ज्यावेळी सगळे प्रयत्न संपतात, तेव्हा देवावर भार टाकून निश्चिंत व्हा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 2, 2021 02:56 PM2021-02-02T14:56:56+5:302021-02-02T14:57:43+5:30

पंख चिमणीचे असले, तरी जिद्द गरुड भरारी घेण्याची हवी.

When all efforts are over, put your burden on God and relax! | ज्यावेळी सगळे प्रयत्न संपतात, तेव्हा देवावर भार टाकून निश्चिंत व्हा!

ज्यावेळी सगळे प्रयत्न संपतात, तेव्हा देवावर भार टाकून निश्चिंत व्हा!

Next

प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. परंतु, जिथे प्रयत्न संपतात, तिथे देवावर आणि दैवावर भार टाकण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच उरत नाही. जो प्रयत्न करतो, त्याला परमेश्वर साथ देतो. म्हणून प्रयत्नांती परमेश्वर म्हटले आहे. कोणत्याही अवघड परिस्थितीत आपण प्रयत्नच केले नाहीत, ही खंत मनात राहता कामा नये. यासाठी आधी प्रयत्न करा, बाकी परमेश्वरावर सोपवा, जसे या छोट्याशा चिऊताईने सोपवले.

महाभारताचा प्रसंग होता. कुरुक्षेत्राची तयारी केली जात होती. कुठे काही खड्डे, खाच खळगे राहिले नाहीत ना, याची पाहणी करण्यासाठी स्वत: भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह कुरुक्षेत्रावर पोहोचले. तेवढ्यात एक चिमणी उडत उडत श्रीकृष्णाजवळ आली. ती म्हणाली, `भगवंता, या मनुष्यांच्या भांडणात आम्हा मूक जीवांना शिक्षा का? मी आणि माझी पिले कुणाच्याही अध्यात मध्यात नसताना या समराचे दुष्पपरिणाम आमच्या कुटुंबालाही झेलावे लागत आहेत. तुमच्या हत्तीदळातल्या एका हत्तीने एका ढुशात रणभूमीवरील झाड पाडले आणि झाडावरील माझे घरटे पिलांसकट जमीनिवर आले. माझ्या तान्ह्या बाळांना घेऊन मी कुठे जाऊ? भगवंता आता तुमच्याच आशेवर आम्ही आहोत. असे म्हणत चिमणी निघून गेली. श्रीकृष्णाचे डोळे पाणावले. अर्जुनाने कारण विचारले. श्रीकृष्ण काहीच बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशीपासून युद्ध सुरू होणार होते.

सगळे रणधुरंधर कुरुक्षेत्रावर पोहोचले. त्यावेळेस श्रीकृष्णाला चिमणीची आठवण झाली. युद्ध सुरू झाले, की ते इवलेसे जीव हकनाक बळी पडतील. या विचाराने कृष्णाने अर्जुनाच्या हातातील धनुष्य आणि बाण घेतले आणि दूर अंतरावर उभ्या असलेल्या हत्तीवर निशाणा धरला. हे पाहून अर्जुनाने कृष्णाला आठवण करून दिली, `भगवंता तुम्ही शस्त्र हाती घेणार नाही, असे वचन घेतले आहे.'

यावर श्रीकृष्णांनी काही न बोलता बाण सोडला. तो बाण हत्तीला न लागता त्याच्या गळ्यातल्या घंटेला लागला आणि गळ्यातली दोरी तुटून घंटा जमीनिवर पडली. काही काळात घमासान युद्ध सुरू झाले. तब्बल अठरा दिवस चालले. अनेकांचे प्राण गेले. कौरव संपले. पांडव जिंकले. 

दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण आणि अर्जुन पुन्हा रणभूमीची पाहणी करण्यासाठी निघाले. कुरुक्षेत्रावर रक्त मांसाचा चिखल पडलेला. ते पाहून अर्जुनाचे मन विदीर्ण झाले. एके ठिकाणी कृष्णाने रथ थांबवून अर्जुनाला रथापुढे आलेली घंटा उचलायला सांगितली. अर्जुनाने प्रतिप्रश्न न करता रथातून उतरून जड घंटा उचलली. घंटा उचलताच त्यातून चिमणी आणि तिची पिल्लं भेदरलेल्या अवस्थेत दिसली. एवढ्या मोठ्या गदारोळातही या इवल्याशा जिवांना जीवदान कसे मिळाले, या विचाराने आश्चर्यचकित होत अर्जुनाने कृष्णाकडे पाहिले, तर त्यावेळेस त्या पिलांची आई उडत कृष्णाजवळ आली आणि त्यांचे जीव वाचवल्याबद्दल आभार मानत होती. 'भगवंता, जे कोणीही करू शकले नसते, ते तू करून दाखवलेस. आमच्यासारख्या चिमुकल्या भक्तांची एवढ्या कठीण प्रसंगात काळजी घेतलीस. माझा विश्वास आणि माझी भक्ती राखलीस. जसा माझ्या मदतीला धावून आलास, तसाच प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून जा. त्यांचे रक्षण कर आणि त्यांच्या प्रयत्नांना, जगण्याच्या उम्मेदीला बळ दे...!'

चिमणीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपणही प्रयत्नांची पराकाष्टा केली पाहिजे. तरच आयुष्याच्या युद्धभूमीवर आपणही तग धरून जिवंत राहू शकू. 

Web Title: When all efforts are over, put your burden on God and relax!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.