'दत्त येवोनिया उभा ठाकला' असा प्रसंग खरोखरच कधी आपल्या बाबतीत घडले तर काय करावे? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 03:01 PM2023-02-23T15:01:43+5:302023-02-23T15:02:02+5:30
तिथी न सांगता येतो तो अतिथी आणि त्याला देवाची उपमा दिली जाते. गुरु दत्तात्रेय असेच न सांगता, कळवता आपल्या हाकेला धावून येतात असे वर्णन आहे!
हिंदू धर्मात अनेक प्रकारची उपास्य दैवते आहेत. त्यांच्या संख्येवरून बऱ्याचदा लोक कुचेष्टाही करतात. पण, काय करणार, आपल्या संस्कृतीने चराचरात भगवंत बघायला शिकवला म्हटल्यावर, तो भक्तागणिक सगुण रूप घेणारच! जया जैसा भाव, तया तैसा अनुभव! म्हणून तर कोणी कृष्णाची उपासना करतो, तर कोणी रामाची, कोणी देवीची करतो, तर कोणी पांडुरंगाची. भगवंताचे सगुण रूप वेगवेगळे दिसत असले, तरीदेखील अखिल विश्वात व्यापून राहिलेले निर्गुण तत्त्व एकच आहे. संत एकनाथ महाराजांना ते दत्त रूपात दिसले. त्यांनी केलेले वर्णन आपण दत्ताची आरती स्वरूपात म्हणतो.
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा,
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा,
नेति नेति शब्द न ये अनुमाना,
सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना।
योगिराज दत्त हे विरक्त रूप आहे. दत्तगुरुंच्या अवती-भोवती असलेले चार श्वान, हे चार वेदांचे प्रतिक आहे. पाठीशी उभी असलेली गोमाता पृथ्वीचे प्रतिक आहे. स्वत: दत्तगुरु 'जटाजूट शिरी, पायी खडावा' घालून काषायवस्त्रधारी अर्थात भगवे वस्त्र धारण करून उभे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर कमालीची प्रसन्नता आहे. 'शांत माया मूर्ती पहाटेसारखी...' कधीही पाहिले, तरी तेच भाव. नुसत्या दर्शनाने मन शांत होते. अशी मूर्ती त्रिगुणात्मक आहे आणि त्रैलोक्यीचा राणा आहे. त्यांच्या ठायी ब्रह्मा, विष्णू, महेश एकवटले आहेत. त्यांचे ध्यान करताना योगिजनांची समाधिस्थ अवस्था होते आणि 'आरती ओवाळिता हरली भवचिंता', अशी प्रचिती येते.
सबाह्य अभ्यंतरी, तू एक दत्त,
अभाग्यासी कैची, कळेल ही मात,
पराही परतली, तेथे कैचा हेत,
जन्म-मरणाचा पुरलासे अंत।।
नाथ महाराज म्हणतात, 'तुझे ध्यान आठवावे, त्याचे चिंतन करावे, तर तू आम्हाला देहाच्या आत आणि बाहेरही दिसू लागतोस. तुझा सहवास घडू लागतो. मात्र, या गोष्टी सांगून होणार नाहीत, त्याची अनुभूती घ्यावी लागते. आणि जो कोणी हा दत्तसहवास अनुभवतो, त्याच्या मनातले अद्वैत कायमचे संपून जाते. परा वाणीने आपण बोलतो. परंतु जीभेचे आणखी तीन प्रकार आहेत. आपण उपहासाने म्हणतोही, `बोलतो एक, वागतो एक' म्हणजेच परा वाणीने बोलत असलो, तरी पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या वाणींशी एकवाक्यता असेलच असे नाही. मात्र, दत्तउपासनेमुळे ती एकवाक्यता येते आणि जन्मभर दत्तसेवेचे व्रत अंगिकारले जाते.
दत्त येवोनिया उभा ठाकला,
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला,
प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिधला,
जन्ममरणाचा फेरा चुकविला।।
नाथ महाराजांनी जनार्दन स्वामींकडे दत्त दर्शनाचा हट्ट धरला. जनार्दन स्वामी म्हणाले, 'योग्य वेळ आली, तुझी उपासना पूर्ण झाली, की दत्त आपणहून दर्शन देतील. आणि ती वेळ आली, तेव्हा फकीर वेशात दत्त गुरु आले आणि जनार्दन स्वामींनी नाथांना त्यांची ओळख करून दिली. त्यावर नाथ महाराज म्हणतात, 'मला त्रिगुणात्मक स्वरूपातील दत्ताचे दर्शन घडवा.' भक्ताचा हट्ट भगवंताने पुरविला आणि पुढच्याच क्षणी 'दत्त येवोनिया उभा ठाकला!' नाथांचे हात आपसुक जोडले गेले. दत्तकृपा झाली आणि गुरुकृपेने व दत्तकृपेने जन्माचे सार्थक झाले.
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान,
हरपले मन झाले उन्मन,
मी तू पणाची झाली बोळवण,
एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान।।
दत्त उपासनेची ज्याला ओढ लागते, त्याला अन्य कोणत्याही विषयात रस उरत नाही. त्या जीवाला उन्मनी अवस्था प्राप्त होते. भक्त कोण आणि भगवंत कोण, हे पाहणाऱ्याला कळत नाही. एवढी एकरूपता दिसून येते. हे सुख, ही अवस्था केवळ गुरुकृपेने प्राप्त होते आणि त्रैलोक्यराणाचे सान्निध्य प्राप्त होते.
ते सुख सर्व दत्त भक्तांना प्राप्त व्हावे, हीच गुरुचरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!