बायकांच्या पोटात काहीच राहणार नाही, हा शाप कधी आणि कोणाला मिळाला? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 15:28 IST2025-04-05T15:27:47+5:302025-04-05T15:28:13+5:30
गोपनीयता ठेवता न येणं हा बायकांचा स्वभाव नाही तर त्यांना मिळालेला शाप आहे, पण कोणामुळे आणि कोणी दिला? जाणून घेण्यासाठी वाचा ही कथा!

बायकांच्या पोटात काहीच राहणार नाही, हा शाप कधी आणि कोणाला मिळाला? वाचा!
एखादी गोष्ट कोणी सांगू नको म्हटल्यावर कधी एकदा ती दुसऱ्याला जाऊन सांगते, असं बायकांच्या बाबतीत नेहमी घडतं! गोपनीयता ठेवणं हे त्यांच्या स्वभावातच नाही, की त्यांना मिळालेल्या शापामुळे तसे करणे शक्य होत नाही? जाणून घेऊ त्यामागची महाभारतातील कथा!
कुरुक्षेत्रावर युद्ध संपलं. पांडवांचा विजय झाला. मात्र युद्धात मृत्यमुखी पडलेल्या आप्तेष्टांचा अर्थात नातेवाईकांचा अंत्यसंस्कार करण्याची युधिष्ठिरावर वेळ आली. युधिष्ठिराने तर्पण करायला सुरुवात केली तेव्हा न राहवून माता कुंती म्हणाली, युधिष्ठिरा, कर्णाचेही तर्पण कर...
युधिष्ठिर काही बोलणार तोच माता कुंती म्हणाली, 'कर्ण तुझा मोठा भाऊ होता...हे गुपित मी आजवर कोणालाच बोलले नाही, कारण...'
असे म्हणत माता कुंतीने विवाहापूर्वी सूर्यदेवाच्या आशीर्वादाने मिळालेल्या मंत्राच्या उच्चारणामुळे झालेल्या पुत्राची कथा सांगितली. समाज त्याचा स्वीकार कारणार नाही म्हणून मी गंगा नदीत त्याला सोडून दिले हेही सांगितले.
यावर युधिष्ठिर रागावून म्हणाला, 'कर्ण आमचा मोठा भाऊ होता हे आधीच कळलं असतं तर आम्ही सन्मानाने त्याला नमस्कार केला असता आणि तेव्हाच युद्ध थांबलं असतं किंवा झालं नसतं. मात्र एवढं मोठं गुपित तू पोटात ठेवलंस... त्यामुळे माझा शाप आहे... की यापुढे कोणतीही स्त्री कोणतेही गुपित फार काळ पोटात ठेवू शकणार नाही. ती कधी ना कधी कोणाला ना कोणाला ते सांगून मोकळी होईल, पण लपवू शकणार नाही.'
या कथेमुळेच की काय बायकांना मनातलं सगळं कुणाला ना कुणाला जाऊन सांगण्याची उर्मी थांबवता येत नाही.