नियोजित वर-वधू साखरपुड्याची अंगठी अनामिकेतच का घालतात? वाचा 'हे' कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 02:10 PM2023-08-10T14:10:27+5:302023-08-10T14:10:43+5:30
अकारण केलेल्या गोष्टी लोप पावतात तर तर्कशुद्ध असलेल्या गोष्टी काळानुकाळ निभावल्या जातात, अनामिकेत अंगठी घालण्यामागेही आहे कारण!
आपण ज्या रीतीभाती पाळतो त्याला कधी शास्त्राधार असतो तर कधी तर्कशुद्ध कारण! कोणतीही गोष्ट अकारण केली जात नाही आणि जी केली जाते ती दीर्घकाळ टिकत नाही. हिंदू धर्मातील प्रथा परंपरांनाही शास्त्राधार आहे. म्हणूनच वर्षानुवर्षे त्याचे पालन होत आहे. मात्र काही जण ते कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत, अभ्यास करत नाहीत आणि प्रथा परंपरांना थोतांड संबोधून मोकळे होतात. कारण अभ्यास करण्याच्या तुलनेत नावं ठेवणं केव्हाही सोपं. मात्र ज्याला खरंच जिज्ञासा असते, अशी व्यक्ती प्रत्येक गोष्टीमागील कारण शोधते आणि मग ती आचरणात आणते.
वाङ्निश्चय अर्थात साखरपुडा करताना नियोजित वर वधू एकमेकांच्या अनामिकेत अंगठी घालतात. अंगठीसाठी हेच बोट का? असे म्हणतात की अनामिकेतून जाणारी रक्तवाहिनी थेट हृदयाकडे जाते. ही केवळ भारतीय समजूत नाही तर इजिप्तमध्ये ही समजूत ६००० वर्षे जुनी आहे.
याव्यतिरिक्त आणखी एक प्रयोगात असे सांगितले जाते, दोन्ही हाताची बोटे परस्पर जोडली असता, मधले बोट दुमडले आणि एक एक बोट विलग केले तर लक्षात येते की अंगठ्यापासून बाजूचे आणि करंगळीपर्यंतचे बोट विलग होते पण मधले बोट दुमडले असताना अनामिका विलग होत नाही. यावरून असे म्हटले जाते की आयुष्यात आलेली सगळी नाती काही ना काही कारणाने विलग होतात मात्र नवरा बायको हे नाते आयुष्याच्या अखेर पर्यंत टिकून राहते. म्हणून अनामिका हे नवरा बायकोच्या जोडीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच अनामिकेत अंगठी घातली जाते.