नमस्कार करताना शीर का झुकवतात? वाचा सम्राट अशोकाची कथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 02:32 PM2021-05-29T14:32:56+5:302021-05-29T14:33:19+5:30

ज्याचे आचरण शुद्ध, त्याचेच चरण धरा आणि मस्तक नमवता येईल तिथेच नतमस्तक व्हा!

Why do you bow your head while saluting? Read the story of Emperor Ashoka! | नमस्कार करताना शीर का झुकवतात? वाचा सम्राट अशोकाची कथा!

नमस्कार करताना शीर का झुकवतात? वाचा सम्राट अशोकाची कथा!

googlenewsNext

एकदा सम्राट अशोक राज्याच्या टेहळणीसाठी निघाला होता. सोबत त्याचा प्रधान आणि मुख्य सैनिक होते. राज्याचा फेरफटका मारत असताना राज्याच्या वेशीवर एक साधू बसले होते. सम्राट अशोकाने आपल्या वहाणा बाजूला काढून त्या साधुंजवळ जाऊन त्यांना साष्टांग नमन केले. साधू काहीच बोलले नाहीत. त्यांनी नुसते स्मित करत आशीर्वादरूपी हात सम्राटाला दर्शवला. त्यांचे दर्शन घेऊन चौकडी सम्राट अशोकासह महालात परत आली.

महालात आल्यावर प्रधान सम्राटाला म्हणाला, `सम्राट, जे शीर राजतिलक लावल्याने शोभून दिसते, ज्या शीरावर विजयाचा मुकुट शोभायमान दिसतो, जे शीर समस्त प्रजाजनांसाठी अभिमानाची बाब आहे, ते शीर एका फकीर साधूसमोर तुम्हाला झुकवावेसे का वाटले. तुम्ही केवळ हात जोडून अभिवादन केले असते, तरीदेखील साधूंना मान मिळाला असता. परंतु साष्टांग नमस्कार हे अतिच होत नाही का?'

यावर सम्राट काहीच उत्तरले नाहीत. त्यांनी केवळ हसून वेळ मारून नेली. 

काही दिवसांनी सम्राटांनी चार पिशव्यांमध्ये चार प्राण्यांचे शीर कापून प्रधानाला दिले आणि एका पिशवीत मानवाचे खोटे शीर दिले. सम्राट म्हणाले, या पाचही पिशव्यांमधील शीर विकून रिकाम्या पिशव्या घेऊन ये.

प्रधान गोंधळला. परंतु प्रतिप्रश्न विचारायचे त्याचे धाडस होईना. त्याने त्या पिशव्या नेल्या. त्यातील प्राण्यांचे शीर विकले गेले, परंतु मानवाचे शीर घ्यायचे धाडस कोणीच करेना. प्रधान ती शीर घेऊन परत आला. त्याने सम्राटाला सांगितले, हे शीर घेण्यास कोणीच तयार नाही. आपल्यावर हत्येचा आळ येईल शिवाय मानवी शीर घेऊन काय उपयोग, असे म्हणत लोकांनी हे शीर नाकारले आहे, असे प्रधान म्हणाला.

यावर सम्राट अशोक म्हणाले, `काही दिवसांपूर्वी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले? नमस्काराच्या वेळी शीर का झुकवायचे ते कळले? कारण, एकमेव मानवी शीर असे आहे, जे अहंकारामुळे कोणापुढे झुकत नाही, वाकत नाही त्यामुळे ते देहापासून विलग झाल्यावर त्याला काही किंमत उरत नाही. ते देहावर असेपर्यंतच त्याला मान आहे. परंतु, आयुष्यात ज्ञानी, साधू, अनुभवी लोकांपुढे हे शीर झुकवले, तरच आशीर्वादाची प्राप्ती होते. माझ्या मृत्यूपश्चात माझे शीर संग्रही करून ठेवले, तरी त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून ते योग्य वेळी, योग्य ठिकाणी झुकवले गेलेच पाहिजे!'

म्हणूनच म्हणतात ना, ज्याचे आचरण शुद्ध, त्याचेच चरण धरा आणि मस्तक नमवता येईल तिथेच नतमस्तक व्हा!

Web Title: Why do you bow your head while saluting? Read the story of Emperor Ashoka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.