हातचं सोडून पळत्याच्या मागे धावू नका, असे आपले पूर्वज का म्हणत असत? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 07:00 AM2022-09-20T07:00:00+5:302022-09-20T07:00:01+5:30
कुठे थांबावं हे वेळेत कळले नाही, आयुष्यात बरेच काही गमावण्याची वेळ येऊ शकते. कशी ते पहा!
आयुष्यात महत्त्वाकांक्षी असावं पण आधाशी नसावं! अधाशीपणा, हपापलेपणा आपल्याला अप्पलपोटी अर्थात स्वार्थी बनवतो. तर महत्त्वाकांक्षी बाणा आपल्या उत्कर्षाला हातभार लावतो. प्रगतीसाठी पुढे पाऊल टाकणे आवश्यक आहेच, पण कुठे थांबावं हे कळणेही आवश्यक आहे.
एक व्यक्ती जुगाराच्या नादी लागून आपले सर्वस्व गमावून बसली. मुलाबाळांची आबाळ होऊ लागली. बायकोने नोकरी पत्करली. ती कामाला जाऊ लागली. तिच्या मिळकतीवर घर चालू लागले. ती व्यक्ती बायकोकडून उधार घेऊन जुगार खेळू लागली.
एक दिवस त्या व्यक्तीने आपल्या मुलांच्या खाऊसाठी बायकोने ठेवलेले शंभर रुपये चोरले आणि जुगारात खर्च करायचे ठरवले. जुगार खेळण्याआधी तो मंदिरात गेला. आजचा जुगार लागू दे आणि गेलेली श्रीमंती परत मिळू दे असे विनवू लागला. देवाला त्याची दया आली.
त्या दिवशीच्या जुगारात शंभर रुपयांची गुंतवणूक करून तो जुगार खेळू लागला. नशिबाने साथ दिली. शंभर रुपयांच्या मोबदल्यात त्याला १००० रुपये मिळाले. तो सुखावला. १००० चे १०,००० मिळवावेत म्हणून त्याने मिळालेले पैसे पुन्हा गुंतवले. परत जिंकला. हजाराचे लाख, लाखाचे दहा लाख करू या हव्यासापोटी त्याने कमावलेले सगळे पैसे जुगारात गमावले.
नशिबाने साथ देऊनही योग्य वेळी न थांबल्याने त्याच्यावर पश्चात्तापाची वेळ आली. तो मुलांच्या वाटचे १०० रुपये तसेच नशिबाच्या जोरावर कमावलेले लाखो रुपये गमावून बसला. यालाच म्हणतात दैव देते आणि कर्म नेते!
म्हणून आपल्या प्रयत्नांवर विसंबून राहा, दैवावर नाही आणि दैवाने मिळालेल्या संधीचे सोने करा. आणि कुठे थांबायला हवे हे वेळेतच ठरवा!