देशासमोर अनेक आव्हाने असताना वेळ वाया घालवून चालणार नाही!- संत तुकडोजी महाराज!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 02:12 PM2023-11-02T14:12:05+5:302023-11-02T14:13:05+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत समस्त भारतीयांना उद्देशून लिहिलेल्या ग्रामगीतेतल्या 'या' दोन ओळी नक्कीच विचार करण्यासारख्या आहेत!
आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी. भारतीय समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्यांनी ग्रामीण भारताच्या विकासाला प्राधान्य दिले. नव्हे, तर आपले पूर्ण जीवनच या कार्यासाठी वाहून घेतले. कारण ऋषी आणि कृषी संस्कृती ही आपल्या देशाची पूर्वापार ओळख आहे. ग्रामीण समाज सशक्त व्हावा म्हणून त्यांनी अनेक खस्ता खाल्या. आपले विचार आपल्याबरोबर लोप पावू नयेत, म्हणूनच कदाचित त्यांनी सहज सोप्या भाषेत ग्रामगीता लिहिली असावी. त्यात एकूण ४१ अध्याय आहेत. पैकी भगवद्गीतेतल्या कर्मयोगाला समांतर अठरावा अध्याय आहे- श्रम संपत्ती. त्यातील एक ओवी वाचली असता क्षणभर विचार आला, तुकडोजी महाराजांच्या वेळी सोशल मीडिया नव्हते, हे सुदैवच म्हटले पाहिजे. अन्यथा त्यांनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला असता! अशी काय आहे ती ओवी? चला पाहू-
येथे विश्रांतीसी नाही वेळ, निरंतर कार्यकर्ते प्रबळ
पाहिजेत ठायीठायी सकळ, काम ऐसे देशापुढे।।
अर्थ स्पष्ट आहे- देशापुढे दारिद्रय, दैन्य, बेरोजगारीसारखे भस्मासुर उभे ठाकले असताना, विश्रांती घ्यायलाही वेळ नाही. एवढी कामे समोर आहेत. त्या कामांचा, प्रश्नांचा फडशा आपल्यालाच पाडायचाय. कोणी बाहेरची व्यक्ती येऊन हे प्रश्न सोडवणार नाही. म्हणून समाजातल्या सर्व स्तरातील लोकांनो संघटित व्हा आणि दिवस रात्र काम करा!
ग्रामगीतेतील प्रत्येक ओळीतून तुकडोजी महाराजांची राष्ट्रकार्याची तळमळ स्पष्ट दिसून येते. 'आधी केले, मग सांगितले', या उक्तीप्रमाणे त्यांनी स्वतः ग्रामविकासाला हातभार लावला आणि मग लोकांना उपदेश केला.
उद्योगपती नारायण मूर्ती यांनीसुद्धा याच तळमळीने तरुणांना आठवड्यातले ७० तास काम करण्याचा सल्ला दिला. त्यांनी स्वबळावर प्रगती केली आणि लाखो लोकांच्या हाताला रोजगार दिला. आपले कर्तृत्त्व सिद्ध केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. मात्र अर्थाचा अनर्थ करून घेत, गैरसमज पसरवत अनेक लोकांनी एवढ्या मोठ्या उद्योगपतीलाच बोल सुनावले, ट्रोल केले. या ट्रोलिंगमुळे नारायण मूर्तींचे काही नुकसान झाले नाही, मात्र त्यांच्यावर शेरेबाजी करणाऱ्यांनी आपल्या आयुष्यातल्या ७० तासांपैकी एक तास या प्रक्रियेत नक्कीच खर्च केला. परीक्षेच्यावेळी, प्रोजेक्ट सबमिशनचे वेळी, टार्गेट पूर्ण करायचेवेळी, डोक्यावर कर्जाचा बोजा असला की, खांद्यावर संसाराचा भार असला की आपणही मान पाठ एकत्र करून काम करतोच! मात्र हे केवळ संकटकाळी न करता सातत्याने करा, हा सल्ला कोणी दिला तर एवढे वाईट वाटून घेण्याचे कारण तरी काय? युद्धाची तयारी शांततेच्या काळात करावी असे म्हणतात. त्यांनीही तीच सूचना दिली, मात्र तिचा विपर्यास केला गेला.
सत्पुरुष जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांचे साधे शब्दही मंत्ररूप होतात. त्यांना काय म्हणायचे आहे हे कळत नसेल तर एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून ते समजून घेणे योग्य ठरते. उलटपक्षी त्यांनाच बोल लावून आपण त्यांचे नाही तर आपलेच नुकसान करून घेत आहोत असे समजावे. अर्थात अशा ट्रोलिंगमुळे हे महापुरुष बधत नाहीत. संत मंडळींना त्यांच्या हयातीत का कमी बोलणी खावी लागली? तरी त्यांनी आपले कार्य कधीच अर्धवट सोडून दिले नाही. त्यामुळे आपण आपल्याशी प्रामाणिक राहून सातत्याने काम करण्याची प्रेरणा जरी त्यांच्याकडून घेतली तरी पुष्कळ आहे. संत तुकडोजी महाराज लिहितात -
आपुला आपण उद्धार करावा, संतदेवाचा सहारा घ्यावा
हाच संतग्रंथांचा गवगवा, चित्ती धरावा सर्वांनी।।
सर्व मिळोनि एकत्र राहावे, सर्वांसी सर्वांस चालवावे,
सर्वभूतहीती रत व्हावे, ऐसेची वचन गीतेचे ।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भावपूर्ण नमन.