प्रात:स्मरणीय पंचकन्या कोण आहेत? शास्त्रानुसार त्यांचे स्मरण का केले पाहिजे? वाचा.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 08:00 AM2021-03-08T08:00:00+5:302021-03-08T02:30:08+5:30
रोज सकाळी उठल्यावर धर्मशास्त्राने गौरवलेल्या पंचकन्यांचे स्मरण करावे, असा आग्रह देखील धरला आहे. त्या पंचकन्या कोण आणि त्यांचे कार्य काय? जाणून घेऊया.
आज जागतिक महिला दिन. अलीकडच्या काळात महिला दिनाच्या आठवडाभर आधीपासून सुविचार, पोस्टर, पुरस्कार, गुणगौरव असे सोहळे महिला दिनानिमित्त आयोजित केले जातात. परंतु आपल्या भारतीय संस्कृतीने केवळ एक दिवस किंवा एक आठवडा नाही, तर नेहमीच स्त्रिशक्तीचा गौरव करावा, आदर करावा असा संस्कार आपल्यावर घातला आहे. एवढेच काय, तर रोज सकाळी उठल्यावर धर्मशास्त्राने गौरवलेल्या पंचकन्यांचे स्मरण करावे, असा आग्रह देखील धरला आहे. त्या पंचकन्या कोण आणि त्यांचे कार्य काय? जाणून घेऊया.
अहल्या द्रौपदी तारा कुंती मंदोदरी तथा,
पंचकन्या: स्मरेतन्नित्यं महापातकनाशनम् ।।
या श्लोकात वर्णन केलेल्या पंचकन्यांमध्ये अहल्या, तारा, मंदोदरी यांचा उल्लेख रामायणात आढळतो, तर कुंती आणि द्रौपदीचा उल्लेख महाभारतात आढळतो. या पाचही दिव्य स्त्रियांचे स्मरण केले तरी महापाप नाश पावते. एवढे अद्भूत त्यांचे चरित्र आहे.
अहल्या : अहल्या आपल्याला परिचित आहे, ती शिळा म्हणून. जिचा रामाच्या पदस्पर्शाने उद्धार झाला. ती अहल्या मूळ रूपात अतिशय सुंदर होती. सौंदर्य असूनही तिने कधीच आपली मर्यादा ओलांडली नाही. चूक नसतानाही तिच्या वाट्याला आलेली शिक्षा तिने सहन केली, पण ती आपल्या तत्त्वापासून बधली नाही. स्त्री संयमाची पराकाष्टा म्हणून तिचे स्थान वंदनीय मानले जाते.
द्रौपदी : सुंदर, सुशील, बुद्धीमान म्हणून ओळख असलेली द्रौपदी पाच पांडवांची पत्नी झाली. म्हणून ती पांचाली म्हणूनही ओळखली गेली. पतीच्या निष्क्रीयतेमुळे तिला भरसभेत अपमान सहन करावा लागला, तरीदेखील तिने शेवटपर्यंत आपला पत्नीधर्म सोडला नाही. तिच्या पतींनी तिच्या अपमानाचा सूड घेतला तेव्हा तिने त्यांना क्षमा केले. तत्त्वनिष्ठ आदर्श भारतीय स्त्री म्हणून तिचे उदाहरण दिले जाते.
कुंती : संपूर्ण महाभारतात कुंतीबद्दल विशेष उल्लेख नसूनही तिचे योगदान अतिशय महत्त्वाचे होते. तिने घातलेल्या संस्कारांमुळेच पाच पांडव शंभर कौरवांशी लढा देऊ शकले. कुंतीची सहनशील वृत्ती, खंबीर भूमिका आणि दुरदृष्टी बाणा तिचे व्यक्तीमत्त्व अधोरेखित करतो.
तारा : वालीची पत्नी तारा हीचे पतिप्रेम, एकनिष्ठता आणि नात्यावरील अतूट विश्वास याबद्दल गौरव केला जातो. आपल्या पतीच्या पश्चातही तिने आपले शील जपले आणि दृढ निश्चयाच्या जोरावर पतीचा सहवास परत मिळवला.
मंदोदरी : रावणाची पत्नी मंदोदरी अतिशय सुंदर आणि धार्मिक वृत्तीची होती. सीतेच्या अपहरणाला तिने कडाडून विरोध केला. रावणाला धर्माचा मार्ग दाखवला. तिने असूरांच्या राज्यात राहूनही आपल्या परीने धर्मपालन कटाक्षाने केले. म्हणून ती पूजनीय आणि वंदनीय ठरली.