स्वातंत्र्यवीर सावरकरांना बहुजनांसाठी पतित पावन मंदिर उभारावेसे का वाटले? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 01:04 PM2023-02-24T13:04:20+5:302023-02-24T13:04:57+5:30

२६ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची पुण्यतिथी, त्यांचे राष्ट्रकार्य सर्वपरिचित आहेच, त्यांचे सामाजिक कार्यही जाणून घेऊ!

Why did freedom fighter Savarkar want to build Patit Pawan Temple for Bahujans? Find out! | स्वातंत्र्यवीर सावरकरांना बहुजनांसाठी पतित पावन मंदिर उभारावेसे का वाटले? जाणून घ्या!

स्वातंत्र्यवीर सावरकरांना बहुजनांसाठी पतित पावन मंदिर उभारावेसे का वाटले? जाणून घ्या!

googlenewsNext

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची २६ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी. सावरकरांची हिंदुत्वाची भूमिका नेमकी काय होती, हे आजतागायत ना हिंदू समजू शकले, ना हिंदूएतर! ही स्थिती आजचीच नाही, तर ते हयातीत असल्यापासूनची आहे. परंतु, सावरकरांनी कधीच आपल्या भूमिकांबाबत स्पष्टीकरण देण्यात वेळ घालवला नाही. ते नेहमी म्हणत, 'माझे विचार पटायला लोकांना वेळ लागेल, पण पटतील हे नक्की!' हा आत्मविश्वास आणि द्रष्टेपण त्यांना प्राप्त झाले, ते त्यांच्या ठायी असलेल्या आध्यात्मिक बैठकीतून!

याच प्रेरणेतून त्यांनी १९३० रोजी रत्नागिरी येथे मुक्कामी असताना बहुजन समाजाला मंदिरात प्रवेश मिळावा, म्हणून स्वतंत्र मंदिर उभारले. भगोजी शेठ किर या सद्गृहस्थांच्या मदतीने रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मंदिर उभारले. भागोजी शेठ किर यांनी २० गुंठे जमीन विकत घेऊन त्या काळात दीड लाख रुपये खर्चून मंदिराचे काम पूर्ण केले होते. त्या मंदिरात सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रवेश होता. मंदिरातील लक्ष्मी नारायणाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सावरकरांनी किर दाम्पत्यांच्या हातून करवून घेतली. बहुजनांच्या हातून मूर्तीस्थापना करवून घेण्याची ही देशातील पहिली घटना होती. या बातमीची दखल लंडनच्या वृत्तपत्रानेदेखील घेतली होती.  सावरकरांच्या या निर्णयामुळे त्यांनी अनेकांचा रोष ओढवून घेतला होता. परंतु, सावरकरांनी लोकांकडे दुर्लक्ष केले आणि मंदिर निर्मितीचे औचित्य साधून बहुजनांसोबत सहभोजन केले होते. 

'तुम्ही आम्ही सकल हिंदू, बंधू बंधू' हा नारा देत त्यांनी पतित पावन मंदिराच्या छताखाली सर्व जातिबांधवांना संघटित केले. बहुजनांना केवळ मंदिरात नव्हे तर थेट गाभाऱ्यापर्यंत जाण्याचे स्वातंत्र्य मिळवून दिले. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारतभूमीसाठी आणि भारतीयांसाठी दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा भोगूनही त्यांच्या वाट्याला कायम उपेक्षाच आली. परंतु, त्यांनी याबद्दल कधीच तक्रार केली नाही. त्यांनी आपले कार्य आणि आपला देह देव, देश, धर्मासाठी वाहून घेतला. याच कार्याचा गौरव करण्यासाठी पतित पावन मंदिरात खुद्द लक्ष्मी नारायण त्यांच्या कार्याची साक्ष ठेवून आहेत. आणि काय हवे...?

Web Title: Why did freedom fighter Savarkar want to build Patit Pawan Temple for Bahujans? Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.