अनंत-राधिका विवाहासाठी अंबानींनी १२ जुलै तारीखच का निवडली? खास आहे दिवस, अद्भूत शुभ योग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 10:19 AM2024-06-01T10:19:45+5:302024-06-01T10:24:05+5:30
Anant Ambani Wedding Astrology: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाच्या दिवशी अद्भूत योग जुळून येत असून, १२ जुलै ही तारीख अतिशय विशेष मानली गेली आहे.
Anant Ambani Wedding Astrology: जगभरातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घरी विवाह सोहळ्याची लगबग सुरू आहे. मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी यांचा विवाह सोहळा जुलै महिन्यात होणार आहे. तत्पूर्वी अनंत अंबानी यांचा प्री वेडिंग सोहळा मार्च महिन्यात गुजरातमधील जामनगरमध्ये झाला होता. तर सध्या युरोपमध्ये दुसरा प्री वेंडिंग सोहळा झाला असून, १२ जुलै रोजी अनंत अंबानी यांचा राधिका मर्चंटसोबत विवाह होणार आहे. हा विवाह सोहळा तीन दिवस चालणार आहे. विशेष म्हणजे हा विवाह सोहळा मुंबईत होणार आहे.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी विवाहासाठी १२ जुलै ही तारीख निवडली आहे. ही तारीख अनेकार्थाने विशेष असून, या दिवशी अद्भूत योग जुळून येत असून, विवाहादि कार्यासाठी ते उत्तम शुभ फलदायी ठरू शकतात, असे ज्योतिषशास्त्रातील काही तज्ज्ञ मंडळींचे म्हणणे आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी जुळून येणारे शुभ योग पुण्य फलदायी आणि लाभदायी ठरू शकतात. १२ जुलै रोजी दुपारी १२ वाजून ३२ मिनिटांनी सप्तमी तिथी सुरू होत आहे. ही तिथी विवाहासाठी शुभ मानली जाते, असे म्हटले जात आहे.
विवाहासाठीचे शुभ मुहूर्त
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शुभ विवाह मुहूर्त शुक्रवार, १२ जुलै २०२४ रोजी आहे. तर शुभाशीर्वाद मुहूर्त शनिवार, १३ जुलै २०२४ रोजी आहे. तसेच विवाह रिसेप्शन रविवार, १४ जुलै २०२४ रोजी आहे. काही ज्योतिषीय मान्यतांनुसार, १२ जुलै हा दिवस खूपच खास आहे. या दिवशी सप्तमी तिथी आणि हस्त नक्षत्र असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या तिथी आणि नक्षत्रावर विवाह करणे अतिशय शुभ मानले गेले आहे. तसेच विवाहाचा दिवस शुक्रवार आहे. शुक्रवार हा दिवसही विवाहासाठी शुभ मानला गेला आहे.
ग्रह, पंचांग आणि ज्योतिषीय दृष्ट्या विवाहासाठी उत्तम अनुकूल
ज्योतिषशास्त्रानुसार, १२ जुलै रोजी सकाळी ०५ वाजून ३२ मिनिटांपासून ते सायंकाळी ०४ वाजून ०९ मिनिटांपर्यंत रवि योग असल्याचे सांगितले जात आहे. तर या दिवशी सकाळी ११ वाजून ५९ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ५४ मिनिटांपर्यंत अभिजीत मुहूर्त आहे. तसेच राहु काल या दरम्यान नाही. तर, हा दिवस भद्रा आणि पंचकमुक्त आहे. ग्रहांची स्थिती शुभ आहे. एकूणच १२ जुलै २०२४ हा दिवस ग्रह, पंचांग आणि ज्योतिषीय दृष्ट्या विवाहासाठी उत्तम अनुकूल मानला गेल्याचे सांगितले जात आहे.
सुख, समाधान आणि समृद्धी आणणारे नक्षत्र
हस्त नक्षत्र असताना विवाह होणे खूप शुभ मानले जाते. या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती जिद्दी आणि मेहनती असतात, अशी मान्यता आहेत. तसेच अशा लोकांचे आयुष्य आरामात जाते. या नक्षत्रात विवाह करणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की या नक्षत्रात होणारे विवाह प्रदीर्घ काळ टिकतात आणि यशस्वीही होतात. हे नक्षत्र जोडप्यासाठी सुख, सामंजस्य, समाधान आणि समृद्धी आणते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.