मंत्र का म्हटले जातात? मंत्रांचे सामर्थ्य काय असते? मंत्रांमुळे काय लाभ होतात? सविस्तर वाचा.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 09:21 AM2021-05-15T09:21:45+5:302021-05-15T09:22:02+5:30
मंत्र या शब्दातील मकार म्हणजे मनन, त्रकार म्हणजे त्राण तथा संरक्षण यावरून मनन आणि संरक्षण यांनी जो संपन्न झाला आहे, त्याला मंत्र म्हणतात. मंत्र ही एक अद्वितीय शक्ती आहे, सामर्थ्य आहे. त्याची दीक्षा घ्यावी लागते. पुराणकाळी युद्धांमध्येही मंत्रविद्येचा उपयोग करत असत.
कुळधर्म कुळाचारामध्ये पूजा या गोष्टीलाच सर्वात जास्त महत्त्व आहे. या पूजा करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र म्हणावयाचे असतात. यामुळे `मंत्र' यांनाही महत्त्वाचे स्थान आहे. ऋग्वेद-यजुर्वेद-सामवेद-अथर्ववेद हे जे आपले चार वेद आहेत, त्यामध्ये मंत्राचा अंतर्भाव होत असल्यानी मंत्र या शब्दाचा अर्थ वेदसंहिता, वेदभागाविशेष असा आहे. तसेच मंत्र म्हणजे गुह्यभाषणे, गुह्य ते सांगणे, गुह्य मतितार्थ उपलब्ध करून देणे, विशिष्ट हेतू मनात धरून देवतांना आमंत्रित करणे, असे मंत्र या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. देवतांची प्राप्ती व्हावी, आपले संरक्षण व्हावे, विकास व्हावा, हा मंत्रांमागील मुख्य हेतू असतो.
मकरो मननं प्राह त्रकारस्त्राणमुच्यते,
मननत्राणसंयुक्तो मंत्र मत्यभिधीयते।।
मंत्र या शब्दातील मकार म्हणजे मनन, त्रकार म्हणजे त्राण तथा संरक्षण यावरून मनन आणि संरक्षण यांनी जो संपन्न झाला आहे, त्याला मंत्र म्हणतात.
मंत्र ही एक अद्वितीय शक्ती आहे, सामर्थ्य आहे. त्याची दीक्षा घ्यावी लागते. पुराणकाळी युद्धांमध्येही मंत्रविद्येचा उपयोग करत असत.
मंत्रांमध्ये असे फार मोठे सामर्थ्य असल्याने पूजेतही मंत्रांना फार महत्त्व असते. मंत्रपुष्प हा तर देवाच्या षोडशोपचार पूजेतील सातेचा म्हणजे शेवटचा मंत्र आहे.
ऊँ यज्ञेन यज्ञमयजन्त...ऊँ राजाधिराजाय...
ऊँ स्वस्ति, साम्राज्य, भौज्यं...
असे यातील जे मंत्र आहेत त्यामधून प्रथम देवाला वंदन करून सर्वांचे कल्याण, साम्राज्याचा विस्तार, सर्व पदार्थांची निर्मिती, उत्तम राज्य, अधिकार संपन्नता वगैरे गोष्टी प्राप्त व्हाव्यात अशी प्रार्थना केली जाते.
हे मंत्र सामुदायिकपणे म्हणून झाल्यावर शेवटी सर्वांनी आपल्या ओंजळीतील गंध व अक्षता यांनी युक्त असलेली फुले देवाला वहायची असतात. असे हे मंत्र सामर्थ्य अनुभवातून सिद्ध होते. ते श्रद्धापूर्वक म्हटले असता, त्याचे उचित फळ हमखास मिळते.