स्वामींची एवढी सेवा, नामस्मरण करुन मनोकामना पूर्ण का होत नाहीत? नेमकी चूक कुठे होते?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 12:03 PM2024-08-13T12:03:13+5:302024-08-15T15:07:31+5:30
Shree Swami Samarth Maharaj: स्वामी सेवा करूनही मनासारखे का होत नाही? आपले नेमके कुठे आणि काय चुकते? यावर उपाय काय? जाणून घ्या...
Shree Swami Samarth Maharaj: अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी अनेकांची श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यवधी भाविकांचे दैवत आहेत. दररोज न चुकता स्वामींचे पूजन, भजन, नामस्मरण, उपासना केली जाते. अगदी हजारो घरांमध्ये स्वामी ग्रंथांची पारायणे केली जातात. नित्येनेमाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. राज्यासह देश-विदेशात स्वामींचे मठ, मंदिरे आहेत. या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे, स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे, गुरुवारी विशेष करून स्वामींचे दर्शन, पूजन, नामस्मरण करणे असा अनेकांचा संकल्प असतो.
समस्या, अडचण, संकट असले तर स्वामींना मनापासून हाक मारावी, स्वामी लगेच भक्तांच्या हाकेला धावून येतात. संकटमुक्त करतात, अडचण दूर करतात, असे अनेकांचे अनुभव आहेत. स्वामींना मनापासून शरण गेले तर स्वामी मनातील इच्छा पूर्ण करतात. भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव देतात, असे अनेक जण आवर्जून सांगत असतात.
असे का होते? यावर उपाय काय?
नियमितपणे स्वामींचे नामस्मरण करतो, सेवा करतो. मठात न चुकता जातो. गुरुवारी विशेष पूजन, नामस्मरण करतो. जे जे शक्य होईल, ते ते करतो, असे असूनही स्वामी मनोकामना पूर्ण करत नाहीत, जी अपेक्षा आहे, त्याची पूर्ती होत नाही, असे अनेकांना वाटत असते. आपण कुठे कमी पडतो का, असे विचारही मनात येत असतात. मनात भीती वाटते, घाबरायला होते. असे का होते? यावर उपाय काय? याबाबत काही मान्यता असल्याचे म्हटले जाते.
स्वामींवर श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा
अनेकदा आपण आपल्या इच्छा, मनोकामना, नवस, संकल्प हे आप्तांना, जवळच्या व्यक्तींना, अगदी खास लोकांना, मित्रांना सांगत असतो. त्यातून सकारात्मकता मिळावी, हा उद्देश असतो किंवा तशी मनातून अपेक्षा असते. यासोबतच आपण स्वामींचेही शक्य तेवढे करत असतो. आपापल्या परिने यथाशक्ती सेवा, नामस्मरण करतो. मनातील अमूक या इच्छेसाठी आपण स्वामींची अमूक अमूक एवढी सेवा करत आहे, असेही सांगतो. इथेच चूक होते, असे सांगितले जाते. परंतु, मनातील संकल्प, इच्छा, विशेष मनोकामना कुणालाही सांगू नयेत, असे सांगितले जाते. त्याची वाच्छता करू नये. तसेच आम्ही स्वामींचे अमूक करतो, तमूक करतो, स्वामींची एवढी सेवा करतो, तेवढी सेवा करतो, असे तर अजिबातच सांगू नये. आपली इच्छा गुप्त ठेवावी. अगदीच बोलावेसे वाटले, तर मनातल्या मनात स्वामींना सांगावे. स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवावा. स्वामी नक्कीच शुभ करतील, असे सांगितले जाते.