बहुतांश व्रत वैकल्ये स्त्रियांनाच का सांगितली आहेत? जाणून घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 03:54 PM2021-07-24T15:54:44+5:302021-07-24T15:55:05+5:30

व्रतस्थपणा हा स्त्रियांच्या ठिकाणी जात्याच असतो. प्रतिकुलतेतही त्या तग धरू शकतात. कारण त्यांचा मनोनिग्रह पुरुषांपेक्षा जास्त असतो. याच बळावर त्या पुरुषांपेक्षा अधिक लवकर देवाशी संधान साधू शकतात.

Why are most of the vows made to women only? Find out! | बहुतांश व्रत वैकल्ये स्त्रियांनाच का सांगितली आहेत? जाणून घ्या!

बहुतांश व्रत वैकल्ये स्त्रियांनाच का सांगितली आहेत? जाणून घ्या!

googlenewsNext

व्रत वैकल्ये ही बऱ्याचदा मनात विशिष्ट मनोकामना धरून केली जातात. विशेषत: स्त्रियांमध्ये व्रतवैकल्ये करण्याची उभारी अधिक असते. बहुतांश व्रतवैकल्ये ही स्त्रियांसाठीच योजलेली आहेत. अर्थात स्त्री पुरूषांनी आचारावी अशीही अनेक व्रते धर्मशास्त्रात सांगितली आहेत.

मुळात व्रतवैकल्ये म्हणजे अतिशय व्यक्तिगत स्वरूपाचे धर्माचरण आहे. दैनंदिन जीवनातील जगरहाटीला कंटाळळेल्या मनाला उभारी आणून ते मन पुन्हा जगरहाटीत गुंतवण्यास अनुकूल करणे हा मुख्य हेतू या व्रतवैकल्यामागे असावा असे वाटते. दैनंदिन जीवनात पुरुष हा अनेक व्यवहारात व्यस्त राहत असल्याने त्याच्या जीवनाला नाही म्हटले तरी जगरहाटीची गती असते. पण पूर्वी स्त्रियांचं दैनंदिन जीवन हे नेहमी उंबरठ्याच्या आतच चूल व मूल यांना बांधिल राहत असल्याने त्यांना अनेक मर्यादा पडत होत्या. या बंदिस्तपणातील एकसूरी आयुष्याला अधूनमधून गतिमान करण्याच्या दृष्टीने व्रतवैकल्यांचा पसारा मांडला गेला असावा. 

स्त्री ही कितीही सुबुद्ध असली तरी तिचं जगणं स्वत:पेक्षा प्रपंचासाठीच अधिक असते. आपला प्रपंच सुखी असावा, ही तिची पहिली आस असते. त्यामुळे आपले सौभाग्य, आपली मुलं बाळं आणि कुटुंबातील सदस्य सुखी असावे, ही तिची एकमेव इच्छा असते. त्यामुळेच अनेकदा पुरुषांना पुरुषार्थाने जे जमत नाही ते स्त्रिया श्रद्धेने घडवून आणतात. स्त्रियांची मानसिकता पूर्वसूरींनी ओळखली असावी. 

व्रतस्थपणा हा स्त्रियांच्या ठिकाणी जात्याच असतो. प्रतिकुलतेतही त्या तग धरू शकतात. कारण त्यांचा मनोनिग्रह पुरुषांपेक्षा जास्त असतो. याच बळावर त्या पुरुषांपेक्षा अधिक लवकर देवाशी संधान साधू शकतात. व्रतवैकल्यांमुळे स्त्रियांच्या ठायी असलेल्या सूप्त गुणांचा निश्चितपणे विकास होऊ शकतो.

व्रतवैकल्यांमुळे प्रपंचातील नित्यनैमित्तिकांपासून स्त्रियांना काही काळ मोकळीक मिळू शकते. त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला कुटुंबात आणि समाजात एक प्रकारची प्रतिष्ठा लाभू शकते. विशेष म्हणजे व्रतवैकल्याच्या निमित्ताने घराबाहेरील जगाशी तिचा संपर्क येतो. या संपर्कामुळे मन उल्हसित होते. व्रतवैकल्यांच्या उपासामुळे आरोग्यही चांगले राहते. तिच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा मुलाबाळांवरही चांगला परिणाम होतो.

पुरुषांच्या बाबतीतही व्रतवैकल्यांमुळे आत्मविश्वास वाढतो. देवावरील श्रद्धा दृढ होते. देह आणि मनाचे आरोग्य चांगले राहते. मुळात या सर्व गोष्टींमुळे जगण्याचा आनंद दुणावतो. नैराश्याचा झाकोळ दूर होतो आणि आयुष्य सत्कारणी लावण्याचा ध्यास जडतो. या आणि अशा लाभांचा विचार करता व्रतवैकल्ये ही अधूनमधून मानवी जीवनाला चेतना देणारी ऊर्जा आहे, असे म्हणायला हरकत नाही. 

परंतु आता स्त्री नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडू लागली आहे. मग तिला या व्रतवैकल्यांची गरज काय, असा प्रश्न तुमच्या मनात उद्भवू शकेल. परंतु, कितीही नाही म्हटले तरी संसार, नोकरी, व्यवसाय यातूनही चार निवांत क्षण आजही तिला हवेच असतात. हे क्षण या सण-उत्सवाच्या निमित्ताने मिळतात आणि व्रत वैकल्याच्या माध्यमातून साजरे होतात. त्यामुळे कालानुरूप त्यात आवश्यक बदल करून व्रतांचे सातत्य अबाधित ठेवण्यात काहीच गैर नाही.

Web Title: Why are most of the vows made to women only? Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.