सचिनचे सचिनपण कशात आहे? आपल्यालाही त्याच्यासारखे होता येईल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 12:04 PM2021-04-24T12:04:18+5:302021-04-24T12:05:01+5:30

सचिन आवडतो, एवढे म्हणून भागणार नाही, तर सचिन सारखे बनायचे असेल, तर कठोर आणि प्रामाणिक परिश्रमाची तयारी हवी. तर आणि तरच आपल्याला आपले ध्येय पूर्ण करता येईल. 

Which quality makes sachin tendulkar special? Can we be like him? | सचिनचे सचिनपण कशात आहे? आपल्यालाही त्याच्यासारखे होता येईल का?

सचिनचे सचिनपण कशात आहे? आपल्यालाही त्याच्यासारखे होता येईल का?

googlenewsNext

आपण सर्वांनी सचिनला खेळताना पाहिले आहे. सचिनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून २० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा एका मुलाखतीत त्याला विचारले गेले, 'तुमच्या यशाचे रहस्य काय?'
सचिनने सांगितले, मी क्रिकेट फक्त खेळत नाही, तर क्रिकेट जगतो. दिवसाचे २४ तास, प्रत्येक क्षण मी क्रिकेटबद्दल विचार करतो. क्रिकेट शिकायला सुरुवात केली, त्या दिवसापासून एकही सकाळी ६ वाजताचा सराव मी चुकवलेला नाही.'
मुलाखतकाराने विचारले, `पण आदल्या दिवशीच्या मॅचमध्ये तुम्ही सेंच्युरी किंवा डबल सेंच्युरी घेतली असेल तर?
त्यावर सचिनने सांगितले, `तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता मी सरावाला हजर असेन!'
मुलाखतकार म्हणाला, 'पण तुम्हाला उत्सुकता नसते का? की कालच्या खेळीबद्दल पेपरमध्ये आपल्याबद्दल काय छान छान छापून आले असेल? किंवा एखाद्या लेखात कोणी शेरेबाजी केली असेल, याची काळजी वाटत नाही का?'
सचिन म्हणाला, 'मी सरावाला गेल्यावर ५०० धावांचे ध्येय पूर्ण केल्याशिवाय पेपर हातातही घेत नाही. आधी खेळ मग कौतुक! मी माझा सराव सोडून स्वत:चे कौतुक वाचत बसलो, तर मी आता जिथे आहे, तिथे राहू शकणार नाही आणि जिथपर्यंत मला पोहोचायचे आहे, तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही!'

हेच आहे सचिनचे 'सचिनपण'! स्वप्न सगळेच पाहतात, परंतु सगळेच जण कठोर परिश्रम घेतात असे नाही. सामान्य प्रयत्नांनी व्यक्ती सामान्य राहते, तर असामान्य प्रयत्नांनी असामान्य बनते. परंतु, त्यासाठी अविश्रांत मेहनत आणि स्वप्नपूर्तीचा ध्यास घ्यावा लागतो. 

रोज नवीन दिवस उगवतो. त्या दिवसाचा वापर कोण कसा करतो, यावर प्रगती अवलंबून असते. पळतात सगळेच, पण ध्येयाच्या दिशेने पळणारे कमी असतात. आपले ध्येय मिळवण्याचा ध्यास, त्यासाठी केलेली आखणी, परिश्रम, स्वत:ला सतत प्रोत्साहित ठेवण्याची तयारी, अडचणींवर मात करायची तयारी मनुष्याला समृद्ध बनवते. आर्थिक, मानसिक, शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवते. 

आजवरच्या सर्व यशस्वी लोकांची आत्मचरित्रे वाचली, तर एक गोष्ट लक्षात येईल, की ते सगळेच जण सकाळी लवकर उठत असत़  उठल्यावर पहिला एक तास आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आवश्यक गोष्टींना देत असत. त्या सकाळच्या एका तासात कमावलेली सकारात्मक ऊर्जा दिवसभर वापरत असत.

यावरून शिकण्यासारखे हेच आहे, की केवळ सचिन आवडतो, एवढे म्हणून भागणार नाही, तर सचिन सारखे बनायचे असेल, तर कठोर आणि प्रामाणिक परिश्रमाची तयारी हवी. प्रत्येक काम कर्तव्यबुद्धीने आणि ईश्वराप्रती श्रद्धा ठेवून आत्मविश्वासाने केले, तर आणि तरच आपल्याला आपले ध्येय पूर्ण करता येईल. 

Web Title: Which quality makes sachin tendulkar special? Can we be like him?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.