वास्तुशांती का करावी? त्यामुळे कोणते लाभ होतात? जाणून घ्या आगामी काळातील वास्तूमुहूर्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 12:32 PM2022-04-18T12:32:24+5:302022-04-18T12:33:01+5:30
वास्तू शांतीमुळे वास्तू देवता, कुल देवता यांचीही पूजा होते. आप्तेष्टांच्या येण्यामुळे आणि त्यांच्या आशीर्वादाने वास्तू पावन होते. तसेच होतात आणखीही अनेक लाभ; कोणते ते जाणून घ्या!
नवीन वास्तू खरेदी केली किंवा एखाद्या जुन्या वास्तूमध्ये आपण नव्याने राहायला गेलो किंवा व्यवसायानिमित्त ती जागा वापरात काढली की सुरुवातीला तिथे गणपती पूजन, कलश पूजन आणि सवडीने वास्तू शांत करण्याचा हिंदू धर्मात प्रघात आहे. वास्तू शास्त्रातही या पूजेला महत्त्व दिले गेले आहे. जाणून घेऊया, की ही पूजा नेमकी कोणत्या उद्देशाने केली जाते? त्यामुळे लाभ कोणते होतात आणि आगामी काळात तुम्हालादेखील वास्तू शांत करायची असेल तर त्यासाठी शुभ मुहूर्त कोणते?
वास्तुशांती का करावी?
निरंजन कुलकर्णी गुरुजी वास्तुशांतीचे महत्त्व सांगतात, 'वास्तुशांत का करावी? कारण वास्तू उभारली जात असताना खोदकाम, मोठ्या दगडांची तोडफोड, झाडांची कापणी, असंख्य प्राणी, जीव, जंतू, मुंग्या, पक्षांची घरटी या सगळ्यांचा नाश केलेला असतो. वास्तू तयार करण्यासाठी खूप यंत्रे वापरावी लागतात. त्यामुळे त्या वास्तुपुरुषाच्या शरीरालासुद्धा इजा पोहोचते. या सगळ्याचा जो दोष तयार होतो तो वास्तू विकत घेतल्यावर आपल्याला लागतो. हणून त्याची क्षमायाचना करता यावी, तसेच सर्व देवतांचे पूजन करून त्यांची प्रार्थना करता यावी. आपल्याला दोष लागू नये व वास्तू पुरुषांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून वास्तुशांत अवश्य करावी.'
वास्तुशांतीचे मुख्य लाभ :
>> कुठल्याही जमिनीचे, बांधलेल्या वास्तूचे आणि आंतरिक व्यवस्थेचे दोष दूर होतात.
>> वास्तू बांधताना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सूक्ष्म जीवांच्या झालेल्या जीवितहानीच्या दोषमुक्तीची प्रार्थना.
>> भावी घरात जाताना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून केलेली पूजा.
वास्तूची भरभराट :
>> वास्तुदोष दूर झाल्यामुळे घरातील सदस्यांना चांगले आरोग्य, ऐश्वर्य, धनसमृद्धीचे वरदान मिळते.
>> होम हवन आदी गोष्टीमुळे घरातील वातावरण सकारात्मक होते. नकारात्मक ऊर्जा दूर होते.
>> शुभ मुहूर्तावर गृहप्रवेश केल्याने वास्तू लाभते.
>> वास्तू शांतीमुळे वास्तू देवता, कुल देवता यांचीही पूजा होते. आप्तेष्टांच्या येण्यामुळे आणि त्यांच्या आशीर्वादाने वास्तू पावन होते.
वास्तुशांत कोणी व केव्हा करावी?
>> स्वतःची वास्तू नसेल पण अनेक वर्षांपासून तुम्ही भाड्याच्या जागेत राहात असाल तरीदेखील वास्तुशांत करणे इष्ट ठरते.
>> स्वतःची वास्तू असेल तर प्रश्नच नाही, तुमच्या सवडीने शुभ मुहूर्त पाहून वास्तुशांत करू शकता.
>> गृहप्रवेश झाल्यानंतर वर्ष-दीड वर्षानेदेखील वास्तुशांत करता येते. राहायला जाण्यापूर्वीच वास्तुशांत केली पाहिजे अशी सक्ती नाही. परंतु गृहप्रवेश करण्यापूर्वी वास्तू शांत करणे शुभ मानले जाते.
आगामी काळातील वास्तू मुहूर्त :
मे : ६, ७, १२, १३, १४, १८, २०, २१, २५, २६, २७
जून : १, ८, ११, १५, १६, २३, २४
ऑगस्ट : ३, ४, १०,१३, १७, २२
नोव्हेंबर : २१, २६, २८, ३०
डिसेंबर : २, ८, ९, १६, १९, २८, २९, ३०