'शांत हो श्रीगुरुदत्ता' ही करुणा त्रिपदी टेंबे स्वामींना का लिहावी लागली? वाचा त्यामागील गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 07:19 AM2023-11-09T07:19:54+5:302023-11-09T07:22:44+5:30

श्रीदत्तगुरुंकडे करुणा भाकताना आपसूक करुणा त्रिदपीचे शब्द ओठावर येतात, ती का आणि कोणत्या अवस्थेत लिहिली व म्हटली गेली ते पाहणे महत्त्वाचे. 

Why did Tembe Swami have to write Karuna Tripadi 'Shant Ho Shri Gurudatta'? Read the story behind it! | 'शांत हो श्रीगुरुदत्ता' ही करुणा त्रिपदी टेंबे स्वामींना का लिहावी लागली? वाचा त्यामागील गोष्ट!

'शांत हो श्रीगुरुदत्ता' ही करुणा त्रिपदी टेंबे स्वामींना का लिहावी लागली? वाचा त्यामागील गोष्ट!

आपण मंदिरात देव दर्शनाला जातो, पण ते सोडून सगळ्या चुकीच्या, वाईट गोष्टींकडे लक्ष देत बसतो. ज्या सोयी सुविधा नाहीत त्याबद्दल बोलतो. जिथे तामझाम असेल तिथे त्या प्रशस्ततेचे कौतुक करतो आणि या नादात ज्याच्या ओढीने आलो आहोत त्या भगवंताच्या दर्शनाला दुय्यम स्थान देतो. मात्र तिथे जे जसे आहे, जे काही घडते आहे ते सर्व देवाच्या साक्षीने घडत आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ते लक्षात ठेवले तर आपले लक्ष इतरत्र न जाता फक्त देवदर्शनाकडे जाईल आणि अन्य गोष्टी दुय्यम वाटू लागतील. याबाबतीत प.पु. श्री टेंबे स्वामी यांच्या बाबतीत घडलेला प्रसंग सांगितला जातो तो असा-

एकदा श्री टेंबे स्वामी तथा वासुदेवानंद सरस्वती मंदिरात पूजेस बसले असता, कुणी तरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचपक्वानांचे ताट आणून दिले. प्रसादाचे ताट पाहून तेथील पुजा-याचा मोह अनावर झाला. त्याने ते नैवेद्य भरलेले ताट त्वरित खाल्ले. तेंव्हा श्री टेंबे स्वामी फार चिडले. त्याला खूप बडबडले व नंतर पुजेस बसले.

पुजा संपल्यावर, "श्री गुरु दत्तात्रेयांना"  गाभाऱ्यातून निघून जाताना त्यांनी पाहिले. त्यानंतर तीन दिवस त्यांना श्री गुरु दत्तात्रेयांनी दर्शन दिले नाही. ते बैचेन झाले. त्यांना कळले मी पुजा-याला टाकून बोललो म्हणून श्रीगुरु दत्तात्रेयांना राग आला असणार! तेव्हा श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तसेच त्यांच्या मुखातून करुणा त्रिपदीचे बोल बाहेर पडले.

"शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता" ।।

करुणा त्रिपदीचे हे बोल ऐकून श्री गुरु दत्तात्रेय  श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या समोर उभे राहिले. तेव्हा श्री टेंबे स्वामी म्हणाले, "देवा माझे काही चुकले असे मला वाटत नाही. तुला नैवैद्य दाखवायच्या अगोदर त्या पुजा-याने तो खाऊन टाकला".

तेव्हा श्री गुरु दत्ताञेयांनी प्रश्न केला, "इथे सत्ता कोणाची?

ह्या प्रश्नावर श्री टेंबे स्वामी म्हणाले, "देवा इथे सत्ता तुमची आहे. इथे सारे तुमच्या इच्छेने चालते ". 

त्यावर श्री गुरु दत्तात्रेय म्हणाले, अरे, तो पुजारी गेली तीन दिवस उपाशी होता, त्याच्या साठी मी ते ताट पाठवले होते. ते त्याने खाल्ले. त्यात तुझे काय गेले  त्यावर श्री टेंबे स्वामी सरस्वतींना आपली चूक कळली व श्री गुरु दत्तात्रेय अंतर्धान पावले.

या अध्यात्मिक मार्गात प्रामाणिकपणे वाटचाल करणाऱ्या माणसाची देवाकडून, गुरु कडून क्षणाक्षणाला परीक्षा बघितली जाते. इतका हा मार्ग कठीण आहे. टेंबे स्वामी हे अधिकारी पुरुष होते. एका रागामुळे त्यांची ही अवस्था झाली.  आपण तर सामान्य माणस आपण जर राग आवरु शकलो नाही तर,  आपली आयुष्यभराची साधना व्यर्थ ठरु शकते. आपण ज्या मंदिराला जातो तेथे एकच गोष्ट लक्षात ठेवावी, त्या मंदिरात त्या देवाची सत्ता असते, तिथे काय घडते ते पाहू नये. तिथे चालणाऱ्या सर्वच गोष्टींकडे त्या देवतेचे लक्ष असते. मंदिरातील सेवेकरी, पुजारी, विश्वस्त यांचे सर्व कृत्य त्या देवाला माहीत असते. ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीचे सत्तेचे अधिष्ठान असते. तेथे सामान्य माणसाने फक्त ईश्वरी इच्छेचा आदर करावा.

श्री गुरुदेव!

Web Title: Why did Tembe Swami have to write Karuna Tripadi 'Shant Ho Shri Gurudatta'? Read the story behind it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.