माझ्याबाबतीतच सगळं वाईट का घडतंय? असे वाटेल तेव्हा 'हे' उदाहरण कायम लक्षात ठेवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 03:42 PM2021-06-04T15:42:37+5:302021-06-04T15:42:55+5:30
कठीण परिस्थिती आपल्याला कमकुवत नाही तर कणखर बनवत असते. स्वतःला घडवत राहा. म्हणजे 'या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीतच वाईट का घडल्या' या प्रश्नांची भविष्यात उकल होईल!
आपल्यापैकी प्रत्येकाला, आयुष्यात वाईट घटना घडू लागतात, तेव्हा हे माझ्याच बाबतीत का घडत आहे, असा प्रश्न पडतो. त्याचवेळेस दुसऱ्यांचे आयुष्य अगदी सुरळीत सुरु आहे असे वाटत असते. दरवेळी आपल्याला आपण केलेल्या चुकांचीच शिक्षा मिळते असे नाही, तर कधी कधी न केलेल्या चुकांचीही शिक्षा आपल्याला भोगावी लागते. परिस्थिती आपल्या हातात असते असे नाही. अशा वेळी हातून निसटून गेलेल्या गोष्टीचा शोक करण्यापेक्षा पुढे काय करता येईल, याचा विचार केला पाहिजे.
परंतु आपण जुन्या गोष्टी उगाळून दुःख कुरवाळत बसतो. दुःख प्रत्येकाला आहे. कारणं वेगवेगळी असतील. परंतु पूर्ण सुखी कोणीच नाही. म्हणून जेव्हा परिस्थिती आपल्या हातात नसते अशा वेळी शांत राहा. धीर धरा. वेळ जाऊ द्या. हळू हळू चित्र बदलेल. निश्चित बदलेल. जेव्हा आपल्याला वाटते, की आता सगळे काही हातातून निसटून जात आहे, अशा वेळी लक्षात ठेवा, 'परमेश्वर जेव्हा एखादी गोष्ट हिरावून आपली ओंजळ रिकामी करतो, तेव्हा त्याच ओंजळीत तो आणखी काहीतरी चांगले देण्याची तजवीज करत असतो!'
परिस्थिती बिघडत आहे, चित्र विस्कटत आहे, काहीच चांगले घडत नाहीये असे वाटत असताना आपण परिस्थितीची एक बाजू पाहत आहोत हे ध्यानात ठेवा. ज्याप्रमाणे भरत काम सुरु असताना कापडाच्या एका बाजूला रंगीबेरंगी दोऱ्यांचा गुंता दिसत असतो, त्याच वेळेस कापडाच्या विरुद्ध बाजूला सुंदर नक्षीकाम आकार घेत असते. सुंदर नक्षीकाम घडत असताना त्यालाही गुंतलेल्या दोऱ्यांची पार्श्वभूमी असतेच.
त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात गुंता झालेला असताना भविष्याची सुंदर नक्षी आकार घेत असू शकेल, यावर विश्वास ठेवा. स्वतःच्या कर्तृत्त्वावर विश्वास ठेवा. कठीण परिस्थिती आपल्याला कमकुवत नाही तर कणखर बनवत असते. स्वतःला घडवत राहा. म्हणजे 'या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीतच वाईट का घडल्या' या प्रश्नांची भविष्यात उकल होईल!