सैनिकांना तुमच्या आमच्यासारखे मृत्यूचे भय का वाटत नाही? सांगत आहेत ओशो!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 08:00 AM2021-08-21T08:00:00+5:302021-08-21T08:00:00+5:30
जोवर तुम्ही ध्येयप्राप्तीसाठी एखाद्या योद्ध्यासारके कंबर कसून रणांगणावर उतरत नाही, तोवर तुम्ही तुमच्या क्रियेशी समरस होऊ शकत नाही.
युद्धभूमीवर सैनिकांना कित्येकदा सखोल आनंदाचा अनुभव येतो. हा असा विचार सुद्धा आपल्याला कठीण वाटतो. कारण ते त्या काळी त्या स्थळी मृत्यूच्या इतक्या निकट असतात की कोणत्याही क्षणी त्यांच्यावर मृत्यू कोसळू शकतो. सुरुवातीला ते भयभीत होतात. भयाने त्यांचा थरकाप होतो. पण रोज अखंडपने तुम्ही थरथरत, घाबरलेले राहू शकत नाही. हळू हळू सवय होते. मनुष्य मृत्यूचा स्वीकार करतो. मग भय समाप्त होते आणि केवळ कर्म शिल्लक राहते.
सैनिक या क्रियेत इतक्या खोलवर बुडून जातात की स्वत:चे अस्तित्त्वही विसरून जातात. जोवर 'मी' शाबूत असतो, तोवर हा भाव भयंकर त्रास देऊ शकतो. मग चूक घडू शकते. क्रियेशी संपूर्ण सामरस्य होऊ शकत नाही. इकडे जीवनच पणाला लागलेले असते. म्हणून तुम्ही द्वैताचा भार ओढू शकत नाही. कृत्यच समग्र होते.
मोठमोठ्या योद्ध्यांनी आनंदाच्या इतक्या प्रगाढ झऱ्यांचा अनुभव घेतला आहे की तसा अनुभव सर्वसामान्य जीवनात प्राप्त होणे अशक्यच! कदाचित म्हणूनच त्यांना युद्ध आकर्षित करत असेल. जे लोक विचार करतात ते कधीच पुढे जाऊ शकत नाहीत, जे विचारांना कृतीची जोड देतात, तेच प्रगती करतात. तेच ध्येय गाठू शकतात. योद्ध्यांच्या बाबतीत तेच घडते. त्यांचे ध्येय स्पष्ट असते आणि ते आपल्या ध्येयाशी अद्वैत पावलेले असतात.
याउलट आपण सगळे सतत द्वैतात अडकलेले असतो. आपली झेप जीवन आणि मृत्यू च्या खेळाच्या मधली असते. मृत्यूच्या भयाने आपण रोजचा दिवस नुसता धनसंपत्तीचा खेळ खेळत राहतो. जगण्याची धडपड असते. योद्ध्यांचे तसे नाही. ते मृत्यूला घाबरत नाहीत, तर ते युद्धाला सामोरे जातात. त्यांना युद्धाचे आकर्षण वाटते. त्यांना फक्त विजयश्री मिळवून आणायची असते. त्यासाठी वाटेत येणारे सगळे अडथळे पार करण्याची त्यांची तयारी असते.
या उदाहरणावरून शिकण्यासारखी गोष्ट हीच आहे, की जोवर तुम्ही ध्येयप्राप्तीसाठी एखाद्या योद्ध्यासारके कंबर कसून रणांगणावर उतरत नाही, तोवर तुम्ही तुमच्या क्रियेशी समरस होऊ शकत नाही. ती अवस्था गाठण्यासाठी वाटेत येणारे अडथळे आणि आकर्षण यावर मात करून, कुठल्याही प्रकारची भीती मनात न बाळगता तुम्हाला लढले पाहिजे, योद्ध्यासारखे! तरच तुम्हीसुद्धा तुमच्या कार्यक्षेत्रात विजयश्री खेचून आणू शकाल.