भजन, कीर्तनात टाळ्या वाजवण्याची प्रथा कधी आणि कशी सुरू झाली? त्याचे लाभ कोणते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 01:29 PM2023-10-20T13:29:40+5:302023-10-20T13:31:12+5:30
टाळी वाजवणे हा व्यायाम आहे हे आपण जाणतो, मात्र भजनात त्याचा समावेश कसा झाला हे जाणून घेणेही उत्सुकता वाढवणारे ठरेल.
आनंदाच्या भरात टाळ्या वाजवणे ही अन्योन्य क्रिया आहे असे म्हणता येईल. एखादी छान बातमी कळली, काही छान बघायला मिळाले, आवडती व्यक्ती समोर आली तर आपण आपल्याही नकळत टाळी वाजवून आनंद व्यक्त करतो. एवढंच काय तर वैद्यकीय क्षेत्रात त्याला क्लॅपिंग थेरेपी असेही म्हणतात. आपल्या शरीरात एकूण ३४० प्रेशर पॉईंट असतात. ज्यातील २९ आपल्या हातांमध्ये असतात. एका तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रेशर पॉईंटबाबत माहिती घेता येते आणि केवळ टाळ्या वाजवून प्रेशर थेरपीचा फायदा घेतला जाऊ शकतो. हे प्रेशर पॉईंट्स शरीराच्या वेगवेगळ्या भागांना थेट जोडले गेलेले असतात. त्यामुळे टाळ्या वाजवून वेदनांपासून सुटका मिळवू शकतो. या थेरेपीबद्दल अधिक जाणून घेण्याआधी याचा समावेश भजन कीर्तनात कसा झाला ते पौराणिक कथेतून जाणून घेऊ.
भक्त प्रल्हादाची गोष्ट आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. त्याचे वडील हिरण्यकश्यपू हे राक्षस होते आणि त्यांच्या पोटी विष्णू भक्ताने जन्म घेतला हे त्याला सहनच होणारे नव्हते. भक्त प्रल्हादाला विष्णू भक्तीपासून परावृत्त करण्यासाठी हिरण्यकश्यपूने अनेक प्रयत्न केले. तो मंजिरी घेऊन भजन करतोय पाहून त्याच्या हातून मंजिरी घेऊन फेकून दिली. तो करताल घेऊन भजन करतोय पाहून करताल फेकून देई. असे अनेक प्रयोग झाल्यावर प्रल्हादाने चक्क दोन्ही हातांनी टाळ्या वाजवत विष्णू भक्ती करायला सुरुवात केली. ते पाहून हिरण्यकश्यपूचा नाईलाज झाला आणि नंतर त्याने प्रल्हादाला संपवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र भजनात टाळी वाजवत रंगून गेलेला प्रल्हाद पाहून लोकांनी टाळी वाजवून भजन करायला सुरुवात केली आणि ती प्रथाच रूढ झाली. म्हणजेच भजन, कीर्तनात टाळी वाजवण्याचा प्रघात भक्त प्रल्हादाने सुरू केला असे लक्षात येते.
मात्र अनेक जण टाळ्या वाजवण्यातही आळस करतात. परंतु टाळ्या वाजवण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेतले तर तुम्ही तुमच्या रोजच्या व्यायामात त्याचा आवर्जून समावेश कराल.
१) टाळ्या वाजवल्याने हृदय आणि फुफ्फुसासंबंधी अस्थमासारख्या समस्या दूर करण्यास मदत मिळते.
२) पाठदुखी, मानदुखी आणि सांधेदुखीपासून सुटका मिळते.
३) टाळ्या वाजवल्याने सांधीवात रोगापासून बचाव केला जाऊ शकतो.
४) लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी या थेरपीची मदत घ्यावी.
५) पचनक्रियेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी क्लॅपिंग थेरपीचा फायदा होतो.
६) क्लॅपिंग थेरपीमुळे लहान मुलांच्या कार्यक्षमतेचा विकास होतो आणि अभ्यासात सुधारणा होते. जी मुलं रोज टाळ्या वाजवतात त्यांना लिहिण्यात काही अडचण येत नाही.
७) टाळ्या वाजवल्याने मुलांचा मेंदु आणखी चांगलं काम करतो.
८) शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी ही थेरपी फायद्याची आहे.
९) रोज अर्धा तास टाळ्या वाजवल्याने सांधीवात, उच्च रक्तदाब, डिप्रेशन, डोकेदुखी, सर्दी, झोप न येणे, केसगळती आणि डोळ्यांशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते.
म्हणूनच कीर्तनात कथेकरी बुवा किंवा भजनात भजनी बुवा जवळपास अर्धा तास टाळ्या वाजवत भजन करवून घेतात. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा भजन कीर्तनाला जाल, तेव्हा टाळ्या वाजवताना अंगचोरपणा अजिबात करू नका, तरच स्वार्थ घडेल आणि परमार्थही!