राष्ट्रच नाही तर खेडीही विकसित झाली पाहिजेत,असे तुकडोजी महाराज का म्हणत? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 12:55 PM2024-11-19T12:55:51+5:302024-11-19T12:56:48+5:30

राष्ट्राची उन्नती कशी करावी याचा पूर्ण अभ्यासक्रमच जणू काही संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत लिहून ठेवला आहे, त्याचे वाचन आणि चिंतन सर्वांनी करायला हवे.

Why did Tukdoji Maharaj say that not only the nation but also the villages should be developed? Find out! | राष्ट्रच नाही तर खेडीही विकसित झाली पाहिजेत,असे तुकडोजी महाराज का म्हणत? जाणून घ्या!

राष्ट्रच नाही तर खेडीही विकसित झाली पाहिजेत,असे तुकडोजी महाराज का म्हणत? जाणून घ्या!

२० नोव्हेंबर रोजी होणार्‍या विधानसभा निवडणूकीचा यंदा बराच प्रचार, प्रसार झाला आहे. आश्वासनांची खिरापत वाटली गेली आहे. आता उमेदवार निवडून आल्यावर त्याची कितपत पूर्तता होते, हे पाहणे आउत्सुक्याचे ठरेल. मात्र राष्ट्र आणि राज्य विकासाचा दूरदृष्टीने विचार केला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी! राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण व्हायला हवे. खेडे हे एक स्वयंपूर्ण घटक म्हणून भारतात असायला हवे, तरच भारत प्रगत राष्ट्रांमध्ये मान्यता पावेल, असे ते म्हणत असत. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्या बद्दल जाणून घेऊ. 

तुकडोजी महाराज विशेषकरून ओळखले जातात, ते त्यांच्या समाजसेवेमुळे आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेमुळे. `सर्व जीव देवासमान समजून पूजा करा' हे गीतेचे सार तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून सोपे करून मांडले आहे.

बालपणीच अडकोजी महाराजांचे शिष्यत्त्व पत्करून त्यांनी परमार्थ मार्गातील साधना करण्यात काही वर्षे घालवली. ही साधना चालू असताना त्यांनी जगास उपदेश करण्याचे कार्य सुरू केले. महात्माजींच्या प्रेरणेने त्यांनी ईशस्तवनाबरोबर गावातील सामाजिक सुधारणा, सर्वांगीण सुधारणा, शिक्षण, ग्रामविकास इ. गोष्टींवर भर दिला. 

गावोगावी फिरून समाज प्रबोधन केले. `श्रीगुरुदेव' नावाचे मासिक काढून अनेक वर्षे चालवले. वऱ्हाडात 'मोझेरी' या गावी एक आश्रम बांधला. गावोगावी त्याच्या शाखा उपशाखा काम करत असत. त्यामुळे नागपूर-वऱ्हाडात त्या सेवामंडळाचा मोठा अनुयायी वर्ग निर्माण झाला.

ग्रामसफाई, सुतकताई, दवाखाने, शाळा, प्रार्थना वगैरे अनेक गोष्टींद्वारा त्यांनी ठिकठिकाणी खेड्यांना शिस्तीचे आणि समाजसेवेचे वळण लावले. त्या कार्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची केले. प्रकृती ठीक नसतानाही जपानमध्ये जाऊन तेथे भरलेल्या धर्मपरिषदेत आपल्या मानवताधर्माचे स्वरूप विशद करून सांगितले.

तुकडोजी महाराजांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली. गावोगावी सामुदायिक प्रार्थना होऊ लागल्या. शेकडो सेवक निर्माण झाले. आधुनिक विज्ञानाचे भांडवल नसतानाही निष्ठा व श्रद्धा या शिदोरीवर जगून समाजाच्या मूलभूत प्रेरणेला जागृत करण्याचे काम होऊ लागले. खेड्यातील अज्ञ जनता शिक्षाबद्ध होऊ लागली. खेड्यात खराटे खरखरू लागले, रस्ते नाल्या बांधल्या जाऊ लागल्या. हे कार्य ज्या शब्दांनी, ज्या भावनांनी, ज्या विचारांनी साधले त्या सगळ्याचा सुव्यवस्थित संग्रह म्हणजे 'ग्रामगीता'!

तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत ४१ अध्यायांमध्ये जे विषय हाताळले आहेत, त्यांच्या नुसत्या शीर्षकावरून आपल्याला ग्रामगीतेचे मर्म लक्षात येईल. देवदर्शन, धर्माध्ययन, आश्रमधर्म, संसार-परमार्थ, वर्ण व्यवस्था, संसर्ग प्रभाव, आचार प्राबल्य, प्रचार महिमा, सेवा सामथ्र्य, संघटनशक्ति, ग्रामरक्षण, ग्रामशुद्धी, ग्राम निर्माण कला, ग्राम आरोग्य, गोवंश सुधार, वेष वैभव, गरीबी श्रीमंती, श्रम संपत्ती, जीवनशिक्षण, महिलोन्नती, वैवाहिक जीवन, अंत्यसंस्कार, सणोत्सव, यात्रा मेळे, देव देवळे, मूर्तीउपासना, सामुदायिक प्रार्थना, प्रार्थना व विश्वधर्म, दलित सेवा, भजन प्रभाव, संत चमत्कार, संत स्वरूप, अवतारकार्य, प्रारब्धवाद, प्रयत्नवाद, जीवन कला, आत्मानुभव, ग्रामकुटुंब, भूवैकुंठ, ग्रंथाध्ययन, ग्रंथ महिमा!

साध्या सोप्या शब्दात रचलेली ग्रामगीता आपण याआधी कधी वाचली नसेल, तर आजच सुरुवात करा. 

Web Title: Why did Tukdoji Maharaj say that not only the nation but also the villages should be developed? Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.