आपलीच जवळची माणसं आपल्याशी वाईट वागतात तेव्हा 'हा' प्रयोग करा, त्रास होणं थांबेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 06:02 PM2022-02-23T18:02:03+5:302022-02-23T18:02:17+5:30
'माझे माझे आणि झाले ओझे' अशी गत होण्याआधी स्वत:ला आवरा, सावरा, भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थितीशी दोन हात करताना पुढील प्रयोग करा!
थोड्या आनंदाच्या लहरी आपल्या वाट्याला येऊ लागल्या, की समजून जायचे, दु:खं पाठोपाठ दार ठोठवण्यासाठी येतच असेल. सुख-दु:खाचा पाठशिवणीचा खेळ सुरूच असता़े. सुख उपभोगताना जेवढा आनंद होतो, तेवढाच दु:खं पचवताना त्रास होतो. कारण, दु:खाचे कारण आपलेच जवळपासचे लोक असतात. ज्यांना आपण लळा लावला, त्यांनी आपला घात केला, हे कटूसत्य गळ्याखाली उतरत नाही. अहो आपणच काय, खुद्द धनुर्धर अर्जुनाला रणांगणावर याच गोष्टीचा त्रास झाला. युद्ध करायचे पण कोणाशी? आपल्याच भावंडांशी, गुरुजनांशी, नातलगांशी? मग यांना इतके दिवस आपण आपले का मानत होतो? अशा गोंधळलेल्या स्थितीत भगवान श्रीकृष्णांनी त्याची समजूत काढत म्हटले, `अर्जुना हे जगच असे आहे, तू ज्यांना आपले मानतोस, ते जर तुला आपले मानत असते, तर हातात तलवार, धनुष्य, गदा घेऊन तुझ्यावर चाल करून आले नसते. तू त्यांच्याबद्दल लोभ, मोह, शोक अशा सगळ्या भावना आवर आणि केवळ कर्तव्य म्हणून धर्मरक्षणार्थ युद्ध कर!'
अर्जुनाच्या सोबत स्वत: भगवंत होते. परंतु आपली समजूत काढायला देव किती वेळा येणार? रोजच्या जगण्यात आपलीही अवस्था अर्जुनासारखी होते. अशा वेळी भगवंतांनी अर्जुनाला दिला, तोच सल्ला आपल्याला लागू होतो. `माझे माझे आणि झाले ओझे' अशी गत होण्याआधी स्वत:ला आवर, सावर, भावनांवर नियंत्रण ठेव आणि परिस्थितीशी दोन हात कर. हेच तत्त्वज्ञान प्रख्यात लेखक व.पु.काळे यांचे 'वपुंची माणसं' हे पुस्तक वाचताना निदर्शनास आले. त्यात गजाभाऊ नामक पात्राच्या तोंडी वपुंनी आधुनिक भाषेत जगण्याचे मर्म समजावले आहे. कसे ते पहा-
आपण जो जन्म घेतला आहे, तो अपेक्षापूर्तीसाठीच नाही. आपल्या दुसऱ्यांकडूनच अपेक्षा असतात, असे नाही. आपल्या स्वत:कडूनही अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नाहीत. उरतात फक्त जाळणाऱ्या व्यथा. माझ्या मते हा जन्म अपेक्षापूर्तीसाठी नाही. हा जन्म परतफेडीसाठी आहे. तुमच्या सौभाग्यवती गेल्या. तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्यासाठी हा जन्म घेतलात. ह्याचा अर्थ, कोणत्या तरी जन्माची परतफेड झाली. तो अकाउंट संपला. ह्याच दृष्टिकोनातून सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा.
मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत. हीसुद्धा तुम्ही कोणती तरी परतफेड करत आहात. परतफेडीचा हिशेब या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हाला मरण नाही. तेव्हा मनातल्या परमेश्वराला उद्देशून- मला का जगवलंस? हा प्रश्न विचारू नका. कोणतीही व्यक्ती असो, तुमच्याशी विचित्र वागली, तिने तुमचा अपमान केला, दुर्लक्ष केलं, तुमच्या उपकारांचं कोणाला विस्मरण झालं, तर एकेक अकाऊंट पूर्ण झाला, असं आजपासून स्वत:ला सांगायला लागा. बँकेतली शिल्लक संपली की पासबुकावर अकाऊंट क्लोज्ड असा शिक्का मारतात. त्याप्रमाणे आपले किती अकाऊंट्स क्लोज्ड झाले, याचा विचार करा आणि पासबुकं जाळून टाका. परतफेडीचा एकही क्षण टाळू नका. प्रारंभी तुम्हाला हे जड जाईल. पण आपलं मन जेवढं बलदंड असतं, तेवढंच लवचिकही असतं. त्या मनाला सांगायचं, बाबा रे आयुष्यभर तुझं ऐकलं, तुझ्या हुकुमात राहिलो. आता ही गुलामी मी सोडून देत आहे. आजपासून मुक्त केले आहे.
हा प्रयोग करून बघा आणि किती खाती फटाफट बंद होतात, याची प्रचिती घ्या. मीसुद्धा तुम्हाला उद्या ओळख दाखवली नाही, तर तुमच्या पासबुकात माझी एकच एन्ट्री होती, असं समजा. मग कोणी कितीही त्रास दिला, तरी त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही.