आयुष्याच्या अखेरच्या क्षणी तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता, त्याच योनीत पुनर्जन्म मिळतो!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 01:53 PM2023-04-10T13:53:10+5:302023-04-10T13:54:44+5:30

हिंदू धर्मात पुनर्जन्मावर लोकांचा विश्वास असतो आणि पुढचा जन्म कोणत्या योनीत मिळेल याबद्दल उत्सुकता असते, त्यावर हे उत्तर!

Whatever you think of at the last moment of life, will reborn in the same species! | आयुष्याच्या अखेरच्या क्षणी तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता, त्याच योनीत पुनर्जन्म मिळतो!

आयुष्याच्या अखेरच्या क्षणी तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता, त्याच योनीत पुनर्जन्म मिळतो!

googlenewsNext

मरणोत्तर मोक्ष मिळावा अशी आपली अपेक्षा असते. त्यासाठी जिवंतपणी सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची आपली खटपट सुरु असते. मोक्ष कधी मिळतो, तर श्वास बाकी आहेत पण इच्छा पूर्ण झाल्या तर मोक्ष आणि श्वास संपले पण इच्छा बाकी राहिल्या तर पुनर्जन्म! आपल्या इच्छा-अपेक्षांची यादी पूर्ण होत नाही. म्हणूनच आपण परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. हा जन्म कुठल्या योनीत मिळतो हे जाणून घेण्यासाठी वाचा पुढील कथा...!

एकदा महर्षी नारद आणि भगवान विष्णू वेषांतर करून पृथ्वीवर अवतीर्ण झाले. तिथून चालत असताना नारद म्हणाले, देवा तुमचे भक्त गरीब आणि लोकांना लुबाडणारे, फसवणारे, त्रास देणारे श्रीमंत का? त्यामागचे कारण विष्णूंनी नारदांना सोदाहरण पटवून दिले. 

नारदांना घेऊन भगवान विष्णू फकिराच्या वेशात एका धनिकाच्या घराजवळ आले. भिक्षेची याचना करू लागले. धनिक बाहेर आला आणि काही बाही बोलून त्यांने दोघांना हाकलून लावले. भिक्षा तर दूरच पण अतिथी धर्माचेही पालन त्याने केले नाही. नारदांना वाटले आता विष्णू रागावणार आणि त्याला राजाचा रंक बनवणार, मात्र झाले उलटच! विष्णूंनी त्याला आणखी धनवान हो असा आशीर्वाद दिला. 

तिथून ते दोघे एका आजीच्या झोपडीत गेले. आजींनी त्यांना आत बोलावले. बसायला पाट दिले व म्हणाली. महाराज माझ्या कडे तुम्हाला खाऊ घालायला काही नाही, परंतु माझ्याकडे दुभती गाय आहे, मी तुम्हाला भिक्षा म्हणून पेलाभर दूध देते. देवाने तिची सेवा मान्य केली आणि निघाले. त्या सेवेने तृप्त होऊन विष्णू भगवान तिला आशीर्वाद देतील असे नारदांना वाटले, तर तिथेही उलटच झाले. भगवान म्हणाले, 'आजी काही दिवसातच तुमची गाय मृत्युमुखी पडणार आहे.'

हे ऐकून चकित झालेल्या नारदांनी विष्णूंना विचारले, देवा तुमचा न्याय असा कसा? विष्णू म्हणाले, 'नारदा, धनिकाला माझ्यापेक्षा पैसा प्रिय, तो शेवट्पर्यंत पैसा पैसाच करणार. त्यामुळे तो मोक्ष प्राप्ती तर करणार नाहीच, उलट पुढच्या जन्मी तिजोरीची राखण करत साप होऊन या पृथ्वीतलावर जन्म घेईल. याउलट त्या आजीचा जीव गायीमध्ये अडकला होता. तिला मोक्ष हवा होता, परंतु आपल्यानंतर गायीचा सांभाळ कोण करणार याची तिला काळजी होती. तिची काळजी मिटवून तिचा मोक्षाचा मार्ग मोकळा केला. 

म्हणून अवास्तव अपेक्षा न ठेवता जोवर श्वास सुरु आहेत तोवर इच्छा संपवण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकण्यापेक्षा मोक्षाची प्राप्ती होईल. 

Web Title: Whatever you think of at the last moment of life, will reborn in the same species!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.