श्रीमंतीची व्याख्या सांगताना टेंबे स्वामी महाराज रावणाचे उदाहरण देत मृत्यूचे गूढ उकलतात... 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 10:36 AM2023-06-19T10:36:06+5:302023-06-19T10:36:25+5:30

जन्म, शिक्षण, पैसा, आयुष्य, अध्यात्म आणि मृत्यू यांची परस्पर सांगड घालून शेवट कसा असावा सांगताहेत प.पु. टेंबे स्वामी महाराज!

While explaining the definition of wealth, Tembe Swami Maharaj solves the mystery of death by giving the example of Ravana... | श्रीमंतीची व्याख्या सांगताना टेंबे स्वामी महाराज रावणाचे उदाहरण देत मृत्यूचे गूढ उकलतात... 

श्रीमंतीची व्याख्या सांगताना टेंबे स्वामी महाराज रावणाचे उदाहरण देत मृत्यूचे गूढ उकलतात... 

googlenewsNext

धड पडेस्तोवर आपण धडपड करतो, ते कशासाठी? तर धन-संपत्ती, वैभव, स्थैर्य यांच्या प्राप्तीसाठी. एवढे सगळे कमवूनही जेव्हा हे सुख उपभोगण्याची वेळ येते, तेव्हा आपल्या हातात वयाचा, आरोग्याचा, मनस्थितीचा पत्ता असतोच असे नाही. कधी डाव रंगतो, तर कधी अर्ध्यावर मोडतो. म्हणून संत सांगतात, ज्याला तुम्ही सुख समजत आहात, ते मुळात सुख नाही, ती माया आहे. त्यात अडकलेला मनुष्य कधीच खऱ्या सुखाची प्राप्ती करू शकत नाही. गाडी, बंगला, नोकर, चाकर, उच्च राहणी या सर्वांपेक्षा उच्च विचारसरणी महत्त्वाची आहे. हे पटवून देताना टेंबे स्वामी उदाहरण देतात,

एक लाख नाती सवा लाख पोती,
उस रावण घर मे ना दिवा न बत्ती

भरभराटीचे ऐहिक जीवन, आर्थिक समृद्धी, भरपूर गणगोत म्हणजे जीवनाची इतिश्री असे समजणाऱ्यांना एके ठिकाणी श्री टेंबेस्वामी महाराज सांगतात, 'ऐहिक भोग जे मिळती ती भक्तीची फळे न होती' सोन्याच्या लंकेचा अधिपती, शेकडो स्त्रियांचा स्वामी आणि लाखो नातवंडे व पणतु असूनही अंत:काळी ज्याच्या घरी तिन्हीसांजेला दिवाबत्ती लावायला कोणी नव्हते, त्या रावणाच्या उदाहरणावरून स्पष्ट होते, की अंतकाळी परिवारातील कोणीही वाचवायला येत नाही. प्रत्येकजण आपापल्या कर्मांचा धनी असतो. भला मोठा समृद्ध परिवार वाढवणाऱ्या रावणाच्या आयुष्याच्या शोकांतिकेच्या काळ्याकुट्ट पार्श्वभूमीवर एकाकी संन्यस्त जीवन जगून विश्वाला प्रबोधन केलेले श्री नरसिंहसरस्वती स्वामीमहाराज, आदि शंकराचार्य, श्री ज्ञानेश्वर महाराज यांची तेजस्वी जीवने विद्युल्लतेप्रमाणे जाणवतात!

मरणोत्तर जे आपल्याबरोबर येणार नाही, येथेच सोडावे लागणार आहे, त्यासाठी सामान्य माणसे सोन्यासारखा दुर्मिळ नरदेह खर्ची घालतात. तर मरणोत्तर गतीचा विचार करून महायात्रेच्या पाथेयाची तयार संतपुरूष बालपणापासून करू लागतात. चार काटक्या जमवायच्या दोन अंडी घालायची आणि ती उबवीत बसायचे, एवढ्यासाठी मनुष्य जन्म नसतो, हे ते पक्के लक्षात ठेवतात.

तू जन्मता जरि स्वत: रडलास पोरा,
आनंदुनीच हसला परि लोक सारा,
ऐसेच पुण्य कर की मरताहि तू रे,
तू हासशील परि विश्व रडेल सारे!

आज टेंबे स्वामी महाराजांची पुण्यतिथी. त्यांनी दत्तसेवा करून स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य सन्मार्गी लावले, तसे आपणही केवळ ऐहिक सुखामागे न धावता वेळीच पारमार्थिक सुखाची अनुभूती घेऊया. 

Web Title: While explaining the definition of wealth, Tembe Swami Maharaj solves the mystery of death by giving the example of Ravana...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.