ब्रह्मदेवांकडून मृत्यूंजयाचे वरदान मिळूनही हिरण्यकश्यपूचा वध का आणि कसा झाला? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 08:00 AM2021-04-19T08:00:00+5:302021-04-19T08:00:03+5:30
मृत्यू कोणालाही चुकलेला नाही, वाईट कर्म करणाऱ्याला तर नाहीच नाही!
हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू हे दोघे भाऊ. हिरण्याक्षाला विष्णूदेवाने मारलेले समजताच हिरण्यकश्यपूला राग आला आणि या रागामधून निष्पन्न काय झाले, तर स्वार्थासाठी ब्रह्मदेवाची भक्ती. मंदार पर्वतावर शंभर वर्षे नाव घेत बसलेल्या हिरण्यकश्यपूला अखेर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला हवा असणारा वर दिला, तो असा-
'रात्री किंवा दिवसा, घरात अथवा बाहेर, माणसाकडून अथवा जनावराकडून, जमिनीवर किंवा आकाशात आणि कोणत्याही शस्त्राने तुला मरण येणार नाही.'
या वराने उन्मत्त झालेला हिरण्यकश्यपू गर्वाने देवांनाही त्रास देऊ लागला. विष्णूचे नाव काढील, त्याला कडक शिक्षा करू लागला. परंतु दैवगती तरी कशी असावी? याच हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद `नारायण नारायण' हा जप सतत करू लागला. योग्य समज देऊनही प्रल्हाद ऐकत नाही, हे पाहून हिरण्यकश्यपूने त्यालाही शिक्षा करावयास सुरुवात केली. समुद्रात फेक , आगीत टाक, कड्यावरून ढकलून दे, वगैरे भयानक उपाय अमलात आणूनही प्रल्हादाला काहीच इजा झाली नाही. त्याची विष्णुभक्ती चालूच राहिली.
शेवटी एकदा हिरण्यकश्यपूने खांबावर जोरात लाथ मारली. त्याबरोबर खांब दुभंगला व त्यातून भगवान विष्णूंचे `नृसिंह' रूप बाहेर आले. तोंड व हात सिंहाचे, बाकी शरीर माणसाचे, अशा या रूपाने हिरण्यकश्यपूला मांडीवर ओढले व उंबरठ्यावर बसून नखाने त्या राक्षसी हिरण्यकश्यपूचा वध केला. ब्रह्मदेवाने दिलेल्या वराचा कोणत्याही प्रकारे अवमान न करता विष्णूने कार्यभाग साधला. ती वेळ संध्याकाळची होती.
कर्मयोगे सकल मिळाली, येके स्थळी जन्मा आली,
लहानथोर कोणीही असो, मृत्यू न म्हणे हा अमिरी नि हा भिकारी!
म्हणून समर्थ रामदास स्वामीदेखील मनाच्या श्लोकांमध्ये म्हणतात,
जिवा कर्मयोगे जनी जन्म जाला,
परी शेवटी काळमुखी निमाला,
महाथोर ते मृत्यूपंथेचि गेले,
कितीएक ते जन्मले आणि मेले।।
मृत्यू कोणालाही चुकलेला नाही, वाईट कर्म करणाऱ्याला तर नाहीच नाही! म्हणून जेवढं आयुष्य मिळाले आहे, त्यात सत्कर्म करत चला.