वाईटांशी चांगले आणि चांगल्यांशी वाईट का घडते? वाचा त्यामागचे कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 10:36 AM2022-06-13T10:36:21+5:302022-06-13T10:36:40+5:30
जे होते ते चांगल्यासाठी असे आपण म्हणतो, पण जेव्हा स्वतःची समजूत घालायची वेळ येते तेव्हा हे विसरतो. त्यासाठीच ही उजळणी!
आपण सगळेच जण दुसऱ्याचे सुख पाहून असूया धरून बसतो. खजील होतो, दुःखी होतो, स्वतःला कमी लेखू लागतो. एवढेच काय तर नशिबाला दोष देऊ लागतो. विशेषतः तेव्हा, जेव्हा चांगले वागणारे लोक अपयशी आणि वाईट वागणारे लोक यशस्वी होताना दिसतात. पण हे असे का घडते, याबद्दल एकदा महर्षी नारदांनी भगवान विष्णूंना विचारणा केली...
देवा न्याय देताना तुम्ही कधी कधी चुकता असे मला वाटते. विष्णू म्हणाले, ''नारदा माझी चूक मला निदर्शनास आणून दे मी नक्की दुरुस्त करतो!''
नारद म्हणाले, ''देवा हे केवळ माझे म्हणणे नाही तर समस्त पृथ्वीवासियांचे म्हणणे आहे. एक उदाहरण देतो.''
''काही वेळापूर्वी एक गाय एका खड्ड्यात अडकली होती. अशा अवस्थेत एक चोर तिथून गेला. त्याने गायीला पाहिलं आणि दुर्लक्ष करून निघून गेला. शिवाय काही अंतर पुढे गेल्यावर त्याला सोन्याच्या मोहरांची थैलीसुद्धा मिळाली. याउलट, एक साधू तिथून जात असताना त्याने गायीला अडचणीत पाहिलं, तो मदतीला गेला त्याने गायीला बाहेर काढली, पण स्वतः मात्र खड्ड्यात अडकला. हा तुमचा कुठला न्याय आहे सांगा???''
विष्णू हसले आणि म्हणाले, ''नारदा दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं! अरे तुला त्या चोराला मिळालेल्या मोहरा दिसल्या, पण त्याचे काय नुकसान झाले ते मला माहितीय. त्या चोराने गायीला वाचवले असते, तर ते पुण्य कामी येऊन त्याला मोठा खजिना हाती लागणार होता. पण त्याला मोहरांचा पुरचुंडीवर समाधान मानावे लागले. आणि साधूंच्या बाबतीत म्हणशील, तर साधूंनी केलेल्या पुण्यकर्मामुळे त्यांचा आज मृत्यू लिहिलेला होता, पण खड्ड्यात पडण्यावर ते संकट निभावलं. अंगाला चिखल लागले पण मृत्यू टळला. त्यामुळे नारदा, आपण प्राप्त परिस्थितीवर प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो. पण मला प्रत्येक जिवाच्या वर्तमानाचीच नव्हे तर भविष्याचीही काळजी असते. त्यांच्या कर्मानुसार मी फळ देत असतो!"'
तात्पर्य हेच, की ''आपल्या बाबतीत काही वाईट आणि वाईट वागणाऱ्यांच्या बाबतीत काही चांगले घडताना दिसले म्हणून नाराज होऊ नका. त्यांनी कोणता खजिना गमावला आणि तुम्ही नकळत कोणत्या संकटावर मात केली, याची तुम्हालाही कल्पना येणार नाही. म्हणून फक्त सत्कर्म करत राहा. चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते, हे लक्षात ठेवा!