आपल्याला स्वप्नं का पडतात? स्वप्नांनाही नावे असतात का? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 01:17 PM2021-03-16T13:17:54+5:302021-03-16T13:18:12+5:30
आपल्याला स्वप्नं का आणि कशामुळे पडतात. हे लक्षात आल्यावर स्वप्नांचा अति विचार न करता स्वप्न पूर्तीच्या मागे लागणे योग्य ठरते.
मनोविज्ञान, आयुर्वेद, ज्योतिष आणि योग विद्येनुसार स्वप्न शास्त्रासंबंधित माहिती दिलेली आहे. स्वप्न चांगले असो वा वाईट त्यामागे काहीतरी कारण असते हे नक्की! त्याचे फळ मिळतेच असे नाही. स्वप्नं पाहताना जणू काही आपण एखादे चलत चित्र पाहत आहोत असा भास होतो. झोपेत स्वप्नं पाहताना त्या चित्रात आपण ओढले जात आहोत, असा भास निर्माण होतो. जागे झाल्यावर काही स्वप्नं आठवतात, तर काही स्वप्नं झोपेतच विरून जातात. स्वप्नं कशामुळे पडतात, ते जाणून घेऊ.
अधिकतर स्वप्नं आपल्याला दिनचर्येत घडलेल्या घटनांमुळे पडतात. दिवसभरातील गोष्टी आपल्याला स्वप्नात दिसतात. किंवा ज्या गोष्टींचा आपण अधिक विचार करतो, पाहतो, इच्छा धरतो त्या गोष्टी स्वप्नात दिसतात. आपल्या जेवणाचा आणि पाण्याचाही स्वप्नावर परिणाम दिसतो. मन अस्वस्थ असेल आणि त्यात जड जेवण झालेले असेल किंवा अतिरिक्त पाणी प्यायले गेले असेल, तर हमखास वाईट स्वप्न पडते. म्हणून झोपण्याआधी तीन तास जेवण्याचा सल्ला दिला जातो. तसेच सूर्यास्तानंतर पाणी कमी प्यावे असे सुचवले जाते.
स्वप्नाचे काही प्रकार आहेत-
दृष्ट - जागेपणी आपण ज्या गोष्टी पाहतो, त्याच स्वप्नातही पाहणे.
श्रुत - झोपण्यापूर्वी ज्या गोष्टी ऐकतो, त्या गोष्टी स्वप्नात पाहणे.
अनुभूत - दिवसभरात ज्या गोष्टी अनुभवल्या त्या स्वप्नात पाहणे.
प्रार्थित - जागेपणी आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण प्रार्थना केली असेल, ती गोष्ट स्वप्नात पाहणे.
दोषजन्य - वात, पित्त, कफ या त्रासामुळे चित्त अस्वस्थ होते आणि त्याच्याशी संलग्न स्वप्न पाहणे.
भाविक - भविष्यातील घटनांची पूर्व सूचना देणारी स्वप्नं पाहणे.
यावरून तुम्हाला लक्षात येईल, की आपल्याला स्वप्नं का आणि कशामुळे पडतात. हे लक्षात आल्यावर स्वप्नांचा अति विचार न करता स्वप्न पूर्तीच्या मागे लागणे योग्य ठरते.