जेव्हा वाटते की आपली वेळ खराब आहे, तेव्हा वेळेलाही थोडा वेळ द्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 12:07 PM2021-12-27T12:07:50+5:302021-12-27T12:08:41+5:30
चांगल्या वेळेची आपण सगळेच वाट बघत असतो, पण ती वेळ येण्यासाठी थांबण्याची आपली तयारी नसते. त्यासाठी लांगणारा संयम अंगी बाणला, तर ती वेळही नक्कीच येईल. हेच शिकवणारी छोटीशी गोष्ट!
एका शिष्याने आपल्या गुरुजींना सांगितले, `गुरुजी मी खूप प्रयत्न करूनही मला कशातच यश मिळत नाहीये. काहीतरी उपाय सुचवा, जेणेकरून माझी चांगली वेळ येईल, मलाही चांगले दिवस दिसतील.'
गुरुजी आपल्या शिष्याला घेऊन फेरफटका मारायला बाहेर पडले. शिष्याला वाटले, गुरुजी काहीतरी उपाय सुचवतील. पण तसे झाले नाही. बराच वेळ झाला तरी गुरुजी मुद्द्याचे सोडून अवांतर गोष्टी बोलत होते. मात्र त्याकडे शिष्याचे लक्ष लागेना. तो ऐकल्यासारखे करत मान डोलवत होता. हे गुरुजींच्याही लक्षात आले.
चालता चालता त्यांनी बरेच अंतर कापले होते. गुरुजी शिष्याला म्हणाले, 'मला तहान लागली आहे, जवळच एक नदी आहे, तिथून माझ्यासाठी प्यायला पाणी घेऊन येशील का? तोवर मी इथे झाडाच्या सावलीत बसतो.'
शिष्य लगेच हो म्हणाला. तो नदीच्या शोधात निघाला आणि गावकऱ्यांना विचारत विचारत नदीवर पोहोचला. तिथे जाऊन पाहिले, तर नदीवर बायका धुणे धुत होत्या. गडीमाणसं जनावरं धुत होती. लहान मुलं आंघोळ करत होती. असे गढुळ पाणी आपल्या गुरुजींना प्यायला कसे बरे द्यावे? या विचारात तो मान खाली घालून परत आला. गुरुजींना म्हणाला, 'गुरुजी ते पाणी पिण्यालायक नव्हते, म्हणून मी आणू शकलो नाही. क्षमा करा!'
गुरुजी म्हणाले, हरकत नाही. चालून दोघेही दमलो आहोत. तूही इथे सावलीत थोड्या वेळ बस मग परतीच्या वाटेने जाऊ.
गुरुजींनी पुन्हा अवांतर विषयावर चर्चा सुरू केली. शिष्यही मान डोलवत ऐकल्यासारखे करू लागला. काही वेळाने गुरुजींनी शिष्याला पुन्हा एकदा नदीवर जाऊन पाणी आण सांगितले. गुरुजींची आज्ञा मोडणे शक्य नसल्यामुळे शिष्य परत नदीवर गेला. तिथे जाऊन पाहिले, तर नदीचे पाणी शांत झाले होते. स्थिर झाले होते. सगळा गाळ खाली बसला होता. त्यामुळे नदीतले दगड गोटेही लख्ख दिसत होते. सूर्याची किरणे पडून पाणी चकाकत होते. ते पाहून शिष्याचा विश्वासच बसला नाही, मगाशी पाहिलेले गढूळ पाणी हेच होते का? त्याने पानांचा द्रोण तयार केला आणि त्यात पाणी भरून तो गुरुजींसाठी घेऊन आला.
गुरुजींनी विचारले, `हे त्याच नदीचे पाणी आहे का? जिला तू मगाशी गढूळ म्हणालास?'
'हो गुरुजी, मगाशी ते पाणी पिण्यालायक नव्हते. आता नदीवर कोणी नव्हते त्यामुळे गाळ खाली बसला. म्हणून वरवरचे स्वच्छ पाणी मी आणू शकलो.' -शिष्य
गुरुजी म्हणाले, `मग तुलाही तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले? गढूळ वाटणारे पाणी काही काळ गेल्यावर जर शुद्ध, स्वच्छ दिसू शकते, तशी वाईट वाटणारी वेळ काही काळ गेल्यावर निश्चितपणे चांगली वाटू लागेल. त्यासाठी वेळेलाही थोडा वेळ दे, मग चांगली वेळही येईल हे नक्की!'