जे आहे, ते बदलेलच...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 05:07 AM2020-10-06T05:07:47+5:302020-10-06T05:08:19+5:30

एक साधा प्रश्न नेहेमी आपल्या मनात ठेवावा. कोणताही प्रसंग समोर आला (त्रास देणारा किंवा आनंदी करणारा) की हळूच आपल्या मनाला विचारावे.. ‘यामागे नक्की कुठला आशीर्वाद असेल बरं?

Whatever it is, it will change ... | जे आहे, ते बदलेलच...

जे आहे, ते बदलेलच...

googlenewsNext

- धनंजय जोशी

झेन साधनेतले सौंदर्य म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टींमधून आपल्याला शिकवण मिळून जाते. बुद्धाने सांगितले होते, सतत सर्व काही बदलत जात असते.. काहीच स्थायी नाही.

त्याला इंग्लिश शब्द आहे ‘इम्पर्मनन्स’! आपण जर नीट लक्ष देऊन बघितले तर आपल्याला ते सहज समजून येईल. समजा आपण सकाळी कामाला निघालो आणि वाटेत एक छानपैकी ट्रॅफिक जॅम लागला. गाडी अडकलेली ट्रॅफिकमध्ये ! आपल्या मनामध्ये काय काय विचार येत असतील ते बघावे. आधी राग येतो. का?- हे माझ्याच वाट्याला का, अशा विचाराने ! मग आपल्या पुढे असलेला ड्रायव्हर गाडी इतक्या हळू का चालवतोय म्हणून आणखी राग ! एक ना दोन विचारांची माळ लागून जात असते. पण या रागाने तडतडण्यामागचे खरे कारण काय?- तर, जे आहे ते स्वीकारून आपण शांत बसू शकत नाही, हे ! हा ट्रॅफिक जॅम कायम असणार नाही हे साधे सत्य आपण का समजून घेत नाही? अशा वेळी माझे गुरु सांगायचे, ‘जस्ट फोकस आॅन युअर ब्रेथ - फक्त

श्वासाकडे लक्ष द्यावे, आपल्या मनामध्ये जे काही विचार येत असतील त्यांच्याकडे बघावे. मग आपल्याला आपोआप समजून येईल, ‘अरे, हे सगळे केव्हातरी बदलणार. मग मीच माझ्या मनाला उगाचच त्रास कशाला करून घेऊ? बघूया तरी पुढे काय होते ते !’- असे म्हटले, तर आपण स्वत:कडे बघून हसू लागतो. माझे गुरु सांगायचे, ‘प्रत्येक अनुभवामागे एक सुंदर शिकवण असते. त्याला आपण एक प्रकारचा आशीर्वाद मानायचा असतो. मग तो अनुभव कितीही कठीण, त्रासदायक, मनाला निराश करणारा, गोंधळून टाकणारा असो ! तो अनुभव म्हणजे वर्तमानाचे खरे स्वरूप - ‘इम्पर्मनन्स’ - समजून घेण्याची आणि आत्मसात करण्याची संधी असते!’

एक साधा प्रश्न नेहेमी आपल्या मनात ठेवावा. कोणताही प्रसंग समोर आला (त्रास देणारा किंवा आनंदी करणारा) की हळूच आपल्या मनाला विचारावे..
‘यामागे नक्की कुठला आशीर्वाद असेल बरं?

Web Title: Whatever it is, it will change ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.