'या' सात गोष्टी एकत्र येतात तेव्हा तयार होतं एक ‘सुंदर जीवनशिल्प’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 08:30 AM2020-07-24T08:30:35+5:302020-07-24T08:38:13+5:30
आपलं जग आणखी थोडं मोठं होतं. नवी शाळा, मित्र, शिक्षक यांच्याशी जवळीक निर्माण होते. प्राथमिक नंतर मग माध्यमिक, असं टप्प्याटप्प्याने मोठे होत असतो.
- प्रल्हाद वामनराव पै
मित्रांनो, यशस्वी जीवनशिल्प घडविण्यासाठी आवश्यक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या सद्गुरूंनी दिलेल्या दिव्यसंदेशाप्रमाणे खरं तर आपण आपलं जीवनशिल्प नकळतपणे घडवीत असतोच, पण जर ते जाणीवपूर्वक योग्य दिशेने घडवलं तर ते अधिक उत्तम आणि सुंदर असेल. त्यासाठी आवश्यक सात गोष्टींची ओळख सद्गुरूंनी आपल्याला करून दिली आहे.
१) मी स्वत: २) जीवनतत्त्व ३) शिल्पकलेचे ज्ञान ४) उपकरणे ५) इच्छा ६) कल्पकता आणि ७) प्रयत्न! ह्या सात गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक ‘सुंदर जीवनशिल्प’ आकाराला येत. त्यापैकी एकाचा जरी अभाव असला तरी हवं तसं शिल्प तयार होणार नाही. चला, तर प्रत्येक घटकाची ओळख करून घेऊया. जीवनशिल्पाचा पहिला घटक आहे ‘मी स्वत:!’ म्हणजे शिल्प कोण घडवणार असा प्रश्न विचारला तर उत्तर काय असेल? ‘मी’ घडवणार ! हा मी कोण बरं? आणि तो कसा काय घडला? मित्रांनो, आपण प्रथम बाळाच्या रूपात जन्माला आलो तेव्हा अगदी छोटेसे असतो. मग हळूहळू मोठे होऊ लागतो. आईचे बोट धरून चालायला शिकतो. बोलायला शिकतो. मग बालवाडीत, प्राथमिक शाळेत जातो.
आपलं जग आणखी थोडं मोठं होतं. नवी शाळा, मित्र, शिक्षक यांच्याशी जवळीक निर्माण होते. प्राथमिक नंतर मग माध्यमिक, असं टप्प्याटप्प्याने मोठे होत असतो. या प्रत्येक टप्प्यावर जे जे शिकतो, जाणून घेतो, ज्ञान मिळवतो अन् मोठे होत असतो, त्या सर्वांनी मिळून बनलेला तो ‘मी स्वत:!’ हा ‘मी’ म्हणजेच आपण एक व्यक्ती म्हणून आपलं स्वत:चं जीवनशिल्प घडविणार आहोत. आपलं स्वत:चं जीवनशिल्प घडविणारे शिल्पकारदेखील आपणच आहोत. ते सुंदररीत्या घडविण्यासाठी आपणच प्रयत्न करायचे आहेत! म्हणून ‘मी स्वत:’ या जीवनशिल्पाचा अत्यंत महत्त्वाचा असा पायाभूत घटक आहे.