगितले जाते, त्याला शास्त्र म्हणतात. हिताकरता प्रवृत्त व्हावे व अहितापासून निवृत्त व्हावे असे ज्यात सांगितले जाते, त्याला शास्त्र म्हणतात.
आजच्या घडीला 'शास्त्र असतं ते' असे म्हणत जी टिंगल टवाळी केली जाते, ती योग्य नाही. केवळ कोणीतरी सांगितले म्हणून एखाद्या गोष्टीचे अंधानुकरण करणेही योग्य नाही. ते तसे का केले जाते, याची उकल आपल्या धर्मग्रंथात दिलेली आहे. परंतु अनेकांना प्रश्न पडतो, की नेमका कोणता धर्मग्रंथ प्रमाण मानावा, ज्यात सर्व शास्त्रांची उत्तरे एकत्र सापडू शकतील? त्यावर पं. धुंडिराजशास्त्री दाते लिहितात, शास्त्राचे जे ग्रंथ आहेत, त्या सर्वात अधिक गाजलेला व लोकप्रिय झालेला 'धर्मसिंधू' हा ग्रंथ प्रमाण मानावा. या ग्रंथात ऋषींची मूळ वचने दिली नाहीत, पण त्यांचा आशय दिला आहे व त्यावरून जे कर्तव्य केले पाहिजे त्याचीही माहिती दिली आहे. निर्णयसिंधू व पुरुषार्थ चिंतामणी या ग्रंथात ऋषींची सर्व मूळ वचने दिली आहेत.
हे ग्रंथ अभ्यासले गेले पाहिजेत. आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी निराधार नसून प्रत्येक गोष्टीची शास्त्रीय उकल आहे. त्याचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. हे कर्तव्यपालन म्हणजेच धर्म.
परंतु, आजच्या धकाधकीच्या काळात या ग्रंथांचा अभ्यास करणे शक्य नाही? मग सुरुवातीला दिलेली तीन वचने लक्षात ठेवा आणि आचरणात आणा. धर्मपालन आपोआप होईल. हीच तीन वचने सर्व धर्मातील धर्मगुरुंना अभिप्रेत आहेत. ती म्हणजे-
१. आपल्या आचरणातून समाजव्यवस्था उत्तम राहिली पाहिजे.
२. प्रत्येक प्राणिमात्राची ऐहिक उन्नति म्हणजे विकास झाला पाहिजे.
३. सांसारिक उन्नतीबरोबर आध्यात्मिक उन्नतीही झाली पाहिजे.