पुराणांत पापमोचनी एकादशीचे महत्त्व काय आहे? या तिथीचे पूजा आणि विधी जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 09:22 AM2021-04-03T09:22:28+5:302021-04-03T09:23:18+5:30
एकादशीचे पवित्र व्रत केले असता, मनातील विकार नष्ट होतात. तसेच पापमोचनी एकादशी व्रत केले असता, आजवर घडलेल्या पापातून मुक्तता होते आणि मनावरील दडपण दूर होते.
पापमोचनी एकादशी ही नावाप्रमाणे सर्व पापांचे नाश करणारी एकादशी आहे. हे व्रत सर्वांनी केले पाहिजे असे पुराणात म्हटले आहे. आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे परिमार्जन व्हावे यासाठी हे व्रत केले जाते. असे म्हणतात, कितीही प्रतिकूल परिस्थिती असो, त्या परिस्थितीत हे व्रत भक्तिभावाने केले असता भगवंताची कृपा लाभते. येत्या ७ एप्रिल रोजी बुधवारी पापमोचनी एकादशी आहे. योगायोगाने त्याच दिवशी जागतिक आरोग्य दिनसुद्धा आहे. एकादशीचे व्रत आरोग्यदायी आहे. त्यामुळे हे व्रत केले असता त्या दिवसाचे महत्त्व दोन्ही बाजूंनी पूर्ण होऊ शकेल.
शास्त्रात एकादशी व्रताला अतिशय महत्त्व दिले आहे. हे व्रत केल्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रहांचा दुष्परिणाम कमी होऊन चांगले आयुरारोग्य लाभते. कारण ही तिथी भगवान विष्णू यांची आवडती तिथी आहे. त्यामुळे हे व्रत करणाऱ्याला विष्णूंची कृपा प्राप्त होऊन चन्द्र, मंगळ, शनी आदी ग्रहांकडून होणाऱ्या विपरीत प्रभावापासून स्वतःचा बचाव करता येतो. या व्रताचा परिणाम शरीरावर आणि मनावर पडतो. एकादशीचे पवित्र व्रत केले असता, मनातील विकार नष्ट होतात. तसेच पापमोचनी एकादशी व्रत केले असता, आजवर घडलेल्या पापातून मुक्तता होते आणि मनावरील दडपण दूर होते. अजाणतेपणी झालेल्या चुकांची देवाकडे क्षमा मागून आयुष्याची नवी सुरुवात करता येते.
पूजा आणि विधी : फाल्गुन कृष्ण एकादशीला येणारी तिथी पापमोचनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या एकादशीला भगवान विष्णूंना पिवळे फुल वहावे आणि नवग्रहांची देखील पूजा करावी. दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी एकादशीचा उपास सोडावा. उपासाला फलाहार करावा, बाकी पदार्थ खाऊ नयेत. 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' हा भगवान महाविष्णूंचा जप करावा. तसेच विष्णू सहस्रनाम आणि नवग्रह स्तोत्र यांचे पठण किंवा श्रवण करावे.
पापमोचनी एकादशीचा शुभ मुहूर्त
एकादशी तिथि प्रारम्भ- ०७ एप्रिल सकाळी २.०९ मिनिटांपासून
एकादशी तिथि समाप्त- ०८ एप्रिल सकाळी २. २८ मिनिटांपर्यंत