शिवशंभूचे आई वडील कोण? पार्वतीचे कसे झाले कन्यादान? सद्गुरुंनी केला खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 03:26 PM2024-06-24T15:26:52+5:302024-06-24T15:27:08+5:30
जगाचे पालक म्हणून आपण ब्रह्मा, विष्णू, महेश यांना ओळखतो, पण त्यांचे पालक कोण असतील या प्रश्नांचे उत्तर जाणून घ्या.
शिवशंभूंचे आई वडील कोण? हा प्रश्न सर्वात आधी उपस्थित झाला तो त्यांच्या लग्नाच्या वेळी! त्यावेळी पालक म्हणून कोण पुढे आले याबद्दल सद्गुरुंनी केलेला खुलासा बघा.
शिवशंभू यांना पशुपती असेही म्हणतात. कारण या विश्वातील प्रत्येक जीवाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि ती जबाबदारी ते अथकपणे पार पाडत आहेत. त्यांच्या विवाह सोहळ्याला सूर, असुर, दानव, मानव, भूत, पिशाच्च, पशु, पक्षी सगळे वरातीत सामील झाले. कारण ते देवांचेही देव होते आणि असुरांचेही देव होते. पटकन संतुष्ट होणारे आशुतोष अशी त्यांची ख्याती होती. त्यामुळे जो भक्ती भावाने त्यांना आपलेसे करतो, त्यांना ते जवळ करतात.
त्यामुळे शिवशंभूंच्या विवाहात सगळेच जण सामील झाले होते. हिमालय कन्या पार्वती विवाहासाठी कटिबद्ध झाली. हिमालयाच्या इच्छेविरुद्ध हे लग्न होत असल्याने त्याचा मनापासून पाठिंबा नव्हता, परंतु पार्वतीच्या इच्छेसाठी त्यांनी लग्नाला होकार दिला. मात्र जेव्हा कन्यादानाची वेळ आली, तेव्हा कोणाच्या भरवशावर पार्वती शिवशंभूला द्यायची हा प्रश्न हिमालयाने उपस्थित केला.
तेव्हा शिवशंभू ध्यानस्थ झाले. त्यांचे पालक कोण याबद्दल आजवर कोणी विचारणा केली नव्हती. आता कोण पुढे येणार? शिवशम्भूचे पालक कसे असणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता वाटू लागली. त्या शांततेत नारदमुनी आपली वीणेची तार छेडत होते. तो आवाज त्या शांततेचा भंग करत होता. सगळ्यांचे ध्यान शिवशंभूच्या उत्तराकडे लागलेले असताना नारदांनी वीणा रसभंग करत होती. तरीही त्यांनी आपले वादन थांबवले नाही. शेवटी हिमालयाने न राहवून नारदांना विचारले, 'इथे सगळेच जण महादेवाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत असताना तुम्ही वीणेचा झंकार का करत आहात? काही काळ थांबवत का नाही?
त्यावर देवर्षी नारद म्हणाले, 'हे वीणावादन नाही तर हिमालया, हे तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे. हिमालयाने प्रश्नार्थक चेहरा केला आणि खुलासा करा असे विनवले. त्यावर देवर्षी म्हणाले, 'महादेव हे स्वयंभू आहेत. त्यांची उत्पत्ती ही नादातून झाली आहे. सर्व प्रकारच्या नाद,सुरांवर त्यांचेच स्वामित्त्व आहे. त्यामुळे त्यांना पालक नाहीत तर तेच विश्वाचे पालक आहेत. हे सांगण्यासाठी मी वीणेचा झंकार करत होतो.
महादेवाच्या अर्थात शिवशंभूच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे, ते स्वयंभू आहेत. त्याप्रमणे आपणही स्वयंभू व्हावे. आत्मनिर्भर व्हावे. स्वतःला घडवावे. नवनवीन आव्हान स्वीकारून, कडू घोटांचं हलहल प्राशन करायला शिकावे. यासर्वांसाठी आत्मचिंतन करावे. शिवशंभू हे पहिले हटयोगी म्हटले जातात. त्यांचा आदर्श ठेवून आपणही चिंतन केले पाहिजे. आपल्या भावना आपल्याला नियंत्रित ठेवता आल्या पाहिजेत, आपले आरोग्य, आपले भविष्य आपल्याला घडवता आले पाहिजे. स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्या आणि आयुष्याला सुंदर आकार देऊन स्वतः स्वतःचे पालकत्व स्वीकारा, असे सद्गुरू या कथेचा सारांश सांगतात.