होळीला दहन आणि धूलिवंदनला रंग असे का? वाचा धर्म ग्रंथातील शास्त्रीय कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 16:36 IST2025-03-13T16:08:47+5:302025-03-13T16:36:55+5:30
Reason Behind Holi : होलिका दहनाची कथा प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळते. ही कथा भक्त प्रल्हाद, दुष्ट राजा हिरण्यकशपू आणि त्याची बहीण होलिका यांच्याशी संबंधित आहे.

होळीला दहन आणि धूलिवंदनला रंग असे का? वाचा धर्म ग्रंथातील शास्त्रीय कारण
होलिका दहनाची कथा प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळते. ही कथा भक्त प्रल्हाद, दुष्ट राजा हिरण्यकशपू आणि त्याची बहीण होलिका यांच्याशी संबंधित आहे.
हिरण्यकशपू हा एक अहंकारी राक्षस राजा होता. त्याने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले होते की त्याला ना मनुष्य मारू शकेल, ना प्राणी; ना दिवसात, ना रात्री; ना घरात, ना बाहेर; ना शस्त्राने, ना अस्त्राने. हे वरदान मिळाल्यावर त्याने स्वतःला देव मानायला सुरुवात केली आणि आपल्या राज्यातील सर्वांना त्याची पूजा करायला लावले.
मात्र, त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता. त्याने वडिलांच्या आज्ञेचा अवमान करून विष्णूची भक्ती सुरूच ठेवली. यामुळे हिरण्यकशपू क्रोधीत झाला आणि त्याने प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. पण प्रत्येक वेळी विष्णूने त्याचे रक्षण केले.
होलिकेचा कट
हिरण्यकशपूची बहीण होलिका हिला एक विशेष वस्त्र मिळाले होते, जे तिला अग्नीत जळण्यापासून वाचवायचे. हिरण्यकशपूने ठरवले की होलिकेने प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीत बसावे, ज्यामुळे प्रल्हाद जळून मरावा आणि होलिका सुरक्षित राहावी.
पण प्रल्हादाने भगवान विष्णूचा ध्यास घेतला आणि चमत्कार झाला होलिकेच्या शरीरावरील वस्त्र वाऱ्याने उडून प्रल्हादाच्या अंगावर आले. त्यामुळे होलिका जळून भस्म झाली, तर प्रल्हाद सुरक्षित राहिला.
होलिका दहनाचा संदेश
• सत्य आणि भक्तीचे विजय : दुष्ट प्रवृत्ती कितीही ताकदवान असल्या तरी शेवटी सत्याचा आणि भक्तीचा विजय होतो.
• अहंकाराचा नाश : हिरण्यकशपू आणि होलिका यांचे अहंकार आणि अन्याय त्यांच्याच नाशाला कारणीभूत झाले.
• चांगल्या गोष्टींचा उत्सव : होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी साजरा केला जातो.
आजही होळीच्या सणाच्या निमित्ताने रात्रीच्या वेळी होलिका दहन केले जाते. लोक देशी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, लाकडे आणि गवत एकत्र करून होळी पेटवतात आणि वाईट प्रवृत्तींचा नाश होवो, अशी प्रार्थना करतात. दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळतात, जी आनंद, बंधुत्व आणि प्रेमाचे प्रतीक मानली जाते.
संदर्भ : धर्म शास्त्र संग्रह.
- मुळे गुरुजी (शिऊरकर)
छत्रपती संभाजीनगर.