मंदिरात जाण्याआधी मंदिराच्या पायरीला नमस्कार का करतात? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 03:02 PM2022-02-22T15:02:51+5:302022-02-22T15:03:07+5:30
मंदिराच्या पायरीकडून गाभाऱ्याच्या मूर्तीकडे नेणारा प्रवास निर्गुणाकडून सगुणाकडे आणि परत सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारा आहे.
आपण मंदिरात जातो. चपला बाहेर काढतो. पाय धुतो आणि स्वच्छ देहाने आणि स्वच्छ मनाने मंदिरात पाऊल ठेवतो. तसे करताना आपला हात आपोआप मंदिराच्या पायरीला स्पर्श करतो. त्यामागे कारण काय असू शकेल याचा कधी विचार केला आहे का? नाही केला, तर आज त्यावर थोडेसे चिंतन करू.
मंदिरात जाताना मंदिराची पायरी ही देवाकडे नेणारा दुवा असते. ती ओलांडून गेल्याशिवाय गाभाऱ्यातली देवमूर्ती आपल्याला दिसणार नाही. तिथेच कोणी रोखून धरले, तर देवदर्शन घडणार कसे? म्हणून त्या पायरीचे महत्त्व अधिक आहे. परंतु गंमत अशी, की ज्या पायरीला नमस्कार करून आपण मंदिरात जातो, त्या पायरीचा आपल्याला मंदिरातून निघताना विसर पडतो. देवाचे दर्शन झाले की त्या पायरीला ओलांडून पायात चपला अडकवून आपण परत जायला निघतो. म्हणजेच काम झाले की आपण तिला विसरतो आणि तसे घडणे स्वाभाविक आहे. नव्हे तर तो मनुष्यस्वभाव आहे. तसे होऊनही पायरी राग व्यक्त करत नाही तर आपण भक्त आणि भगवंताला जोडणारा दुवा बनू शकलो, याबद्दल समाधान मानते.
संत सांगतात, आपला देह हादेखील मंदिराचे प्रतिक आहे. देह हे देखील देवाकडे नेणारे द्वार आहे. आचार्य अत्रे तर लिहितात, `देह देवाचे मंदिर, त्यात आत्मा परमेश्वर!' म्हणजेच जशी मंदिराची पायरी ओलांडून गेल्याशिवाय गाभाऱ्यातला देव दिसत नाही, तशी देहाची पायरी ओलांडल्याशिवाय हृदयस्थ परमेश्वर दिसत नाही. एकदा का त्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला आणि अंतर्यामी सूर गवसला, की परत देहाच्या दिशेने उलट प्रवास होणार नाही.
ज्याप्रमाणे देवदर्शन झाल्यावर पायरीला नमस्कार करण्याचे भान उरत नाही, तसे देहाचा सदुपयोग करून आत्मारामाची भेट घेतली, की देहासक्ती राहत नाही. यासाठीच देहाला मंदिराच्या पायरीइतके महत्त्व द्या. मंदिरात जाताना जसे आपण पायरीशी रेंगाळत नाही, तर नमस्कार करून आत जातो, तसे देहात न रमता आत्मरामाकडे वाटचाल करा. स्वत:ची स्वत:शी ओळख करून घ्या. अंतरीचा आवाज ऐका. देहाला मंदिरासारखे पवित्र, कपटरहित स्वच्छ, निर्मळ ठेवा. म्हणजे गाभाऱ्यातला देव दिसल्यावाचून राहणार नाही.
मंदिराच्या पायरीकडून गाभाऱ्याच्या मूर्तीकडे नेणारा प्रवास निर्गुणाकडून सगुणाकडे आणि परत सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारा आहे.