मंदिराच्या सभागृहात कासवाला नमस्कार करून गाभाऱ्यात जाणे का अपेक्षित असते? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 08:00 AM2022-02-11T08:00:00+5:302022-02-11T08:00:03+5:30
सर्व मंदिरात सुरुवातीलाच किंवा गाभाऱ्याबाहेर कासव असण्याचे प्रयोजन काय असेल? ही ज्ञानात भर घालणारी माहिती वाचा!
मंदिरात गेल्यावर गाभाऱ्यात प्रवेश करताना अनेकदा आपला पाय बिचाऱ्या कासवावर पडला असेल. त्यावर कोणी फुले वाहिली असतील, तर ते आपले लक्ष वेधून घेते, पण अनेकदा कासव अगदी भुईसपाट आणि संगमरवरी असल्यामुळे आपल्या दृष्टीक्षेपात येत नाहीत. तसे असले, तरी देखील मंदिरात गेल्यावर तिथल्या उंबरठ्याला आणि लगोलग कासवाला नमस्कार करण्याचा संस्कार आपल्याला पूर्वजांनी घालून दिला आहे. त्याचे आपण पालन करतो. परंतु, प्रश्न असा पडतो, की सर्व मंदिरात सुरुवातीलाच किंवा गाभाऱ्याबाहेर कासव असण्याचे प्रयोजन काय असेल? यावर छान माहिती मिळाली-
कासव हे प्रतीक रूप आहे. कासव ठेवण्याची दोन कारणे आहेत. कासवाची आई आपल्या पिलांकडे केवळ वात्सल्य दृष्टीने पाहून त्यांचे पोषण करते. त्याचप्रमाणे देवळातील देवानेही आपल्याकडे वात्सल्य दृष्टीने पहावे असे त्यातून सूचित केले आहे.
दुसरे कारण म्हणजे कासव ज्याप्रमाणे आपले पाय आत खेचून घेते, त्याप्रमाणे देवासमोर जाताना भक्ताने आपले काम क्रोधादिक विकार आवरून मगच दर्शन घेतले पाहिजे.
कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकते, तशी भक्ताने अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची तयारी दर्शवली पाहिजे. ती तयारी असेल, तरच कासवाप्रमाणे दीर्घायुष्य लाभून मन मंदिरातील परमेश्वराचे सदैव सान्निध्य लाभेल.