मनुष्य जन्म मृत्यूच्या फेऱ्यात का अडकतो ? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 03:34 PM2021-02-27T15:34:31+5:302021-02-27T15:34:48+5:30
प्रतिजन्मी आत्मघात झाल्याने `कोण करावे गणित' या चक्रवाढ व्याजी थाटात त्याच्या जन्म मृत्यूच्या चकरा चालूच राहतात. मग प्रश्न असा उरतो, संसारात वागावे कसे?
माणूस सर्वसाधारणपणे स्वत:च्या देहाचे व संसाराचे नको एवढे चिंतन करीत बसतो. त्यामुळे `जन्म होणे' यातच ईश्वरापासून तो दुरावलेला असतो. संसारी विषयांच्या चिंतनामुळे तो सतत त्याच विषयात अडवूâन राहतो. आशा आकांक्षाच्या बेड्या पायात अडकतात आणि त्या एका जन्मात पूर्ण होत नाहीत, म्हणून पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. एकदा मेल्याने सुटेना, असे हे मरण आहे.
आणखी जगणे नको, असा सूर लावणारे लोकसुद्धा यमराज दाराशी येताच पुढच्या दारी जा सांगतात. म्हणजेच मरणाची तयारी नाही आणि आनंदाने जगण्याची कला नाही. या द्वंद्वात मनुष्य झुरत राहतो. म्हणजे तो जिवंतपणी मरण अनुभवत असतो. कधी इच्छा, आकांक्षा, आवड अशा कितीतरी गोष्टींवर पाणी सोडत, तडजोड करत तो जगत असतो. परंतु या जगण्याला कोणी जगणे म्हणत नाही. ही फक्त आयुष्याशी केलेली तडजोड असते. श्रीमंती गाठीशी असूनही उपभोगता आली नाही, आनंदाचे क्षण असूनही ते ऐकायला आपली व्यक्ती नाही, समाजात मान सन्मान आहे, पण घरात काडीची किंमत नाही, हे जगणं मरणाहून वाईट आहे. त्यापेक्षा अध्यात्माच्या वाटेवर चालू लागाल. देहाची, मनाची आसक्त कमी करून, कर्म करा आणि निकाल भगवंतावर सोपवा.
प्रतिजन्मी आत्मघात झाल्याने `कोण करावे गणित' या चक्रवाढ व्याजी थाटात त्याच्या जन्म मृत्यूच्या चकरा चालूच राहतात. मग प्रश्न असा उरतो, संसारात वागावे कसे? तर संत एकनाथ म्हणतात-
ऐसे असावे संसारी,
जोवरी प्राक्तनाची दोरी,
पक्षी अंगणासी आले,
आपला चारा चरोनि गेले,
मुळी घराचार मांडिला,
खेळ मोडोनि टाकिला,
वाटसरू वाटा आले,
प्रात:काळी उठोनि गेले,
मार्गी बुहसाल भेटले,
नाही मन तेथे गुंतले,
एका विनवी जनार्दना,
ऐसे असता भय कोणा।।
सत्संगतीने माणूस देहासक्ती कमी करू लागतो आणि ईशसेवेत आसक्ती वाढवू लागतो. हे मर्म आपण वेळीच समजून घेतले पाहिजे. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हटले आहे -
देहादीक प्रपंच हा चिंतियेला,
परी अंतरी लोभ निश्चीत ठेला,
हरीचिंतने मुक्तिकांता वरावी,
सदा संगती सज्जनाची धरावी।। श्रीराम।।