नृसिंह जयंती कधी आहे? अर्धा नर-अर्धा पशु अशा नृसिंह अवताराचे कारण काय असेल, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 08:00 AM2021-05-24T08:00:00+5:302021-05-24T08:00:02+5:30

नराचे प्रेम आणि सिंहाचे अविवेकी कार्य! नर आणि सिंह दोघांचे गुण एकत्र झाल्यावर नृसिंह अवतरित झाला आणि हिरण्यकशिपु मारला गेला.

When is Nrusinha Jayanti? Find out what is the reason for such a male incarnation, half male-half animal! | नृसिंह जयंती कधी आहे? अर्धा नर-अर्धा पशु अशा नृसिंह अवताराचे कारण काय असेल, जाणून घ्या!

नृसिंह जयंती कधी आहे? अर्धा नर-अर्धा पशु अशा नृसिंह अवताराचे कारण काय असेल, जाणून घ्या!

googlenewsNext

भगवान नृसिंह हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. नृसिंह जयंती हा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो. यंदा २५ मे रोजी नृसिंह जयंती आहे. या दिवशी भगवान नृसिंहाने स्तंभ फोडून आपला भक्त प्रल्हाद याचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतला. त्या प्रसंगाची आठवण म्हणून हा सोहळा साजरा केला जातो. नृसिंह जयंतीच्या दिवशी, भगवान नृसिंहाच्या बीज मंत्राचा जप केल्याने शत्रूंचा नाश होतो तसेच शत्रूवर सर्वतोपरी विजय मिळवता येतो. 

हिरण्यकशिपुने मागितलेल्या वरानुसार, `पशू, मानव, देव किंवा दानव यांच्याकडून मृत्यू होणार नव्हता. तसेच रात्र किंवा दिवस आणि बारा मास अशा कालावधीत त्याला मृत्यू येणार नव्हता. म्हणून नृसिंह अवतार घेऊन भगवान विष्णूंनी  अर्धा पशु, अर्धा मानव असा देह धारण केला. आकाश आणि जमीन यांचा मध्य म्हणून उंबरठ्यावर बसून, सायंकाळी आपल्या तीक्ष्ण नखांनी हिरण्यकशिपुचा वध केला. 

नृसिंह अवताराची सविस्तर कथा. 

आपणा सर्वांनाच भक्त प्रल्हाद माहित आहे. हिरण्यकशिपु नावाच्या दैत्याच्या उदरी जन्म घेऊनसुद्धा प्रल्हादावर देव-धर्माचे संस्कार झाले. कारण, प्रल्हादाची आई गर्भवती असताना महर्षि नारदांच्या आश्रमात होती. नारदांकडून तिने दैवी विचारांचे श्रवण केले होते. परिणामी असूर कुळात जन्माला येऊनही प्रल्हादाच्या मुखी नारायणाचे नाव होते. 

याच गोष्टीचा राग येऊन हिरण्यकशिपुने अनेकदा प्रल्हादाला नारायणाचे नाव न घेण्याची तंबी दिली. परंतु प्रल्हादाने खूप परिश्रम करून भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला होता़ भगवंताचे नावच शाश्वत आहे. त्यातच चिरंतन सुख आहे, हे लक्षात घेऊन त्याने बालवयातच तत्कालीन राजसत्तेच्या विरूद्ध बंडाचे निशाण उभारले. त्यामुळे त्याला जन्मदात्या पित्याचा रोष सहन करावा लागला. 

उंच पर्वतावरून खाली फेकले, विषारी सर्प डसविले, उकळत्या तेलात टाकले, तरी प्रल्हादाला कोणतीच इजा होत नाही पाहून, त्याच्या वडिलांचा आणखीनच संताप झाला. त्यांनी विचारले, `तुला कोण वाचवतो?' त्यावर प्रल्हाद म्हणाला, `सर्वव्यापी परमेश्वर. नारायण.' खांबाकडे करांगुली दाखवत, हिणवत हिरण्यकशिपुने विचारले, `यातही आहे का तुझा नारायण?' त्याने होकारार्थी मान डोलावताच त्या खांबातून अक्राळ-विक्राळ रूप धारण करत नससिंह प्रगट झाला आणि त्यानेच सर्व जनतेचा छळ करणाऱ्या हिरण्यकशिपुचा वध केला. 

अर्धा नर अर्धा पशु, अशा नृसिंह अवताराचे कारण काय असेल? - पांडुरंगशास्त्री आठवले 

पांडुरंग शास्त्री आठवले, 'दशावतार' या पुस्तकात, नृसिंह अवताराचा युक्तीवाद करताना म्हणतात, `एखाद्या समाजातून हा सिंहासारखा वीर उभा राहतो आणि त्याच्या बोलण्याने संपूर्ण समाजात एकप्रकारची उत्तेजना पसरते. शेकडो लोक त्याच्या पाठिशी उभे राहतात. सिंहासारखा क्रूर बनलेला, यशापयशाचा विचार न करता हा अविवेकी असंघटित समाज हिरण्यकशिपुवर तुटून पडला आणि त्याने त्याला मारून टाकले. नराचे प्रेम आणि सिंहाचे अविवेकी कार्य! नर आणि सिंह दोघांचे गुण एकत्र झाल्यावर नृसिंह अवतरित झाला आणि हिरण्यकशिपु मारला गेला. खांबाप्रमाणे निर्जिव असलेल्या एका स्तंभातून चैतन्य उसळून आले आणि भक्त प्रल्हाद  व समस्त जनता भयमुक्त झाली.'

त्यामुळे आपल्यालाही भयमुक्त व्हायचे असेल, तर विष्णूभक्ती शिवाय कोणताही पर्याय नाही.

Web Title: When is Nrusinha Jayanti? Find out what is the reason for such a male incarnation, half male-half animal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.