धर्म म्हणजे काय? भगवंताला कोणता धर्म आवडतो? आपला खरा धर्म कोणता? हे जाणून घ्या.

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 9, 2021 12:51 PM2021-02-09T12:51:33+5:302021-02-09T12:55:53+5:30

आपण आपले काम प्रामाणिकपणाने करणे, स्वत:शी आणि दुसऱ्याशी खोटे न बोलणे, ईश्वराला साक्षी ठेवून प्रत्येक काम करणे आणि केलेले काम त्याला समर्पित करणे, हा भाव जागृत ठेवणे, हा खरा धर्म!

What is religion? Which religion does God like? What is your true religion? Know this. | धर्म म्हणजे काय? भगवंताला कोणता धर्म आवडतो? आपला खरा धर्म कोणता? हे जाणून घ्या.

धर्म म्हणजे काय? भगवंताला कोणता धर्म आवडतो? आपला खरा धर्म कोणता? हे जाणून घ्या.

googlenewsNext

भीती कोणाला वाटते, ज्याच्याकडून चूक घडते. ज्याने आपली कामगिरी चोख बजावलेली असते, त्याला कोणाचीही भीती नसते. म्हणतात ना, 'कर नाही, त्याला डर कशाला?' आपले काम योग्य रितीने पार पाडणे, यालाच धर्म म्हणतात. तो केवळ प्रपंचात नाही, तर परमार्थातही महत्त्वाचा आहे. पापाची भीती त्यालाच वाटते, ज्याने ते केले आहे. म्हणून कोणतेही काम करताना आपली विवेकबुद्धी जागृत ठेवावी आणि आणि स्वत:शी प्रामाणिक राहावे. बाकी कोणीही आपल्याकडे पाहो न पाहो, पण अंतरात्म्यात स्थित परमेश्वर आपल्याकडे पाहत आहे, ही जाणीव ठेवली, की हातून कोणतेही वाईट कर्म घडणारच नाही आणि जे घडेल, ते धर्माला अनुसरून असेल. 

भगवंतासा जयाची प्रीति, आपण वर्तावे तेणेचि रीति!

'धर्ममूर्ति' हे परमेश्वराचे एक अत्यंत आदरणीय असे प्रेमस्वरूप. धर्म म्हणजे कर्तव्य. पितृधर्म, मातृधर्म, पुत्रधर्म, राजधर्म, सेवकधर्म, पत्नीधर्म असे शब्द त्याच अर्थाने वापरले जातात. आपण धर्माला वेगळाच रंग दिला. परंतु भगवंताला अभिप्रेत असलेला धर्म म्हणजे कर्तव्य. प्रत्येकाला काही न काही विशिष्ट कामासाठी पृथ्वीतलावर पाठवले आहे. ते ही नरदेहात. ते काम न करता आपण वेगळ्याच गोष्टीत वेळ वाया घालवतो.

आपापली कर्तव्ये प्रत्येकाने चोख बजावली तर समाजात केवढे स्वास्थ्य नाडेल! संघर्ष, कटुता, मतभेद नावालाही राहणार नाहीत. कारण जो तो आपल्या विहित कर्तव्यधर्मात आनंदाने मग्न झालेला असेल.

युगे अठ्ठावीस वीटेवरी उभा, ही आरतीसुद्धा पुत्रधर्माची महती सांगणारी आहे. आपल्या आईवडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकाकडे प्रेमाने पहात अठ्ठावीस युगे ते सावळे परब्रह्म आदिमायेसद वीटेवर न विटता उभे आहे. परमात्मा प्रेमस्वरूप आहे. म्हणून त्याला प्रेम केलेले खूप आवडते. 

श्रीगुरुचरित्रासारख्या वेदतुल्य ग्रंथवाचनानंतरही एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे श्री नरसिंह सरस्वतींच्या कडक संन्यासी गादीसमोरही प्रेमळ अन भोळे भक्त त्रिविक्रम भारती, नरहरी, तंतुक, सामदेव, गंगाबाई, नंदी, पर्वतेश्वर, भास्कर या शिष्यांचा उद्धार झाला, पण अहंकारी त्रिवेदी, चतुर्वेदी जयपत्र मागणार हेकट, गर्विष्ठ शिष्य ब्रह्मराक्षस झाले. म्हणून मी पणा टाकून सहकार्याने काम केले, स्वत:बरोबर इतरांचा विचार केला, की आपोआप सर्वांचा उद्धार होतो. 

या जगात अनेक जीव प्रेमासाठी, आपुलकीसाठी, दोन शब्दांसाठी, मायेच्या स्पर्शासाठी आसुसले आहेत. एवढेच काय, तर देवही भावाचा भुकेला आहे. अशा भावभुकेल्या भगवंताला चराचरात सर्वत्र शोधून प्रेमभराने त्याची सेवा केल्यास पातक नावाला उरणार नाही. चित्त समाधानाने ओसंडून जाईल. आणि नरजन्म कृतार्थ होईल. सरकारी राजमार्गावरून प्रवास करणाराच जसा सुरक्षितपणे मुक्कामावर पोहोचतो तसा अनधिकृत आडवाटेने जाणारा मुक्काम गाठू शकत नाही. जो धर्माने वागतो, त्याचे धर्म रक्षण करतो. 'धर्मो रक्षति रक्षित:'

म्हणून आपण आपले काम प्रामाणिकपणाने करणे, स्वत:शी आणि दुसऱ्याशी खोटे न बोलणे, ईश्वराला साक्षी ठेवून प्रत्येक काम करणे आणि केलेले काम त्याला समर्पित करणे, हा भाव जागृत ठेवणे, हे धर्मपालन आपण करूया. आपल्या प्रेरणेने इतरांना धर्मकार्यार्थ प्रेरणा मिळेल आणि सत्कार्याची साखळी बनत जाईल. साने गुरुजी म्हणतात, 

खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे।।
जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पद दलित
तया जाऊन उठवावे। जगाला प्रेम अर्पावे।।

सदा जे आर्त ‍अति विकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे। जगाला प्रेम अर्पावे।।

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावे। जगाला प्रेम अर्पावे।।

प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे। जगाला प्रेम अर्पावे।।

असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे
परार्था प्राणही द्यावे। जगाला प्रेम अर्पावे।।

 

Web Title: What is religion? Which religion does God like? What is your true religion? Know this.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.