यात्रेतल्या 'त्या' एका चिमणीचे अनेक आवाज लोकांना का ऐकू येत होते? आचार्य डॉ. लोकेश मुनी यांनी सांगितले कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 02:20 PM2021-10-26T14:20:32+5:302021-10-26T14:21:19+5:30
सर्वधर्म समभाव मांडताना डॉ. लोकेश मुनी यांनी एका वाक्यात महत्त्व सांगितले, 'इंसान पहले इंसान, फिर हिंदू या मुसलमान!'
'जशी दृष्टी तशी सृष्टी' असे आपण म्हणतो, परंतु अनेकदा आपल्याला जे दिसते, तेच सत्य मानू लागतो. मात्र एकच गोष्ट प्रत्येकाच्या नजरेतून वेगवेगळी दिसू शकते, हे आपण विसरतो. यासाठीच कोण चूक आणि कोण बरोबर हे अनुमान न काढता प्रत्येकाचे आचार विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला विविधतेत एकता जाणवेल! हाच आध्यात्माचा गाभा आहे.
हे समजून घेण्यासाठीच 'लोकमत'ने २४ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन केले होते. `धार्मिक सौहार्द्राबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका या विषयावर या परिषदेत विविध धर्माच्या आचार्यांनी विचार मांडले. या विषयाचे मर्म उलगडून सांगताना डॉ. लोकेश मुनी यांनी हिंदीत एक छान मार्मिक गोष्ट सांगितली.
एका गावात एक यात्रा असते. गावातली मंडळी यात्रेत सहभागी झालेली असतात. तिथे एका व्यक्तीला झाडावर बसलेल्या चिमणीचा अखंड चिवचिवाट ऐकू येतो. तो म्हणतो, 'आजचा दिवस शुभ आहे, असे वाटते. कारण चिमणी अविरतपणे 'राम लक्ष्मण दशरथ' म्हणतेय. हे मत व्यक्त करणारा हिंदू असतो.
काही वेळाने तिथे मौलवी येतात, ते म्हणतात शुभशकून आहे, चिमणी 'सुभान तेरी कुदरत' म्हणतेय.
नंतर तिथे किराणा व्यापारी येतो. तोही चिमणीचा चिवचिवाट ऐकून थांबतो. चिमणी 'अदरक मिरची डगरक' म्हणतेय, म्हणजे व्यापार चांगला होणार दिसतेय.
तेवढ्यात भाजीवाला येता़े त्याला 'गाजर मुली अदरक' ऐकू येते. तोही खूष होऊन जातो.
तिथे एक पेहलवान मिशांना पीळ देत येतो, तो 'दंड मुगदर कसरत' असे ऐकतो आणि चिमणीचे आरोग्य ज्ञान बघून आनंदून जातो.
तात्पर्य, चिमणीचा चिवचिवाट नेहमीचा होता, परंतु ऐकणाऱ्याला तो त्याच्या विचारांनुसार ऐकू येत होता आणि तो आपल्या मतानुसार अर्थ घेत होता. 'जया जैसा भाव, तया तैसा अनुभव' असे संत म्हणतात, अगदी तीच प्रचिती या गोष्टीतून घडते. हे आपण सर्वांनी समजून घेतले, तर जगातून नकारात्मकता, द्वेष, मत्सर निघून जाईल. सर्वजण एकमेकांना समजून घेऊ शकतील. एकमेकांच्या मतांचा आदर करतील आणि जग सुंदर व सुसह्य बनू शकेल. असे सर्व सांगून समारोप करताना डॉ. लोकेश मुनी म्हणाले,
आओ मिलकर बैठे बात करे,
चार कदमही सही मिलकर साथ चले,
यू तो दुरी से दुरी बढती जाएगी,
कभी खुद से खुद मुलाकात करे।