साधू संत वैरागी आजही तपश्चर्येसाठी हिमालयातच का जातात?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 03:04 PM2021-04-08T15:04:05+5:302021-04-08T15:04:28+5:30
आजवर अनेक साधू संतांच्या तपश्चर्येमुळे ती भूमी भारित भूमी झाली आहे.
संसाराचा वीट आलेल्या संसारी मनुष्याच्या तोंडी 'मी हिमालयात निघून जातो' हे वाक्य हमखास येते. परंतु तिथे जाणे, राहणे आणि तपश्चर्या करणे हे काही साधे सोपे काम नाही. परंतु साधू संत तपश्चर्येसाठी हिमालयात जातात, हे आपण कायम ऐकत आलो आहोत. असे काय वैशिष्ट्य आहे तिथे की, हिमालयाला तपोभूमीचे स्वरूप यावे? चला जाणून घेऊया.
तपश्चर्या करायची तर संसाराच्या व्यापातून दूर गेले पाहिजे. मोहापासून अलिप्त ठेवले पाहिजे. शांत वातावरणात मन एकाग्र केले पाहिजे. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी आणि कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी आजवर साधू संतांनी हिमालयाची निवड केली. हिमालय एवढा विशाल आणि विस्तीर्ण आहे की त्याच्या कुशीत अपेक्षित असलेला एकांत सहज गवसतो. तिथे गेलेले साधू संत तिथल्या गुहांमध्ये राहतात. या गुहा दिसायला छोट्याशा असल्या तरी साधू संतांसाठी ते त्यांचे छोटेसे विश्व असते. त्यांच्या तपश्चर्येमुळे हिमालयात ऊर्जेचे मोठे स्रोत तयार झाले आहेत.
हिमालयाचा काही भाग पर्यटनासाठी आहे तर काही भाग केवळ अध्यात्मिक, पारमार्थिक साधनेसाठी राखीव ठेवला गेला आहे. आजवर अनेक साधू संतांच्या तपश्चर्येमुळे ती भूमी भारित भूमी झाली आहे. याचा प्रत्यय घ्यायचा असेल, तर केदारनाथला अवश्य जा. अध्यात्मिक बैठक असलेली किंवा योगसाधना करणारी व्यक्ती, तिथे गेल्यावर तेथील स्पंदनं तुम्ही सहज अनुभवू शकते किंवा आत्मसात करू शकते.
तुम्ही कितीही मोठे व्यक्तिमत्त्व असलात, तरी जेव्हा हिमालयासमोर जाता, तेव्हा स्वतःला अतिशय सूक्ष्म समजू लागता. ही विशालता हिमालयात आहे. तिथे गेल्यावर अहंकार आपोआप गळून पडतो. अध्यात्मिक पार्श्वभूमी असो वा नसो, मृत्यूपूर्वी प्रत्येकाने एकदा तरी हिमालय प्रत्यक्षात पाहिलाच पाहिजे, असे म्हणतात.