खरे सौंदर्य कोणते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 05:11 AM2020-06-20T05:11:05+5:302020-06-20T05:11:13+5:30
मूर्ख केवळ बाह्यसौंदर्य पाहतात; पण विद्वान मात्र आंतरिक सौंदर्याला पाहतात. आज आपणही कदाचित हेच करत आहोत, नाही का?
- नीता ब्रह्मकुमारी
आजचे युग स्पर्धेचे आहे. अनेक स्पर्धांमध्ये मनुष्य कळत-नकळत भाग घेत आहे. रूप आणि रूपया या दोघांची स्पर्धा अधिकच दिसून येते. आज व्यक्तीची पसंद आणि ओळख या दोन गोष्टींनीच केली जाते. कधीकाळी एखाद्या व्यक्तीची निवड त्याच्या गुणांनी, संस्कारांनी होत असे; पण आज गुण असो वा नसो, रूपवान असणे गरजेचे मानले जाते. बुद्धी असो वा नसो, धनवान हवे ही मान्यता सगळ्यांमध्ये दिसून येते; परंतु खरे सौंदर्य कोणते? आज जागोजागी ब्युटीपार्लर आहेत. सौंदर्य टिकविण्यासाठी खटाटोप केला जातो; पण कोणते सौंदर्य जपावे याची समज नाही. लहानपणापासून चांगले दिसावे यासाठी खूप काही केले; पण चांगले बनण्यासाठी काय करावे हे कोणी सांगितले नाही. अष्टावक्र, सूकरात, अब्राहम लिंकन यांनी आपल्या गुणसौंदर्य, विचारसौंदर्य आणि जीवनसौंदर्याने बाह्यसौंदर्यावर मात केली. एखाद्या व्यक्तीने महान कार्य केले तर आपण त्याचा गुणगौरव करताना श्रीफळ अर्थात नारळ देतो. देवळातसुद्धा भगवंताला श्रीफळ चढविले जाते. या नारळाला ‘श्रीफळ’ म्हणण्यामागचा उद्देश बघितला तर आंतरिक सौंदर्यच आहे. बाहेरून कितीही कुरूप दिसत असणारे आतून किती गुणवान असू शकते, याचे दर्शन या श्रीफळाने होते. एकदा जनक राजाने दरबारात विद्वानांची सभा बोलावली. त्या सभेत अष्टावक्र याचे आगमन झाले. पूर्ण सभा हसू लागली. त्यांचे हसणे बघून अष्टावक्रसुद्धा हसू लागले. राजा जनक यांना हसण्याचे कारण मात्र कळलं नाही. ते त्या विद्वानांना विचारतात की, तुम्ही का हसत आहात? विद्वान उत्तर देतात की, ‘या विद्वानांच्या सभेत वेड्या-वाकड्या अंगाच्या व्यक्तीला बघून हसू सुटले.’ मग राजा जनकने अष्टावक्रला हसण्याचे कारण विचारले. अष्टावक्र उत्तरले, ‘राजा मला वाटले की तू विद्वानांची सभा बोलावली आहेस; पण ही तर मुर्खांची सभा आहे. मूर्ख केवळ बाह्यसौंदर्य पाहतात; पण विद्वान मात्र आंतरिक सौंदर्याला पाहतात. आज आपणही कदाचित हेच करत आहोत, नाही का?