'याला कुणी वाली नाही' असे आपण का म्हणतो? त्यामागची कथा सापडते रामायणात; जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 12:43 PM2022-12-14T12:43:12+5:302022-12-14T12:43:49+5:30
'वाली नसणे' म्हणजे पाठिंबा, समर्थन नसणे, एकाकी असणे असे या वाकप्रचाराचे कंगोरे आहेत, पण कथा काय तीही जाणून घेऊ!
बोलीभाषेत अनेक शब्द आपण सहज वापरतो, ते त्याठिकाणी अचूक बसतातही; मात्र त्या शब्दांचा, वाक्प्रचारांचा अर्थ समजत असला तरी दर वेळी आपल्याला संदर्भ माहीत असतोच असे नाही. तसाच एक परवलीचा वाक्प्रचार म्हणजे 'याला कोणी वाली नाही!' याचा संदर्भ शोधायचा तर आपल्याला रामायणात डोकवावे लागेल.
वाली हे नाव वाचताच रामायणाशी असलेले कनेक्शन तुमच्याही लक्षात आले असेलच. परंतु रावणाइतके बलाढ्य सैन्य असून सुद्धा तो एकाकी का पडला? आणि त्याच्यावरून एकटे पडण्याच्या संकल्पनेला मूर्त रूप कसे आले ते जाणून घेऊया.
वाली किश्किंधाचा वानर राजा होता आणि सुग्रीव त्याचा भाऊ. तारा ही वालीची पत्नी होती. जेव्हा वाली एका दैत्याशी लढण्यासाठी गुहेत गेला तेव्हा त्याने सुग्रीवाला सांगितले की जर मी मारला गेलो आणि बाहेर येऊ शकलो नाही तर त्या दैत्याला या गुहेत बंद करून टाक. बराच काळ लोटला तरी वाली बाहेर आला नाही, आणि गुहेतून रक्त वहात बाहेर आले. सुग्रीवाला वाटले की आपला बंधू मारला गेला आणि हे त्याचेच रक्त आहे. अत्यंत दुःखी होऊन त्याने एका भल्या मोठ्या दगडाने गुहेचे तोंड बंद करून टाकले आणि तो तिथून निघून गेला. परंतु वाली प्रत्यक्षात जिंकला होता.
वालीच्या पश्च्यात सुग्रीवाने राज्याची सूत्रं हाती घेतली आणि तो प्रामाणिकपणे राज्यकारभार करू लागला. वाली जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याने पहिले की त्याच्या जागी त्याचा भाऊ सुग्रीव राज्य करत आहे. त्याला वाटले की राज्य प्राप्तीसाठी सुग्रीवाने आपल्याला धोका दिला आणि गुहेत बंद केले. त्याने सुग्रीवाचे कोणतेही म्हणणे ऐकले नाही. त्याला पदावरून काढले आणि सत्ता आपल्या हाती घेतली. एवढेच नाही तर सुग्रीवाची बायको बळकावली आणि त्याला युद्धासाठी आव्हान दिले. तेव्हा सुग्रीवाने प्रभू श्रीरामांकडे मदत मागितली. श्रीराम आणि सुग्रीव यांच्यात तह झाला. सुग्रीवाचे राज्य आणि पत्नी परत मिळवण्यासाठी श्रीरामांनी सहकार्य करायचे तर श्रीरामांची पत्नी रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी सुग्रीवाने श्रीरामांना मदत करायची.
ठरल्यानुसार सुग्रीवाने वालीला युद्धासाठी आव्हान केले. श्रीरामांनी छुपा पाठिंबा दर्शवून वालीचा वध करायचा असे ठरले. युद्धाचा दिवस निश्चित झाला. वाली आणि सुग्रीवाचे तुंबळ युद्ध सुरू झाले. मात्र ते दोघे भाऊ एवढे सारखे दिसत होते की त्यांच्यातला वाली कोण आणि सुग्रीव कोण हे ओळखताना श्रीरामांचा गोंधळ होत होता. त्यांची ही दुविधा पाहून हनुमानाने पटकन तुळशीची माळ गुंफली आणि सुग्रीवाच्या गळ्यात टाकून आला. परत येऊन श्रीरामांना म्हणाला, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ तो तुमचा! याचाच अर्थ जो श्रीरामांचा नाही त्याला कोणी वाली नाही!
अशा रीतीने जो भगवंताच्या कृपेस पात्र नाही ती एकाकी पडलेली व्यक्ती वालीसारखी कमनशिबी मानली जाते आणि अशा व्यक्तीला कोणी वाली नाही असे संबोधले जाते!