मन शुद्ध झाले की, जे काही कर्म घडेल, ते ही शुद्धच होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 02:39 PM2021-05-20T14:39:40+5:302021-05-20T14:40:06+5:30
आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी सारासार विचार करावा. कारण देह हा क्षणभंगूर आहे. आपण विचार करतो पण उद्धाराचा नाही, तर विषयाचा करतो. आपली बुद्धी विषय सुखाशिवाय इतर कशाचा विचार करावयास तयारच नसते..!
- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी
( बीड, महाराष्ट्र , ८७ ९३ ०३ ०३ ०३ )
वासनेची शुद्धी झाल्यावरच मन शुद्ध होते. एकदा का मन शुद्ध झाले की, मनाने जे काही कर्म घडेल, ते ही शुद्धच होईल. मन शुद्धीसाठी सारासार विचार हा ही एक महत्वाचा टप्पा आहे. मन निर्विचारी तर राहूच शकत नाही. सतत विचार करीत राहणे हा तर मनाचा स्वभाव आहे पण हा विचार करतांना सार काय आणि असार काय..? हिताचे काय आणि अहिताचे काय..? याचा विवेक हवा. विचार करा पण कोणता करा..? तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात -
क्षणो क्षणा हाचि करावा विचार । तरावया पार भवसिंधू ।
नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ॥
आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी सारासार विचार करावा. कारण देह हा क्षणभंगूर आहे. आपण विचार करतो पण उद्धाराचा नाही, तर विषयाचा करतो. आपली बुद्धी विषय सुखाशिवाय इतर कशाचा विचार करावयास तयारच नसते. कारण -
अनंत बुद्धीचे तरंग । क्षणाक्षणा पालटती रंग ।
धरुं जाता संग । तव तो होतो बाधक ॥
विषयसंग हाच तर आत्मज्ञानासाठी बाधक आहे. म्हणून विचारवंत लोकांच्या संगतीत (संतसंगतीत) जीवन घालविले तर विवेक प्राप्त होतो.
संत समागमी धरावी आवडी..!
माणसें प्रपंचाचा विचार करतात पण जो झालाच नाही त्याचा काय विचार करावयाचा..? हस्तामलक ग्रंथकार म्हणतात -
प्रपंच एक झाला होता । हें समूळचि मिथ्या वार्ता ।
पुढे होईल मागुता । हें कल्पांती घडेना ॥
आपण म्हणाल, प्रपंच असार आहे, तो झालाच नाही तर मग आम्हांला प्रपंच दिसतो व भासतो कसा..? तुकोबा म्हणतात -
रज्जू सर्पाकार । भासियले जगडंबर ॥
दोरीच्या ठिकाणी भासणारा साप नाहिसा होण्यासाठी तो काठीने मारावा लागेल का हो..? अहो..! त्याठिकाणी प्रकाश आणला की - साप किंवा दोरी याचे योग्य ज्ञान होईल..! तेव्हा जीवाला जन्म ही नाही आणि मरण ही नाही. मूळ कूटस्थ..!
त्याच्यावर अन्तःकरणाचा आश्रय केलेल्या कूटस्थाचा आभास आला की - त्यास जन्म म्हणतात व ते अन्तःकरण विस्कळीत होऊन आभासाचे भान नष्ट झाले की - त्यास मरण म्हणतात.
आपण तर स्वभावतःच मुक्त आहोत याचा विवेक असणे म्हणजेच - मना अंतरी सार विचार राहो..!
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
तरी माया ऐसी व्याप्ती । नसतीच यया आथी ।
का वांझेचि संतती । वानणें जैसे ॥
त्यामुळे अशी मिथ्या माया आणि तिच्यापासून झालेल्या मिथ्या संसाराचा विचार न करता सार विचार व असाराचा त्याग करावा असे श्रीसमर्थ रामदास स्वामी आपणांस प्रतिपादन करतात.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥