जेव्हा सगळे मार्ग बंद झाले असे वाटेल, तेव्हा 'हा' मार्ग निवडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 06:10 PM2021-05-28T18:10:24+5:302021-05-28T18:15:20+5:30
स्वत:च्या प्रयत्नांवर विश्वास आणि देवावर अतूट श्रद्धा ठेवा. सगळे दिवस सारखे नसतात. प्रत्येक अडचणींतून मार्ग निघतोच. तो मिळेपर्यंत श्रद्धा आणि सबुरी हाच मार्ग निवडावा लागतो.
आयुष्यात जेव्हा अडचणीतून बाहेर पडण्याचे सगळे मार्ग बंद झाले असे वाटेल, तेव्हा क्षणभर थांबा, विचार करा कारण एक तरी मार्ग तुम्हाला नव्या वाटेकडे निश्चितच घेऊन जाईल. अशा वेळी गरज असते, ती श्रद्धा आणि सबुरीची!
स्वत:ला सिद्ध करण्यासाठी घर दार सोडून बाहेर पडलेला एक मुलगा कामाच्या शोधात गावोगावी फिरत होता. परंतु काम तर दूरच, त्याची दोन वेळेच्या जेवणाचीही अडचण होऊ लागली. वाटेत त्याला एक साधू भेटले. तो त्यांना म्हणाला, `मला मार्ग दाखवा.'
साधू म्हणाले, `तुझा मार्ग तुला स्वत:लाच शोधावा लागेल आणि शोधलास तर तुला तो नक्की सापडेल.'
मुलगा म्हणाला, `पण महाराज, इतके दिवस मी तेच करत होतो. आता मात्र मी हरलो.'
साधू म्हणाले, `ज्या वेळेस आपण स्वत:च हरलो असे मान्य करतो, तेव्हा जिंकायची दारे आपण स्वत:हून बंद करत असतो. तुला अडचणींवर मात करत स्वत:चा मार्ग धुंडाळावा लागेल. त्यासाठी श्रद्धा आणि सबुरी ठेव.'
मुलाने साधू महाराजांना नमस्कार केला आणि तो कामाच्या शोधार्थ भटकू लागला. त्याने मनाशी ठरवून टाकले, काहीही झाले तरी काम करायचे, पण फुकटचे मागून जगायचे नाही. भीक तर अजिबात मागायची नाही.
मुलाच्या या निश्चयामुळे त्याची पडेल ते काम करण्याची मनाची तयारी झाली होती. त्यामुळे विविध प्रकारच्या संधीदेखील त्याच्यासमोर उपलब्ध होऊ लागल्या. फक्त त्याला संधी ओळखण्याची गरज होती.
त्याला खूप भूक लागली होती. तो एका वडापावच्या गाडीसमोर जाऊन थांबला. खिशात पैसे नव्हते पण पोटात भूक होती. गाडीमालकाने त्याला दया दाखवत वडापाव दिला, पण त्याने तो नाकारला. तो म्हणाला, `काही काम असेल तर मी ते करायला तयार आहे. माझ्या कामाच्या मोबदल्यात मला खायला द्या, पण फुकट नको.'
त्याची प्रामाणिकता पाहून मालकाने त्याला कामाला ठेवून घेतले. तो मन लावून मेहनत करू लागला आणि दिवस रात्र एक करून कमाई करू लागला. व्यवसायात मदतनीस म्हणून काम करता करता त्याने व्यवसायातील बारकावे शिकून घेतले आणि पैशांची जुळवाजुळव करत स्वत:ची वडापावची गाडी टाकली. पाहता पाहता त्याचे प्रस्थ एवढे वाढले की अनेक शहरांतून त्याच्या वडापाव ब्रँडच्या शाखा सुरू झाल्या. एक दिवस त्या मुलाची आणि साधू महाराजांची पुनश्च गाठ पडली. तेव्हा मुलाने त्यांना ओळख दिली, त्यावर महाराज म्हणाले, 'तू स्वत:वर विश्वास ठेवलास म्हणून अडचणीतून मार्ग शोधलास, तू तेव्हाच हार पत्करली असतीस, तर तू कधीच या जगाला निरोप दिला असतास.'
म्हणून स्वत:च्या प्रयत्नांवर विश्वास आणि देवावर अतूट श्रद्धा ठेवा. सगळे दिवस सारखे नसतात. प्रत्येक अडचणींतून मार्ग निघतोच. तो मिळेपर्यंत श्रद्धा आणि सबुरी हाच मार्ग निवडावा लागतो.